नर्मदे हर!!
नर्मदे हर! काही दिवसांपूर्वी एक "मिसळपावकर" आत्मशून्य नर्मदा परिक्रमेच्या उद्देशाने बाहेर पडला. पण काही कारणाने त्याची परिक्रमा पुरी नाही झाली. त्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशात रहाणार्या यशवंत कुलकर्णीने 'एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा' ही सुंदर लेखमालिका 'मिसळपाव' संस्थळावर लिहिली होती. ती वाचताना या नर्मदा परिक्रमेबद्दल कुतुहल जागं झालं. की हे काय प्रकरण आहे? अशी कोणती प्रेरणा आहे, की जिच्यामुळे लोक हजारों मैलांचं अंतर पायी चालून जायला तयार होतात? तसं खूप वर्षांपूर्वी गोनीदांचं 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' वाचलं होतं. पण मध्यंतरीच्या वर्षात ते कुठेतरी मागे राहून गेलं होतं. यशवंतच्या लेखावर प्रतिक्रिया लिहिणार्यांनी जगनाथ कुंटे यांच्या 'नर्मदे हर' पुस्तकाचा उल्लेख केला होता. आयुष्यात कधी नर्मदा परिक्रमेला जाऊ न जाऊ, निदान प्रत्यक्ष जाऊन आलेल्याचे अनुभव वाचावेत म्हणून पुस्तकाचा शोध सुरू झाला. रत्नागिरीला गेले होते तेव्हा एका दुकानात चौकशी करता पुस्तक सध्या नाही मागवून देऊ असं सांगितलं. आता पुस्तकांच्या दुकानात जाऊन रिकाम्या हाताने परत कसं य...