रणबीर राज कपूर

रणबीर राज कपूर

#शतलेख,
#राजकपूर
(*माझा मराठीचा बोल या फेसबुक ग्रुपवर पूर्वप्रकाशित) 
-----------------------------------

दूरदर्शन पाहणे हल्ली एकूण कमीच झाले आहे. पण रविवारी सकाळी 8 वाजता रंगोली निदान काम करता करता ऐकायची हा कित्येक वर्षांचा शिरस्ता. गेल्या रविवारी सकाळी रंगोली चालू केली. आणि सगळी कामं सोडून टीव्ही बघत बसले. कारण होतं समोरच्या पडद्यावर असलेली निळ्या डोळ्यांची एक जादू. त्याचं नाव रणबीर राज कपूर. हे राज कपूरच्या अभिनयाचं किंवा दिग्दर्शनाचं समीक्षण नव्हे. पण काहीसं विस्कळीत वर्णन म्हणता येईल.

वास्तविक मी लहान असताना राज कपूरची सद्दी संपून ऋषीचा चढता काळ होता. खरे तर राजेश खन्नाही उतरणीला लागून अमिताभ नावाचा सूर्य तळपू लागला होता. पण तेव्हा सिनेमा पाहणे हीआतासारखी सोपी गोष्ट नव्हती. शोले रत्नागिरीत यायला प्रदर्शित हौन दोन वर्षे जावी लागली होती. त्यामुळे जुने सिनेमाही अधून मधून लागत असत. अशात कधीतरी अनाडी लागला. रत्नागिरीचे दिव्य लता टॉकिज. तिथे बाल्कनीचं तिकीट एक रुपयात मिळायचं. कोणाच्या तरी डोक्यात पंखा पडल्याची सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकू यायची. तर त्या दिव्य लता टॉकिजमधे राज कपूर नावाचं कृष्ण धवल गारूड पहिल्यांदा बघितलं. आणि त्या निळ्या डोळ्यांची जशी काय भूलच पडली!

राज कपूरच्या सिनेमांची गाणी तोंडपाठ झाली होतीच. आईला चांगले सिनेमा आवडत असत आणि ती अशा सिनेमांबद्दल सांगून आम्हाला ते सिनेमे बघायला प्रवृत्त करायची. मग काय! आह, आग, आवारा, श्री 420, संगम, मेरा नाम जोकर, जिस देश में गंगा बहती है, बॉबी, तीसरी कसम, बूटपॉलिश, जागते रहो, अंदाज काय विचारू नका! सगळे सिनेमे शोधून शोधून बघितले. याला अर्थात कित्येक वर्षे लागली. पण आरके चे सगळे सिनेमे बघायचे मग राम तेरी गंगा मैली, सत्यम शिवम सुंदरम आणि हीना सुद्धा बघितले!

प्रत्येक सिनेमात काहीतरी चांगलं सापडायचंच. उदाहरण घ्यायचं तर राम तेरी गंगा मैली मधे शेवट गर्दीचा सीन आहे त्यातल्या प्रत्येक माणसाचे भाव बघून घ्यावेत. दिग्दर्शक काय करू शकतो हे तिथे दिसतं.. गाणी तर सगळीच लाजवाब. विकि पान बघितलं तर राज कपूरच्या सिनेमांची आणि पुरस्काराची यादी सगळी तिथे मिळेल. दिग्दर्शक म्हणून त्याचं काम किती मोठं होतं ते वाचायला मिळेलच, हा माणूस पृथ्वीराज कपूरांचा मुलगा आणि दिवाण कपूर साहेबांचा वारस असला तरी कसा सर्व प्रकारची कामे करत कसा झगडत एक नंबराला पोचला तेही कुठे ना कुठे वाचायला मिळेल. लाहोर पेशावर हून परागंदा झालेल्या कुटुंबातले तीन तरूण भारतात आले आणि त्यानी भारतीय सिनेमा सृष्टीला कसं वळण लावलं, आणि तिथे कसं राज्य केलं याच्या सुरस कथाही वाचायला मिळतील. राज दिलीप आणि देव ही त्रयी फारच उंच जाऊन बसली. तिथे पोचणं खूप कष्ट करूनच साध्य होणारे आहे.

राज कपूरच्या सिनेमांवर सुरुवातीच्या काळात डाव्या समाजवादी विचारसरणीचा प्रभाव दिसतो. स्वातंत्र्य नवं असताना आणि नेहरू पंतप्रधान असताना ते साहजिकच म्हटलं पाहिजे. तरूण वयात तुम्ही कम्युनिस्ट नसाल तर तुम्हाला हृदय नाही आणि प्रौढत्वात कम्युनिस्ट असाल तर तुम्हाला मेंदू नाही असं कोणाचं तरी वक्तव्य आहे. त्याचा गंमत म्हणून इथे संदर्भ घेते आहे! उत्तरौत्तर राज कपूरचे सिनेमे जास्त जास्त सामाजिक प्रश्न आणि सुधारणांवर भाष्य करणारे होत गेले. त्याचवेळी त्याच्या उत्तरकाळातील सिनेमात नायिकांचे अंगप्रदर्शन नको इतके  दिसायला लागले.

राज कपूरच्या दिग्दर्शक म्हणून कारकीर्दीचे सरळ दोन भाग पडतात. मेरा नाम जोकर च्या आधी आणि नंतर. मेरा नाम जोकर पर्यंत अतिशय निरागस, भाबडा, आदर्शवादी, संवेदनाशील आणि स्वच्छ सिनेमा त्याने केला. पण सर्वस्व ओतून केलेला मेरा नाम जोकर सुरुवातीला लोकानी नाकारला. मग तुम्हाला पाहिजे ते घ्या म्हणत राज कपूरने सामाजिक प्रश्नावरचे सिनेमे सुद्धा फिल्मी पद्धतीने सादर करायला सुरुवात केली. त्यातही चांगले भाग दिसतात. पण नायिकेचे शोषण वाटेल इतके कमी कपडे आणि तेही कथेत मोठी आवश्यकता नसताना राज कपूरच्या सिनेमात दिसायला लागले. याच काळात म्हणजे सत्तर आणि ऐंशीच्या दशकात भारतात प्रचंड घडामोडी चालू होत्या. एकूणच निरागस सिनेमा मागे पडून सेक्स आणि व्हायोलंस याना प्रतिष्ठा मिळायला लागली होती. अमिताभचे आगमन आणि स्वच्छ सिनेमाची पीछेहाट हे एकदमच घडत होते. काही लोक आपापले किल्ले सांभाळत होते. पण मोठ्या प्रमाणात गुंतवलेले पैसे वसूल होणे आवश्यक म्हणून अनेक तडजोडी बहुतेक दिग्दर्शक करत होते. तेव्हा सिनेमात उघड्या नायिका आणणे हे पाप एकट्या राज कपूरच्या माथी मारता येत नाही.

प्रत्येक चांगल्या गोष्टीला एक गालबोट असतं. तसं त्याचं खाजगी आयुष्य. अतिरिक्त दारू पिणे, नायिकांच्या प्रेमात पडायची सवय. कृष्णा कपूरनी राजची पत्नी म्हणून काय काय सोसलं असेल असं खूपदा मनात येतं. पण तेव्हा कोणाच्या संसारातल्या फटी वाढवायला आतासाराखी माध्यमे नव्हती म्हणून, का जुन्या काळचे कुटुंब म्हणून त्यांचे लग्न टिकून राहिले. राजच्या दारू पिण्याबद्दल असे कुठेतरी वाचले होते की ज्या दिवशी नवा सिनेमा सेटवर जायचा त्या दिवशी राजची दारू जी बंद व्हायची ती सिनेमा पुरा होऊन पार्टी सुरू झाली की पुन्हा सुरू व्हायची. ती पुढचा सिनेमा सुरू होईपर्यंत. अति संवेदनाशील आणि क्रिएटिव्ह, प्रतिभावंत कलाकाराला रिकामे राहणे नरकासमान वाटत असले तर देव जाणे!

राज कपूरचा अप्रतिम संयत अभिनय त्याच्या देखणेपणामुळे जरा मागेच रहायचा, म्हणजे लक्षात यायला जरा कठीन. पण टाईम साप्ताहिकाने जगातल्या सर्वोत्तम 10 भूमिकांमधे राज च्या आवारामधल्या भूमिकेचा समावेश केला आहे. तीसरी कसम, अंदाज, आवारा, श्री 420 सगळेच अविस्मरणीय भूमिकांनी नटलेले. शोमन म्हणजे नुसता पोकळ दिखावा तिथे नव्हता. आवारा आणि आह मधली गाणी बघताना राजच्या डोळ्यातले भाव बघताना दर वेळी ती जादू मनावर गारूड करत असतेच. आजा सनम गाणं बघताना त्या डोळ्यांवर एकदा लक्ष गेलं की मागचा काचेचा चंद्र खटकत नाही की पडद्यावरच्या कृत्रिम चांदण्या! पण रविवारी मेरा नाम जोकर मधले जाने कहां गए वो दिन बघताना जाणवलं की डोळ्यांनी अभिनय तर सोपा आहे. त्या बोलक्या डोळ्यांवर गॉगल चढवून फक्त चेहर्‍याच्या स्नायूंच्या हालचालीनी दु:ख लपवण्याचा प्रयत्न करण्याचा अभिनय किती कठीण आहे! पण राज च्या भूमिका बघताना हे लक्षातसुद्धा पटकन येत नाही!

किती लिहावे आणि कुठे थांबावे! सगळे आयुष्य भव्य निर्मिती करत घालवणार्‍या राजचा अंतही तसाच अत्युच्च बिंदूवर झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार घेण्याच्या समारंभात त्याला खूप बरं नाहीसं झालं. आणि सगळ्या प्रथा मोडत स्वत: राष्ट्रपतींनी मंचावरून खाली उतरून त्याला तो पुरस्कार दिला होता! तिथून राज घरी परत आलाच नाही. सुमारे महिनाभर हॉस्पिटलमधे मृत्यूशी त्याच्या झुंजीच्या बातम्या येत राहिल्या. तेव्हा सिनेमावाल्यांबद्दलच्या बातम्या रेडिओवर टीव्हीवर फार येत नसत. पण राज कपूरची प्रत्येक गोष्ट भव्य प्रमाणावर व्हायची तशा त्याच्या तब्बेतीच्या बातम्याही त्याच्या चाहत्यांसाठी तेव्हा प्रसारित झाल्या होत्या. शेवट 2 जूनला त्याने जगाच्या रंगमंचावरून ग्रॅंड एक्झिट घेतली तेव्हा अख्खा भारत त्याच्यासाठी डोळ्यात पाणी घेऊन हळहळला असेल..

राजचा वारसा त्याच्या मुला-नातवंडानी उत्तम चालवला. त्याचेच नाव घेऊन आलेला त्याचा नातू आज भारतीय सिनेमा सृष्टी गाजवतो आहे. प्रचंड खर्च करून महत्त्वाकांक्षी सिनेमे आजही तयार होत आहेत. पण मर्यादित पैसे आणि तंत्र हातात असताना अख्ख्या जगाला स्वप्नं विकणारा दुसरा ग्रेट शोमन आणि त्याचवेळी संयमी अभिनेता राज कपूरच्या तोडीचा भारतात कोणी झाला नाही! ते निळ्या डोळ्यांचं गारूड माझ्या पिढीवरून अजून उतरलं नाही आणि आता या जन्मात तरी उतरायचं नाही.

Image may contain: 1 person, closeupImage may contain: 1 person, closeup
Image may contain: 1 person, smiling, closeup

 (चित्रे आंतरजालावरून साभार) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नर्मदे हर!!

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर

Earth’s Children