ऐका गणेशदेवा तुमची कहाणी
ऐका गणेशदेवा तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे. विनायकाची देवळे, रावळे. मनचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचे पीठ कांडावे. अठरा लाडू करावेत. सहा देवाला, सहा ब्राम्हणाला, सहाचं सहकुटूंब भोजन करावे. अल्प दान, महा पुण्य असा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतीले लाभिजे. ही पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ********** श्रावणात प्रत्येक वारी त्या त्या वाराची कहाणी आजी वाचायची. त्या कहाणीच्या आधी ही गणेशाची कहाणी नेहमी वाचायची. आजीला तर ही कहाणी पाठच होती. कोणत्याही कामाची सुरुवात म्हणजे श्रीगणेशा करायचा तर गणपतीचे नाव घेणे परंपरेत आवश्यक समजले जाते ना, म्हणूनच ही लहानशी गणेशाची कहाणी. अगदी साधी सोपी. मोजक्या शब्दात गणपतीच्या राऊळाचे वर्णन आहे. निर्मळ मळे उदकाचे तळे. बेलाचा वृक्ष आहे. म्हणजे शिवाचे देऊळ कुठेतरी जवळपास असणार. तळ्यात सुवर्णकमळे आहेत. आणि तळ्याशेजारी विनायकाचे देऊळ आहे. गणपतीचे विनायक हे नाव पुराणांमधे आणि बौद्ध तंत्रात वापरले गेले आहे. कहाणी