आमचें गोंय- समारोप - आजचा गोवा
आजचा गोवा ६ डिसेंबर १९९२ ला आम्ही आमचं सामान घेऊन गोव्यात आलो. तो दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिलाय, कारण त्याच दिवशी अयोध्येत रामजन्मभूमीचा वाद विकोपाला जाऊन मोठाच गोंधळ झाला होता. वाटेत जागजागी पोलीस बंदोबस्त होताच. पण टीव्ही नसल्यामुळे नेमकं काय चाललंय काही कळायला मार्ग नव्हता. पण गोव्यात आल्यावर फार काही टेन्शन वगैरे जाणवलं नाही. त्यापूर्वी आमची बदली होणार हे निश्चित झाल्यावर अधिकार्यांनी २ पर्याय दिले होते, एक तर मुंबई किंवा गोवा. मुंबईचं आयुष्य आणि गर्दी, लोकलचा प्रवास हे सगळं आपल्याला न झेपणारं, म्हणून आम्ही गोव्यात यायचा निर्णय घेतला, आणि आजपर्यंत कधीच त्याचा पश्चात्ताप झाला नाही. बदली झाल्यावर माझा नवरा आधी बॆंकेची शाखा नक्की कुठे आहे हे पाहण्यासाठी एकटाच पुढे आला होता. रत्नागिरी- पणजी बसने येताना वाटेत म्हापश्याला त्याने बॆंकेचा बोर्ड पाहिला. माझी म्हापश्याला बदली झाली होती , त्यामुळे तिथल्या लोकांनाही भेटून यावं म्हणून तो सहजच बॆंकेत शिरला. ओळख झाल्यावर रहायची सोय काय म्हणून प्रश्न कोणीतरी विचारला. आता जागा शोधायची आहे म्हणताच एका स्टाफने लगेच म्हटलं. “अरे, परवा तो...