विंचुर्णीचे धडे - गौरी देशपांडे

विंचुर्णीचे धडे
गौरी देशपांडेचं "एकेक पान गळावया" या बहुचर्चित पुस्तकांएवढं कदाचित प्रसिद्ध नसेल पण या पुस्तकावरही गौरीचा मोहक ठसा जाणवतोच. १९९६ चं हे पुस्तक. पुस्तक रूढ अर्थाने कोणत्र्या प्रकारात बसते माहित नाही. ही विंचुर्णीची चित्रे आहेत गौरीने रेखाटलेली. त्या चित्रांची प्रेक्षक म्हणून गौरी थोडीशी दिसते. त्याबरोबर पार्श्वभूमीला तिची मुले, नवरा हेही अधे मधे दिसतात. तशी ही आत्मकथा नव्हे पण एका महत्त्वाच्या टप्प्यावर अनुभवलेलं आयुष्य इथे गौरीने रेखाटलं आहे. या पुस्तकाची प्रस्तावना, अर्पणपत्रिका तेवढीच वाचनीय आहे. आपल्याला विंचुर्णीसारख्या खेड्यात जाऊन रहायची बुद्धी का झाली याचं सुरेख वर्णन यात आहे. याला कारण झालं गौरीच्या स्वप्नातलं कम्युन! प्रत्यक्षात त्या कम्युनमधे बरं वाईट सगळंच असणार आहे विंचुर्णीसारखं. स्वप्न बघायला हवीतच पण प्रत्यक्षात आणखीही खूप काही त्याबरोबर मिळतं. पाहिजे असलेलं आणि नको असलेलंही!
पुणे मुंबईच्या गजबजाटातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त विंचुर्णीला घर बांधायला कारण झाले ते गौरीचे मेव्हणे आणि बहीण. ते आधी तिथे जाऊन राहिले होते ते पाझर तलाव आणि त्यांच्या मेंढ्यांच्या प्रकल्पासाठी. गौरीने तिथे घर बांधले आणि तिथून हलूच नये असे सुरू केले. मग घराबरोबर विंचू, साप, मांजरे कुत्री सगळी गोळा झालीच. पाहुणे रावळे मुली नातवंडे सगळे ये जा करत होते. असेच मेंढ्यांचे काम पण गौरीने गळ्यात घालून घेतले.
या घरासोबत या सगळ्या प्राणी-मित्रांची चित्रे अतिशय सुरेख उतरली आहेत मग तिथल्या गोरख, नानी, मीराबाई अशा लोकांची स्वभावचित्रे अगदी प्रत्ययकारी आली आहेत यात नवल ते काय! या सगळ्यात पार्श्वभूमीला हमखास नसणारी वीज, मग तिथे आपोआप झालेली काळोखाची सवय, पाझरतलाव, तलावात होडी चालवणारी गौरी हे सगळं मुळातून वाचलं पाहिजे.
नंतर तर पुण्याला प्रोफेसरकी स्वीकारून तिकडे रहायला जावे लागले तरी विंचुर्णीचे घर होतेच. संधी मिळताच तिथे धाव घ्यायची हे गौरीचे आयुष्य होऊन बसले. विंचुर्णीच्या लोकांना सुधारायचा प्रयत्न केल्यानंतर ते अशक्य आहे हे समजून गौरीने सोडून दिले. विंचुर्णीचे धडे हे पुस्तकाचं शेवटचं प्रकरण तर अगदी अभ्यसनीय. त्यात अशा गावांकडे आदर्शवाद म्हणून धावलेल्यांची निराशा, अशा गावकरी लोकांसाठी काम करणार्‍या संस्थांच यश अपयश हे सगळं गौरीने लिहिलं आहे. तसंच विंचुर्णीकडून आपल्याला काय शिकायला मिळालं तेही लिहिलं आहे.
ते म्हणजे (१)आपल्या हातून कोणाचे फार भले होणार नाही. (२)संघटना या निराशाजनक असतात. (३) माणसांना प्रेम लावले की ती आपली होतात असे नव्हे. दृष्टीआड झाली की ती मनातून हळूच निखळून जातात. हा धडा अवघड असला तरी याचा अर्थ असा नाही की माणसे जोडूच नयेत! ज्यांच्या आधारे आयुष्य काढले ती तत्त्वे फोल आणि अडगळीची म्हटल्यावर माणसाने काय करावे हा आणि असेच प्रश्न. कोणाकडून मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत आणि तरी ठोकर लागलीच तर ते सगळेच मागे ठेवून पुढे चालू लागायचे हा सगळ्यात मोलाचा धडा!
पुस्तकात सामाजिक संस्थांबद्दल लिहिलेलं सगळंच पटेल असंही नाही.पण आपले सगळे ग्रह, पूर्वग्रह बाजूला ठेवले तर निव्वळ लिखाण म्हणूनही आवडू शकेल. सगळ्या पुस्तकभर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि विंचुर्णीचे धडे या शेवटच्या लेखात कथनाच्या ओघात सामाजिक आणि वैयक्तिक संबंधांचा उहापोह आणि खास गौरीच्या अशा टिप्पण्या आहेत.
पुस्तकाच्या शेवटाला उपसंहारात म्हटल्याप्रमाणे गौरी अधे मधे ताजी होण्यासाठी विंचुर्णीला जाते, हवे तसे जगते, लिहिते, कष्ट करते. या सगळ्यामुळे तब्बेत छान रहाते! पण त्या विंचुर्णीला काही द्यायच्या आदर्शवादाला मात्र तिने बाजूला ठेवले आहे. शेवट गौरी म्हणते की "विंचुर्णीने मला जे काही दिले ते अनमोल आहे. खरी खंत अशी आहे की, काही कारणाने का होईना - मी विंचुर्णीला फारसे काहीच दिले नाही!"
(टीपः गौरींचे २००३ मध्ये निधन झाले.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नर्मदे हर!!

रणबीर राज कपूर

आमची पहिली गाडी