प्रवास
बरेच दिवसांनी नवर्याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते . आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं . तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे , जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो . स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं . मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली . रूळ क्रॉस करणार्या बर्याच मंडळीचं निरीक्षण करून झालं . एक पाणचट चहा पिऊन झाला . शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली . जनरलच्या डब्यात आधीपासूनच उभे असलेले लोक पाहिले आणि हे आपलं काम नव्हे याची खूणगाठ बांधत स्लीपरच्या डब्याकडे धाव घेतली . 4/5 डबे मागे चालत गेल्यावर एका डब्यात एक अख्खं बाक रिकामं दिसलं . टीसी येईपर्यंत बसून घेऊ म्हटलं , आणि काही मिनिटांतच टीसीसाहेब अवतीर्ण झाले . आमच्याकडे जनरलचं तिकीट आहे आणि फरकाचे पैसे भरून बर्थचं तिकीट दिलंत तर उपकार होतील असं सांगताच त्यांनी इतर काही बिनापावतीचे इ . सूचक वगैरे न बोलता पावती फाडून हातात ठेवली आणि बर्थ क्रमांक ...