गोव्याची चवथ


श्रावणातला पाऊस झिरमिर सुरू झाला की महाराष्ट्रातल्यासारखेच गोव्यातल्या लोकांना पण गणपतीचे वेध लागतात. इथल्या बोलीभाषेत चतुर्थी म्हणजे चवथ. गणपतीच्या सणालाच "चवथ" म्हणायची गोव्यात पद्धत आहे. गोव्यात दिवाळीचं प्रस्थ तसं कमी. म्हणजे फटाके फराळ वगैरे दिवाळीत नसतं, तर सगळं गणपतीत असतं. आम्ही गोव्यात नवीन आलो तेव्हा तर फटाके नसल्यामुळे दिवाळी सुरू आहे असं कळायचं पण नाही. दुकानात फटाके विचारले तर "फुगोटे आता खंय? चवथीकडेन मेळतले" असं ऐकायला मिळालं. तेव्हा कळलं की गोव्यात गणपती हा सगळ्यात मोठा सण. गणेश चतुर्थी आणि पंचमी दोन दिवस गोव्यात सगळ्यांना सुटी. एक दिवस गणरायाच्या आगमनाचा आणि दुसरा विसर्जनाचा. गणपतीत अगदी सगळी ऑफिसे पण दोन दिवस बंद असतात.
गोव्यात शिगमो म्हणजे होळी आणि गणपती हे लोकांचे खास आवडीचे सण. पैकी शिगमो म्हणजे होळी हा सामाजिक तर गणपती वैयक्तिक म्हणावा असा. गोव्यात सार्वजनिक गणपती अजून तसे कमी आहेत. गेल्या २५/३० वर्षातच हे प्रस्थ सुरू झालंय. महाराष्ट्रातल्या सारखे गल्लोगल्लीचे राजे अजून इथे पहायला मिळत नाहीत. आणि एकूणच काहीसं धार्मिक वातावरण असतं. सार्वजनिक गणपतींच्या समोर अजून नाटके, शास्त्रीय संगीत, आरत्यांच्या स्पर्धा असे कार्यक्रम असतात. ऑर्केस्ट्रा वगैरे तुरळक प्रमाणात असतात. पण गोव्यातल्या लोकांना एकूणच संगीतकलेची आवड जात्याच असते, त्यामुळे गणपतीत ऑर्केस्ट्रा वगैरे बडवण्यापेक्षा घुमट आरती करण्यात गोंयकाराचा जीव रमतो.
गोव्यात गणपतीपूजा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. कदंबांनी बांधलेलं गणपतीचं एक भव्य देऊळ दिवाडी बेटावर सप्तकोटेश्वराबरोबर होतं त्याचा नाश पोर्तुगीजांनी केल्यानंतर तिथली मूर्ती उचलून आधी खांडेपार मग साखळी आणि शेवट खांडोळा, माशेल इथे नेण्यात आली. माशेलातील महागणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तसंच फोंड्यातील गोपाळ गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. या देवळातील मूळ दगडी मूर्ती गुराख्यांना रानात मिळाली आणि मग मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी देवळासाठी निधी उपलब्ध करून दिला. इतर गावांप्रमाणे फोंड्याला कोणत्याही देवाचं प्रमुख असं देऊळ नाही. कदाचित आदिलशाही आक्रमणाच्या काळात ही मूर्ती एखाद्या देवळातून उचलून रानात लपवली असावी. गोव्यात गणपतीची स्वतत्र अशी खूप देवळं नाहीत पण सांतेरी म्हणजे वारूळ ही स्थानिक लोकप्रिय देवता. कदाचित त्यामुळेच मातीपासून बनलेल्या गणपतीबाप्पाबद्दल लोकांना जरा जास्तच आपुलकी वाटत असावी.
फोंडा येथील गोपाळ गणपती मंदिर
gopalganapati
श्रावणात गावातल्या कारागिराकडे पाट दिला की गणपती करून द्यायची जबाबदारी त्याची. प्रत्येक गोंयकार कुठेही रहात असला तरी गणपतीसाठी गावातल्या घरी जमा होतो. अशा वेळी घरात २५/३० पर्यंत माणसं सहजच असतात. गणपतीच्या आठ एक दिवस आधी कोणीतरी उत्साही पोरं गावच्या घरी जाऊन साफसफाई करून येतात. चतुर्थीच्या २/३ दिवस आधी फराळाचे पदार्थ करायची लगबग स्वयंपाकघरात सुरू होते. त्यात "नेवर्‍यो" म्हणजे सुक्या खोबर्‍याचे सारण घातलेल्या करंज्या महत्त्वाच्या. या नेवर्‍यांना इतकं महत्त्वाचं स्थान आहे की ख्रिसमसच्या सणाला ख्रिश्चन लोक पण त्या शुभ म्हणून करतात. चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणपतीबाप्पा घरी येऊन विराजमान झाले की अर्धा जीव भांड्यात पडतो. मग माटोळीची तयारी सुरू होते. माटोळी म्हणजे गणपतीच्या समोर उंचावर बांबू किंवा सुपारीच्या खोडाची एक चौकट बांधलेली असते. तिला ताजी आणि उपलब्ध असतील ती फळे भाज्या बांधल्या जातात. त्यात भोपळे, शहाळी, सुपार्‍या, काकड्या, अंबाडे, कवंडळासारखी आकर्षक दिसणारी फळं असं सगळं स्थानिक शेतीत आणि रानात तयार झाललं असतं.
माटोळीच्या सामानाचा बाजार
matoli
मातीच्या बनवलेल्या गणपतीला सजावट अशी अस्सल निसर्गातून वेचून आणलेली असते यात काय नवल! हल्ली माटोळी बांधण्याच्या स्पर्धा गोवा सरकारतर्फे भरवल्या जातात. नुकतेच एका बहाद्दराने रानावनात फिरून एकूण ३५० प्रकारच्या वनस्पती गोळा करून माटोळी बांधली आणि स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवले! या माटोळीतल्या बहुतेक फळे, भाज्या, आणि वनस्पती औषधी गुणधर्माच्या असतात नाहीतर रोजच्या वापरात येणार्‍या. पण विषरी वनस्पती माटोळीमधे कटाक्षाने टाळल्या जातात आणि जाणकार लोक ४-५ तास पायी फिरूनसुद्धा रानातून जास्तीच्या वनस्पती माटोळीसाठी गोळा करतात. आंब्याचे टाळे किंवा इतर माटोळीच्या वस्तू जमिनीवर पडून खराब होणार नाहीत याची खास काळजी घेतली जाते.
या माटोळीचं सुधारित रूप म्हणजे सावंतवाडीकडे मिळणारी लाकडी फळं. तीही कुणाकुणाच्या गणपतीसमोर मांडून ठेवलेली असतात. कोणाला मूलबाळ नसेल तर ती लोकं गणपतीला नवस बोलतात, बाप्पा मला पोर दे, पुढच्या चवथीला तुझ्या माटोळीत पोराला बांधीन. मग समजा त्याच्या घरात पाळणा हललाच तर पुढच्या वर्षी खरंच माटोळीला झोळी बांधून त्यात त्या बाळाला थोडा वेळ ठेवलं जातं.
माटोळी
matoli
आता ठिकठिकाणचे कलाकार थर्मोकोलची मखरं वगैरे तयार करतात पण काही जणांकडे पिढ्यान पिढ्यांची लाकडी आणि आरसे लावलेली मखरे वर्षभर माळ्यावर जपून ठेवलेली असतात. ती साफसूफ करून गणपतीची सजावट केली जाते. गोंयकार मनाने अतिशय भाविक आणि परंपरा जपणारा. त्यामुळे अशा पिढ्यान पिढ्याच्या वस्तू अनेक कुटुंबात जपून ठेवल्या जातात. परंपरा जपण्याचा सोस इतका की काही घरात कागदाच्या गणपतीची पूजा केली जाते. पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीत मातीच्या मूर्ती आणायला बंदी होती, गावातून तरी लोक लपून छपून आणतच असत पण पणजीसारख्या शहरातून त्यानी यावर उपाय काढला तो म्हणजे घरातल्या गणपतीच्या तसबिरीची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा करून त्याची पूजा करायची, मग उत्तर पूजा झाली की विसर्जन पाण्यात न करता पाणी प्रोक्षण करून परत ती तसबीर नेहमीच्या जागी लावून टाकायची. पोर्तुगीजांची धाड आलीच तर अशी तसबीर उचलून परत जागेवर ठेवणं सोपं हे महत्त्वाचं कारण यामागे असावंच. पण आता पोर्तुगीज जाऊन ५० वर्षे उलटली तरी या काही घरांतून ही प्रथा अजूनही तशीच चालू आहे.
गणपतीबरोबर गौरीही असतातच. तृतीयेला गौरी महादेवाची पूजा असते. गौरीचा मुखवटा म्हणजे कागदावरचं चित्रच असतं. तेरडा, चिडक्याची गौर असते आणि नारळाचा महादेव. गणपतीसमोर पुरुष मंडळी फुगडी घालतात तर गौरीसमोर बायका मुली. चतुर्थीला भटजी मंडळींना भयंकर मागणी. प्रत्येक थोडंफार संस्कृत येणारा भट, मग तो लहान मुलगा असला तरी चालेल, गावोगावच्या घरोघरच्या गणपतीची पूजा करतो आणि प्राणप्रतिष्ठा करतो. एरवी तो इन्कम टॅक्स ऑफिसर का असेना! गणपती बसवणे हे गावचं काम समजून केलं जातं. गणपतीला नेवर्‍यो, पातोळ्या, तांदुळाची खीर, मणगणे असे गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. या दिवसात कांदा लसूण वर्ज्य. काही गोंयकार सोवळ्या ओवळ्याबदल इतके काटेकोर असतात की एरवी घरात मासे आणले जातात त्यावेळी वापरायची भांडीकुंडी वेगळी असतात. आणि गणपतीत वापरायची वेगळी. सगळ्या भांड्यांचा वेगळा एक संच अगदी विळी, कोयतीपर्यंत एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवला जातो आणि गणपतीत शिवराक रांधप करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अगदी रवा, साखर, तांदूळ, तेल सगळं सामान वेगळंच काढून ठेवलं जातं!
नैवेद्य झाला की मग आरती. गोव्यातली घुमट आरती फार प्रसिद्ध आहे. मातीच्या मडक्याला एका बाजूने चामडे लावून घुमट वाद्य तयार केलं जातं. घुमट, मृदुंग, पेटी टाळ सगळं साहित्य घेऊन सगळी मंडळी शेजार्‍यापाजार्‍यांकडे जाऊन आरत्या करतात. मग कितीही घरात जाऊन आरत्या त्याच त्याच म्हणाव्या लागल्या तरीही कोणीही कंटाळत नाही. संध्याकाळी परत वेगळ्या आरत्या. अशा घुमट आरत्यांच्या स्पर्धा भरवल्या जातात आणि त्या ऐकायला लाबलांबून लोक येतात.
घुमट
ghumat
layer_detailpage" frameborder="0" allowfullscreen>layer_detailpage" frameborder="0" allowfullscreen>दुसर्‍या दिवशी लगेच विसर्जन. पोर्तुगीजांच्या काळातच बाटवाबाटवीच्या भीतीने गणपती दीड दिवस ठेवायची पद्धत सुरू झाली असावी. शिवाय गणपती घरात असताना मासे खायचे नाहीत हे एक मोठंच पथ्य पाळावं लागतं. दीड दिवसाचा गणपती म्हणजे काय! भटजीबुवा उत्तरपूजेच्या अक्षता देऊन गेले की मग लोक सवडीने रात्री उशीरा पर्यंत वाजत गाजत गणपतीबाप्पाला मिरवत विसर्जनासाठी नेतात. त्यावेळी फटाक्यांची आतषबाजी आवश्यकच! आमच्या घराच्या शेजारून एक रस्ता तळ्याकडे जातो. रात्री ३-४ वाजेपर्यंत विसर्जनाच्या मिरवणुका सुरू असतात. सगळे घरोघरचे गणपतीच! सार्वजनिक गणपती मात्र गौरीविसर्जनाच्या दिवशीच पोचवतात. आता बरेच लोक काही काही कारणाने गणपतीला बोलून घेतात की अमकं झालं की मी तुला ५ दिवस/७ दिवस/११ दिवस अगदी २१ दिवसांपर्यंत ठेवीन! मग पुढच्या वर्षी एकदा ५ दिवस ठेवलेला गणपती परत कमी दिवस ठेवता येत नाही म्हणे, मग त्या घरात ५ दिवसांचा गणपती सुरू होतो. माशेलला महागणपतीचं स्थान आहे तिथले कलाकार दर वर्षी नारळाचा, भाज्यांचा, फुलांचा असे वेगवेगळे गणेश तयार करतात. तिथला गणपती लोकांना पहायला मिळावा म्हणून २१ दिवसपर्यंत ठेवतात!
"पुनरागमनाय च" म्हणून बाप्पाला निरोप दिला की पाटावर वाळूची मूठ ठेवून कोणाबरोबर तरी पाट घरी धाडून दिला जातो आणि खिशात ठेवलेली प्लॅस्टिकची पिशवी बाहेर काढत गोंयकार मासळीबाजाराची वाट धरतो!
(काही प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार आणि व्हिडिओ युट्युब वरून साभार)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नर्मदे हर!!

Earth’s Children

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर