रांगोळ्या


amit

हे काय असावं? पोर्ट्रेट? की फोटो?
यातलं काही नाही. ही रांगोळी आहे. माझ्या ऑफिसातला एक कलाकार नरेश आणि त्याचा जुळा भाऊ गणेश माणगावकर यांनी काढलेली.
नरेश आणि गणेश हे गोव्यातल्या एका लहानशा साखळी नावाच्या गावातले जुळे भाऊ. लहान असताना दोघांनाही चित्रकला आवडायची. मग दिवाळीतली रांगोळी प्रदर्शनं पाहून हे दोघेही रांगोळ्या काढायला लागले. ८वी/९वीत असताना त्यांनी स्वतंत्रपणे शाळेतल्या रांगोळी प्रदर्शनात रांगोळी काढली. ती लोकांना खूप आवडली. मग अशा मोठ्या रांगोळ्या काढणं हा दरवर्षीचा उद्योग झाला. म्हापसा, वास्को इथल्या प्रदर्शनात ते रांगोळ्या काढायला लागले.
pic1
pic2
pic3
mandakini
shilp
sachin
hakikat
amit1
gabbar
kid
काही प्रदर्शनातून बक्षीसे मिळत असत तर काहीत फक्त शाबासक्या. मग हळूहळू दोघेही माणगावकर बंधू नोकरीनिमित्त पणजी इथे राहू लागले. कला अकादमीचे सदस्य झाले. जेव्हा आंतर्राष्ट्रीय फिल्म फिस्टिव्हल्सची सुरुवात झाली तेव्हा याना उद्घाटनाच्या ठिकाणी कला अकादमीत रांगोळी काढायला बोलावलं गेलं. उद्घाटकाची छबी रांगोळीतून चितारायची पद्धत या दोघानी सुरू केली.
yash
ben
अनेकदा अशा प्रमु़ख पाहुण्याकडून शाबासकी मिळते, पण नेहमीच सगळं सुरळीत होत नाही. ज्याना रांगोळी काढायची संधी मिळत नाही , त्यांनी प्रमुख पाहुण्याला रांगोळी न दाखवणे, कधी पाहुणे यायच्या आधीच गर्दी झाली, आणि पायानी रांगोळी पुसली गेली अशा सबबी सांगून रांगोळी पुसून टाकणे असेही प्रकार केले, पण नरेश आणि गणेश यानी नाउमेद न होता आपलं काम चालूच ठेवलं.
fardeen
Vahida
या दोघांनी काढलेल्या सुरुवातीच्या रांगोळ्या सुंदर होत्याच, पण नंतर नंतर कमालीचं परफेक्शन येत गेलं. हल्लीच लता दीदी एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या, तेव्हा या दोघांनी काढलेली ही रांगोळी.
lata
मा. दीनानाथांचं चित्र दीदींना इतकं आवडलं की त्यानी हातात असलेली गुलाबाची फुलं त्या चित्राच्या पायथ्याशी ठेवली. मग आपल्या चांदीच्या घंटेसारख्या मंजूळ स्वरात या दोघांना शाबासकी दिली.
lata2
ती रांगोळी कशी आणि केवढी होती याची कल्पना यावी म्हणून हे.
lata3
तरी यातले बरेचसे फोटो मोबाईलवर किंवा जुन्या कार्डावरच्या फोटोवरून डिजिटल कॅमेर्‍याने काढलेले आहेत, त्यामुळे या रांगोळ्यांची प्रत्यक्ष कल्पना येणं जरा कठीण आहे.
आणखी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. अनिल काकोडकरांची ही रांगोळी.
anil
आपल्या हातात केवढी जादू आहे याचा अजिबात गर्व नसलेले हे दोघे भाऊ, त्यातला नरेश माझ्या ऑफिसात काम करतो. त्यांच्या या कलाकृती सर्वात आधी प्रत्यक्ष पहायला मिळतात हे मी माझं नशीबच समजते.
अमिताभ बच्चन यांच्या एका वाढदिवसाला प्रतीक्षा बंगल्यात एका कॉमन मैत्रिणीने या दोघाना रांगोळी काढण्यासाठी नेलं. तिथे सगळ्यात पहिल्या फोटोतली रांगोळी या दोघांनी काढली. अमिताभ यानी रांगोळीच्या भोवती काही संरक्षण, काच यांची व्यवस्था करून ती रांगोळी जपून ठेवली, ती निदान काही दिवस तरी सुरक्षित राहिली असेल. पण एरवी अत्यंत क्षणभंगूर अशी ही रांगोळीची कला या दोघांना नक्की कोणती प्रेरणा देते देवजाणे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नर्मदे हर!!

रणबीर राज कपूर

आमची पहिली गाडी