प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर
फतेहपूर सीकरी मुलं लहान असताना त्यांना घेऊन जमेल तसे फिरत होतो. २००५ मधे दिवाळीच्या आधी सुटी घेऊन दिल्ली वारी करू म्हटले. दिल्लीला जायचे म्हटल्यावर ८० वर्षांचे सासरे बरोबर येतो म्हणाले. त्यांची दोघांचीही तिकिटे काढली. हॉटेल्स दिल्लीत जाऊन बघू म्हटले. दोन म्हातारे आणि दोन मुले बरोबर असल्याने फार काही बघून होणार नाही हे माहीत होतेच. त्याप्रमाणे दिल्ली, आग्रा, मथुरा, फतेहपूर सीकरी एवढाच प्लॅन ५ दिवसांसाठी ठरवला. जुनी दिल्ली, लाल किल्ला, म्युझियम वगैरे पाहिले. मथुरा वृंदावन, आग्रा किल्ला, ताजमहाल हे बघून झाले. हॉटेलवाल्याने गाडी ठरवून दिली होती तो ड्रायव्हर मुस्लिम होता. अतिशय अदबशीर ऊर्दू-हिंदी बोलणारा आणि व्यवस्थित माणूस. पान सिगारेट काही व्यसन दिसले नाही. ग्रँड ट्रंक रोडवर दरोडे वगैरे घातले जातात असे काहीबाही सांगत होता. फतेहपूर सीकरीला जाताना किल्ल्याजवळ पोचताच ५/६ टपोरी पोरांनी गाडीच्या मागून पुढून धावत गाडीला अक्षरशः घेरले. दोघेजण गाडीच्या बॉनेटवर चढले. शेवट ड्रायव्हरने गाडी थांबवली. पोरे एकूण 'अवतार' दिसत होती. ऊर्मट भाषेत आम्ही गाईड आहोत, किल्ला दाखवू म्हणाले. ड्रायव्ह