एका घराची गोष्ट
एका घराची गोष्ट. ही गोष्ट आहे या चित्रातल्या घराची. अगदी "खेड्यामधले घर कौलारू" म्हणण्यासारखं घर. कौलारू असलं तरी खेड्यातलं नाही. चांगलं रत्नागिरीत आहे. हे घर आहे माझ्या आजोबांचं. खरं तर त्यांच्या वडिलांचं. म्हणजे माझ्या पणजोबांचं. रत्नागिरीत वरची आळी तयार होण्यापूर्वी रहाट आगर नावाचा गाव होता तेव्हा तिथे बापटांची अनेक घरं होती. त्यातलं एक मोठं चौसोपी घर होतं माझ्या पणजोबांचं. माझे पणजोबा त्या काळात म्हणजे १९०० च्या आसपास रत्नागिरीतले प्रख्यात वकील होते. तेव्हापासून या घराला नाव पडलं "बापट वकिलांचं घर." पणजोबा म्हणजे रत्नागिरीतली मोठी असामी. बर्यापैकी पैसे बाळगून होते. केवळ हौस म्हणून उतारवयात त्यानी दुसरं लग्न केलं. शेरांत मोजण्याइतकं सोनं घरात होतं पण पणजोबा वारले आणि नंतर त्यांच्या दिवाणजीनी सगळं सोनं नाणं , मालमता हडप केली असं म्हणतात. त्यांचा मोठा मुलगा म्हणजे माझे आजोबा. घर सावत्र आईला देऊन ते घरातून बाहेर पडले. आजोबा घरातून बाहेर पडल्यानंतर आजोबांचे सावत्र धाकटे भाऊ पोटापाण्याच्या पाठीमागे दूर इंदौर-पुण्याला निघून गेले. चौसोपी घराचा अर्...