उकडगरे


सध्या माझी आई माझ्याकडे आली आहे. ती आली की मी नेहमी पारंपरिक पाककृत्या तिला विचारून करत असते. त्या फेसबुकवरच्या मित्रमंडळींना बघाव्या लागतात आणि इच्छा असो नसो, चान चान म्हणावे लागते. एका कन्नड लोकांच्या ग्रुपमधे मराठी पाकृ अजिबात माहित नसल्याने त्या खूपच आवडतात असे तिथले लोक म्हणतात. ते कदाचित त्यांच्या जन्मजात सौजन्यशील स्वभावामुळे असावे. मा. स्पाजींबरोबर "कलेसाठी कला की जीवनासाठी कला" या विषयावर आमचा नेहमी फेसबुकीय वाद सुरू असतो. त्यांचे म्हणणे की पाकृचे प्रेझेंटेशन जास्त महत्त्वाचे तर मला वाटते की ती खाणे हे जास्त महत्त्वाचे. या वादाचा निकाल आजपर्यंत लागला नाही. पण त्याचा बदला घेण्यासाठी एकदा मौ भात करून मा. स्पाजींचे नाव त्यावर "टाचायचा" माझा कृतनिश्चय आहे. आजपर्यंत जेव्हा कधी मौ भात केला तेव्हा तो जास्त जीवनावश्यक वाटल्याने त्याचे छायाचित्राच्या कलाकृतीत रूपांतर न झाल्यामुळे तो प्रसंग टळला आहे. ते असो.
या जाहीर वादात मा. बिका पुणेकर यांनीही एकदा "प्रेझेंटेशनचं र्‍हाऊ द्या" असे माझ्या काळजाला घरे पाडणारे उद्गार काढल्याने माझे पाकृचे प्रयोग आजपर्यंत फक्त फेसबुकपुरते मर्यादित होते. परंतु मिपावरचे बरेच संपादक पाककृती टाकून वाहवा मिळवतात मग मीच का मागे राहू असा विचार मनात आला आणि त्यातच काल सकाळी उठून पाकृ मिपावर टाकायचीच असा निश्चय करताच मिपा बंद असल्याची सुवार्ता आली. कदाचित काही लोकांना माझ्या बेसन लाडवांचे करूण कहाणी गेल्या वर्षीच्या दिवाळीत वाचल्याचे स्मरत असेल. माझी मिपावरची पहिली पाकृ टाकायचा निश्चय मी करताच मिपा बंद पडावे यावरून माझ्या पाकृ मा. स्पा यांच्या भयकथेच्या रांगेतल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त करून ही पाकृ मा. स्पाजी यांना समर्पित करते. ते ही असो. बोलण्याच्या नादात पाकृ विसरून जाईल. तेव्हा आता हे सगळे बाजूला ठेवून पाकृ सांगते.
काल बाजारात गेले तेव्हा फणसाचे कच्चे पण तयार झालेले गरे साफ करून ठेवलेले पाहिले. लगेच माझ्या मनात आले की उकडगर्‍यांची भाजी करूया. एक पाकीट कमी होईल म्हणून २ घेतली. ते बरेच झाले. तर उकडगर्‍यासाठी साहित्यः
१. काप्या फणसाचे कच्चे पण पिकण्याच्या बेताला आलेले गरे आणि आठळ्या
२. हळद लहान चमचाभर
३. मीठ चवीप्रमाणे
४. गूळ जरा जास्त पण चवीप्रमाणे
५. २/३ सांडगे मिरच्या
६. मेथी दाणे चिमूटभर
७. तेल, मोहरी, हिंग फोडणीसाठी
८. ओले खोबरे, कोथिंबीर
कृती: सुरुवातीला फणसाच्या गर्‍यांच्या पात्या काढून त्याचे हातानेच उभे तुकडे करावेत. आठळ्या जरा ठेचून त्यांची साले काढून टाकावीत. गरे आणि आठळ्या रात्रभर पाण्यात भिजत टाकाव्यात. मग सकाळी आठळ्या चिरून घ्याव्यात. दोन्ही भिजत घातलेले पाणी फेकून द्यावे. जीवनसत्त्वे इ. ची चिंता करू नये. कारण फणसाचा चीक त्या पाण्यात उतरलेला असतो.
gare
मग थोड्या पाण्यात हळद घालून आठळ्या शिजत ठेवाव्यात. त्या बर्‍यापैकी शिजताच त्यात गरे टाकून आणखी शिजवावे. गर्‍यातले सगळे पाणी आटून कोरडे झाले पाहिजे आणि गरे अगदी मऊ नव्हे, पण छान शिजले पाहिजेत. नंतर त्यात मीठ आणि गूळ घालून एक वाफ काढावी. हे इतर साहित्य सगळ्यांच्या स्वयंपाकघरात असते आणि मा वल्ली सारखे काही जण सोडल्यास बहुतेकांना ते काय आहे हे ओळखता येत असावे त्यामुळे त्याचे फोटो देत नाहीये.
gare3
एकीकडे सांडगे मिरच्या थोड्या तेलात तळून चुरडून भाजीत घालाव्यात. रत्नागिरीकडे जरा जाड बुटक्या मिरच्या भरून सांडगे मिरच्या करतात. त्या खूप चवदार असतात. पण इथे गोव्यात त्या मिळत नसल्याने ज्या मिळाल्या त्यावर काम भागवले आहे.
gare2
आता भाजी तयार झाली आहे त्यामुळे गॅसवरून खाली उतरवावी. मिरच्या तळलेल्या तेलात हवे तर थोडे आणखी तेल घालून मेथी दाणे, मोहरी, हिंगाची फोडणी करून भाजीवर ओतावी. कोथिंबीर धुवून बारीक चिरून आणि ओले खोबरे खवून भाजीवर घालावे आणि त्यानंतर कोणाचीही वाट न पाहता भाजी मनसोक्त हाडदावी. ही भाजी जेवणात एक भाजी म्हणून खा किंवा दुपारी चहाबरोबर पोहे, शिरा यासारखे खाणे म्हणून खा. कशीही मस्त लागते.
gare1
भाजी जास्त खाऊन पोट दुखल्यास उतारा म्हणून ओवा, पुदिन हरा, इनो यासारख्या वस्तू घरात असू द्याव्यात. किंवा जेवल्यावर आले, कोथिंबीर, जिरे आणि मिरच्या घातलेले ताक पिऊन ताणून द्यावी. या पाककृतीत वाटणे घाटणे असे काही प्रकार नाहीत. साधी शिजवायची पाकृ असल्याने याला उकडगरे असे म्हणतात. बघा तुम्हाला आवडते का! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रणबीर राज कपूर

नर्मदे हर!!

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर