पड्यारमाम

कवळे शाखेत बदली झाली, तेव्हा शाखा घराजवळ असल्याने मोठ्या उत्साहाने जॉइनिंग टाईम न घेता शाखेत दुसर्‍याच दिवशी हजर झाले. शाखेत पाय ठेवला, तेव्हा मॅनेजरची केबिन रिकामी होती. काउंटरवरचे काही चेहरे ओळखीचे होते. एक नवाच अनोळखी चेहरा 'मे आय हेल्प यू' काउंटरवर बसला होता. त्याचे वय बघता हा नवा क्लार्क नव्हे, हे सहजच लक्षात येत होते. चेहर्‍यावर भरपूर पावडर चिकटून बसलेली, कसला तरी उग्र वासाचा सेंट मारलेला आणि कपाळावर गंध. मात्र चेहर्‍यावर अगदी खरेखुरे हसू होते.

"अरे ज्योती, तू आयले गो?" (अरे, ज्योती, तू आलीस का?) म्हणत मोहिनी भट पुढे आली. तोपर्यंत शरद पेंडसेही माझ्यामागोमाग येऊन पोहोचला. शरद हे एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व. त्याच्याकडे बघून अगदी बाजीराव पेशवा कसा दिसत असेल याची कल्पना यावी. खूपच हुशार. मात्र घरच्या काही अडचणींमुळे कधीच प्रमोशनच्या वाटेला न गेलेला. तो कधीतरी कवळे शाखेत येऊन गेला असावा. कारण त्याने येताच काउंटरवरच्या माणासाला हात दिला. "पड्यारमाम, कसो आसा तू?" (पड्यारमाम, तू कसा आहेस?) "हे ज्योती कामत. हाजीय मज्याबरोबर हांगा ट्रान्स्फर जाल्या." (ही ज्योती कामत. हिचीही माझ्याबरोबर इथे ट्रान्स्फर झाली आहे.")

"यो गो! वेल्कम!"
"जॉईनिंग रिपोर्ट दिउपाक जाय न्ही?" (जॉइनिंग रिपोर्ट द्यायला पाहिजे ना?) मी.
"मॅनेजरु नांति. सोमवारा येउच्याक पुरो. ते रिपोर्ट गिपोर्ट कडेर पळोवका." (मॅनेजर नाहीत. बहुधा सोमवारी येतील. ते रिपोर्ट वगैरे नंतर बघायला हवे."

त्याच्या बोलण्यात मंगलोरी वळण लक्षणीय प्रमाणात होते. कसे कोण जाणे, पण तोपर्यंत मंगलोरहून गोव्यात जन्मात पहिल्यांदा आलेला नमुना मी त्या दिवशी पहिल्यांदाच बघत होते. म्हणजे मंगलोरहून येऊन गोव्यात स्थायिक झालेले काही जण भेटले होते. पण त्यांना गोव्यात बरीच वर्षे झालेली असल्याने त्यांची कोंकणी समजण्यात अडचण येत नसे. याच्याशी बोलताना काही दिवस तरी नीट लक्ष देऊन ऐकावे लागणार आहे, हे लगेच लक्षात आले.

"बरे. माका काउंटर खंचो तो दाखय." (बरं, मला काउंटर कोणता तो दाखव.)
"हांग बैस." (इथे बस) म्हणत मला त्याने सेव्हिंग बँक काउंटरवर नेऊन बसवले. शरदला काउंटर रिकामा नसल्याने पाठीमागे बसून स्टेटमेंट्स, रिटर्न्स कर म्हटले.

संध्याकाळी स्लिपांच्या टोटल चेक करता करता पड्यारमामसोबत बर्‍याच गप्पा झाल्या. तो रिटायरमेंटच्या जवळ पोहोचलेला साधा कुटुंबवत्सल माणूस होता. बँकेतले महत्त्वाचे समजले जाणारे अ‍ॅडव्हान्सेस वगैरेची त्याला फार माहिती नव्हती. त्यापूर्वी कित्येक वर्षे आमच्या बँकेत प्रमोशन्स झालेली नव्हती. जेव्हा थोडीफार प्रमोशन्स सुरू झाली, तेव्हा रिटायरमेंटच्या जवळ पोहोचलेल्या लोकांना एखादी ट्रॉफी दिल्यासारखी एकेक प्रमोशन देऊन बँकांच्या दृष्टीने त्यातल्या त्यात चांगल्या सेफ गोवा आणि कोकणात पाठवले होते. त्यात याचाही नंबर लागलेला. आयुष्यात प्रथमच घर सोडून लांब राहिला होता. घरी सगळे छान होते. दोन्ही मुले शिकून नोकरीला. बायको खंबीरपणे सासू-सासर्‍यांना सांभाळणारी. तेव्हा याला बँकेला सोडून दिला होता म्हणायला हरकत नव्हती. तब्बेत छान. सडपातळ, मध्यम बांधा आणि चेहर्‍यावर कायम प्रसन्न हसू.

बोलता बोलता त्यानेही माझ्याकडून सगळी माहिती काढून घेतली. "घरालागी कोण कोण अस्सां?" (घरी कोण कोण आहेत?)
"एक चली आणि एक चलो" (एक मुलगी आणि एक मुलगा.)
"तांका कोणे पळोवचे?" (त्याना कोण बघते?)
"एकटी सर्व्हंट आसां. सकाळी येऊन सांची वतां." (एक सर्व्हंट आहे. सकाळी येऊन संध्याकाळी जाते.)
"व्हय गो, तुगेलो बाम्मुण कसलं करतां?"
यावर मी त्याच्याकडे आ वासून बघत राहिले. त्याचे बोलणे समजून घेताना माझे डोके बंद होणार हे माझी स्टाफमधली नवी मैत्रीण वीणा समजून होती. ती त्याच्याच गावची. लग्न होऊन गोव्यात येऊन तिला बरीच वर्षे झालेली. त्यामुळे गोव्यात चांगली मुरली होती. ती शेजारीच बसली होती. "अगो, बाम्मुण म्हळ्यार घो" (अग, बाम्मुण म्हणजे नवरा) म्हणत ती हसत सुटली. मलासुद्धा हसायला येऊ लागले. "मजो घो पाळे ब्रँच स्टाफ आसां" (माझा नवरा पाळे ब्रँच स्टाफ आहे.)
"मोगान लग्न कित गो!" (प्रेमाचे लग्न की काय गं?)
"हय, म्हणून बँकेन आमका हांगा येऊपाची पनिशमेंट दिल्या." (होय, म्हणून बँकेने आम्हाला इथे यायची पनिशमेंट दिली आहे) म्हटले.

तेवढ्यात काम संपले. घर तसे जवळ असल्याने आम्हाला बायकांनासुद्धा संध्याकाळी फ्रेश वगैरे व्हायची गरज वाटत नसे. मात्र पड्यारमाम ही अजब वल्ली होती. पाच वाजले की वॉशरूममधे जाऊन त्याचा सेंट-पावडरसह साग्रसंगीत मेकप व्हायचा. आम्ही त्यावरून त्याची किती वेळा चेष्टा केली असेल, पण त्याला ढिम्म फरक नव्हता.
हळूहळू सगळ्या स्टाफशी ओळख झाली. काही जण माझ्या आधीपासून ओळखीचे होते. अंजनीसोबत मी आधी म्हापश्याला काम केले होते. तीही खूप हुशार, पण काम पटापट करून बाहेर पडायच्या फिकिरीत. ते कसं होतंय हे बघायची भानगड नाही. आणि कमालीची फटकळ. तिची सगळीकडे सुपर घाई. तर पड्यारमाम कुठे एक शब्द बोलायला मिळाला की अर्धा तास बोलतच बसणार. मग तिकडे कोण कस्टमर ताटकळत बसू दे की स्टाफ चेकिंगला ये म्हणून बोंबलत बसू दे. हा आपले बोलणे संपवूनच उठणार. मारियान म्हणून एक कॅथॉलिक शिपाई होता. तोही एक नमुनाच. पड्यारमामची मंगलोरी कोंकणी आणि मारियानची साष्टीची कॅथॉलिक कोंकणी यांच्यामध्य आमच्या बाकी लोकांच्या कोंकणी अध्येमध्ये अंग चोरून कुठेतरी उभ्या राहायच्या.

पड्यारमामची पेंडिंग कामांची एक पुस्ती होती. सकाळी स्ट्राँगरूम उघडताना रोज पड्यारमाम धार्मिकपणे ती पुस्ती बाहेर काढायचा. त्यात लोकांचे सह्या घेऊन ठेवलेले लोन अ‍ॅग्रीमेंट्स, त्याने सह्या करायचे उरलेले फॉर्म्स, बँकेच्या हेडऑफिसची न वाचलेली सर्क्युलर्स असे काय काय जादुई म्याटर असायचे. बोलण्याच्या नादात यातले काहीच त्याच्या हातून व्हायचे नाही आणि संध्याकाळी ती पुस्ती आणखी चारदोन कागद घेऊन परत आत जायची! पड्यारमामची पेंडिंग पुस्ती हा आमचा कायमचा चेष्टेचा विषय होता. तो मात्र त्याबद्दलची चेष्टा मनाला लावून घेत नसे.

हळूहळू आपण ऑफिसरांना आणि बाकी क्लार्कांना कामाला लावले पाहिजे, हे मॅनेजरने त्याच्या गळी उतरवले. अंजनी आपले काम संपवून बडबड करत बसायची किंवा मग घरी जाते म्हणून निघून जायची. एक दिवस पड्यारमामला काय वाटले कोणास ठाऊक. संध्याकाळी सेव्हिंगचे काम संपल्यावर त्याने अंजनीला हाक मारली.

"व्हय गो अंजनी, कस्सलं करतां तुव्व?" (ए अंजनी, काय करते आहेस?)
"काई ना पड्यारमाम, कस्सलं काम करकां व्हय?" (काही नाही पड्यारमाम, काही काम करायचं आहे का?)
"हय गो, ह्ये लोन अ‍ॅग्रीमेंट चिक्के बरोवन दी पळोवया." (हे लोन अ‍ॅग्रीमेंट जरा भरून दे बघू.)
"दी हाड पळॉवया. पुणि कशी बरोवकां ते? हांवे जन्मात असले काम केले ना." (दे बघू. पण कसे लिहायचे ते? मी जन्मात कधी असले काम केलेले नाही.)
पड्यारमामने लगबगीने आत जाऊन तिला दुसरे एक अ‍ॅग्रीमेंट आणून दिले.
"घे. आसां तश्शी बरय." (घे, आहे तसेच लिहून काढ.)
तिने पटापट लिहून दिले. आणि पाच वाजले तसे आम्ही घरी पळालो.
दुसर्‍या दिवशी बॅंकेत आले, तर पड्यारमाम काउंटरवर कपाळाला आठ्या पाडून चश्मा नाकावर ठेवून चश्म्याच्या वरून अंजनीकडे रागाने बघत असलेला सापडला. रीडिंग ग्लासेस नाकावर ठेवून तो नेहमी त्याच्या वरून समोरच्याकडे बोलायचा. तेही जाम मजेशीर दिसे.

"कन जालें?" (काय झाले?) वीणा म्हणाली.
"वय गो, हिका हांवे कस्लं सांगले? तू अ‍ॅग्रीमेंट आस्स्सा तश्शे बरय. हिणे तश्शे बरोवचें वय? मात तरी माथे युज करच्या नजो?" (अग, मी हिला काय सांगितले, आहे तसे लिही. तिने अगदी तसेच्या तसे लिहायचे का? जराही डोके वापरू नये?)
"गलाट नाका. तुवें सांगला तश्शी हांवे सरसरी बरयलां. माका तुवें समां सांगका अशिले. मगली काय मिश्टेक ना." (ओरडू नको. तू जसे सांगितलेस तसेच मी भराभर लिहिले. तू मला नीट सारखे काय ते सांगायचे होतेस. माझी काही चूक नाही.) इति अंजनी ठामपणे.

मी अ‍ॅग्रीमेंट हातात घेऊन बघितले. जुन्या अ‍ॅग्रीमेंटची कॉपी म्हणजे I XYZ son of ABC residing at H. No. Kavlem Goa वगैरे सगळे तिने जसेच्या तसे - एक अक्षराचा फरक न करता लिहिले होते. दोन्हीत फरक एवढाच की त्यावर सह्या वेगवेगळ्या माणासांच्या होत्या! ते बघून मी पोट धरून हसायला लागले. बाकी सगळ्यांना कळताच आख्खी बँक खुर्चीतून खाली पडायच्या बेताला आलेली. त्या सगळ्यांसोबत पड्यारमामसुद्धा मग आपला राग विसरून मोठ्याने हसायला लागला! कहर म्हणजे तिने काय लिहिले हे न बघताच पड्यारमामने आपली सही करून अ‍ॅग्रीमेंट पेपर मॅनेजरला नेऊन दिले होते आणि तिथे अर्थातच त्याची छान तासंपट्टी झाली होती. पण सगळे हसले, तसे पड्यारमाम ते लगेच विसरला! हा "असा तश्शी बरय"चा किस्सा त्या ब्रँचमध्ये लिजंडरी होऊन राहिला आहे.

पड्यारमाम तसा भारी चिकट. मुद्दाम पैसे खर्च करून फार तर कोणाला चहा कधी द्यायचा इतकेच. सगळा स्वयंपाक घरी व्यवस्थित करून नीट डबा घेऊन बँकेत यायचा. त्याच्यामते काही खास केले असेल तर आम्हाला त्यातले नमुने चाखायला मिळत. त्याच्यामुळेच घशी, बेंदी, आंबट, वाळी भाजी, साँग वगैरे पदार्थांशी ओळख झाली. संध्याकाळी स्लिपा चेक करता करता "पड्यारमाम, आयज किते रांधले तुवें?" (पड्यारमाम आज काय स्वयंपाक केलास?) म्हटले की हातातल्या स्लिपा तिथेच राहायच्या आणि पड्यारमाम त्या दिवसाच्या पदार्थाची रेसिपी सुरू करायचा. त्यातला एखादा पदार्थ घरी केला तर नवरा कधीतरी आवडीने खायचा, कधीतरी त्याला त्या एकसारख्या वाटणार्‍या मसाल्यांचा वैताग यायचा.

एकदा त्याने कसले तरी डोसे हल्दी म्हणून सांगितले. सगळ्या डाळी भिजत घालून वाटून काहीतरी प्रकार होता. वीणा त्याच्या गावची असून तिला माहीत नसलेला प्रकार होता. तिने मोठ्या उत्साहाने ते डोसे करून नवर्‍याला खायला घातले. तो मरणाचा फटकळ. त्याने एक घास तोंडात घातला आणि तो वैतागला. "ह्ये कसलं केलं गो तुवे! वच तेकड! त्या पड्यारमामाकच व्हरून दी ते दोसे!" (हे काय केलंस गं तू! जा पळ, त्या पड्यारमामालाच तुझे डोसे नेऊन खाऊ घाल!"

झालं होतं असं की कृती सांगताना पड्यारमाम मीठ घाल हे सांगायला विसरला होता. वीणाने किती शिव्या दिल्या, तरी त्यानंतरही त्याचे रेसिपी सांगणे बंद झाले नाहीच! विचारले की त्याचे सुरू व्हायचे. "एक बटाट घेउका, एक पियांव घेउका..." (एक बटाटा घ्यायचा, एक कांदा घ्यायचा....) हे काही काही त्याचे टिपिकल मंगलोरी कोंकणीतले शब्द तो बोलायचा. त्याला पर्यायी गोव्यात काय म्हणतात ते त्याला आठवायचे नाही. मग वीणा कायमची दुभाष्या. इंग्लिश प्रतिशब्दही त्याला पटकन आठवायचे नाहीत. मग हातवारे करून काही असेल, पण त्याचे बोलणे कधी थांबायचे नाही. येईल ती भाषा धडकून बोलत जाणे हा मोठाच गुण त्याचा. फक्त हिंदीत बोलायची वेळ आली की मात्र जाम गोंधळ व्हायचा. आणि बरेचदा ती वेळ यायची, कारण येणार्‍या कस्टमर्सना त्याची कोंकणी नीट कळायची नाही. मग एखादा हप्ता चुकवणार्‍या कोणा धनगराशी पड्यारमाम हिंदीत वाद घालायचा. ते मोठे मजेशीर प्रकरण असायचे. आम्ही स्टाफ एकीकडे हसून लोळतोय, मध्ये गोंधळ वाढवायला मारियानची साष्टीची कोंकणी. शेवट मॅनेजर शुद्ध मराठी बोलून सगळ्यांची सुटका करायचा.

कस्टमर पैसे पुढच्या वेळी भरतो म्हणून मुंडी हलवत गेला की पड्यारमाम डोळे मिचकावत हसून म्हणायचा, "पळयले वय! हांका अश्शी जोर करका. जाल्यार ते पैशे भरतले. " (यांना असेच ओरडले पाहिजे, तरच ते पैसे भरतील.) त्याच्या रिकव्हरीची पद्धत बघून रिकव्हरी एजंटांनीसुद्धा तोंडात बोट घातले असते!

एक दिवस संध्याकाळची गोष्ट. एका मोठ्या कॅश क्रेडिटचे रिन्युअल पुरे झाले होते. नियमाप्रमाणे सगळ्या लोन पेपर्सची एक कॉपी रिजनल ऑफिसला पाठवायची असते. मारियानने पेपर्सच्या झेरॉक्स कॉप्या करून आणल्या. त्या सॉर्ट करून झाल्या. आम्ही आपापल्या कामात बिझी होतो. जरा वेळाने मारियानने एक गट्ठा काउंटरवर आणून ठेवला.

"अय शरद, मातसो लक्ष दोर. हांव फस्का हाट्टां." (शरद, जरा लक्ष ठेव. मी काडेपेटी आणतो.)
"फस्कां कित्या रे?" (काडेपेटी कशाला रे?)
"पड्यारमाम पिसावलो. हांये ह्ये पेपर्स आता झेरॉक्श कोरुनू हाडल्याइ आनि व्हो माका ते पेटय म्हन सांगतां. माका कितें हा? हाव फस्का हाड्नु उजो घालतां." (पड्यारमाम येडा झालाय. आता मी झेरॉक्स करून आणल्यात आणि हा ते 'पेटव' म्हणून सांगतो. मला काय करायचंय? मी काडेपेटी आणून आग पेटवतो.)
"ए, रांव रांव रांव!" (ए, थांब, थांब, थांब!)
बोलता बोलता शरद आणि वीणा खुर्चीतून पडायला आले. पड्यारमामने "पेटय" म्हणजे मंगलोरी कोंकणीत 'पाठव' असे सांगितलेले. मारियान ते गोव्याच्या कोंकणीत 'आग लाव' असे समजला होता! झाले! दोघांची पुन्हा जुंपली आणि मग सगळेच हास्यकल्लोळात बुडून गेले.

मग हळूहळू सगळ्याना मंगलोरी कोकणीची सवय झाली. इतकी की मारियान माझ्या नवर्‍यालासुद्धा कामत माम म्हणायला लागला! खरे तर माम म्हणायची पद्धत मंगलोरची. आदरार्थी माम आणि माई असे संबोधन वापरतात. गोव्यात असे काही म्हणायची पद्धत नाही. पण पड्यारमामची चेष्टा करता करता सगळेच आधी गंमत म्हणून आणि मग सवयीने मंगलोरी कोंकणी बोलू लागले. मी तर इतकी फ्लुएंट बोलायचे की नंतर आलेल्या मंगलोरच्या लोकांना मी त्यांच्या गावची म्हणून जास्तच आपुलकी वाटायची.

पड्यारमाम अतिशय भाविक. आणि शांत. एखाद्याने किती शिव्या दिल्या तरी त्याच्याशी भांडणे त्याला कधी जमले नाही. कवळे मठाच्या स्वामींच्या पाया पडताना त्याला खूप आनंद व्हायचा. स्वामींना भेटल्यानंतर त्याचा चेहरा अगदी भाविकतेने फुलून यायचा. चिकित्सक मी, छुपा नास्तिक शरद पेंडसे कधीही त्याचा आनंद हिरावून घेऊ शकलो नाही. आपण लहान असताना मठाच्या मालकीच्या आंब्याच्या कैर्‍या पाडल्या की जुने स्वामी कसे घाण शिव्या देत अंगावर यायचे, याची स्टोरी एक जण सांगत होता तेव्हाही पड्यारमामची श्रद्धा कमी झाली नाही.
संतापून कोणाला कधी पड्यारमाम फडाफड बोलतोय असे झाले नाही. चुकीचे काही दिसले की आरडाओरड करणारी युनियन कार्यकर्ती मी, जिभेच्या जागी तलवार असलेला शरद पेंडसे, सरळ स्वभावाची आणि तिरकस बोलणारी वीणा, कडक मॅनेजर आणि काही कामचुकार पण जिभेवर साखर पेरलेले नमुने असली सगळी ब्रँचमधली सर्कस, जन्मात पहिल्यांदाच मिळालेले प्रमोशन, संपूर्ण नवे गाव, भाषा या सगळ्याशी जमवून घेत पड्यारमाम कसा राहिला होता, देव जाणे! आणि तरीही सतत चेहर्‍यावर खरेखुरे हसू बाळगणे सोपी गोष्ट नव्हती.

यथावकाश पड्यारमामची एक टर्म शिल्लक राहिली आणि मग त्याच्या गावाला त्याची ट्रान्सफर झाली. जातानाही पड्यारमाम आनंदाने सगळ्यांचा निरोप घेऊन गेला. नंतर एक-दोन वेळा तो ब्रँचमध्ये येऊन गेल्याचे कळले. पण तेव्हा मी पणजीला असल्याने भेट झाली नाही. आता पड्यारमाम पंचाहत्तरीला पोहोचला असेल.

कधीतरी पड्यारमामच्या गावाला जायचे आहे. पड्यारमाम आनंदाने स्वागत करील. "जाणतेली जाली मगो तुव्व" (म्हातारी झालीस ना गं तू!) म्हणेल. वर "खुशाल केली हां!" (चेष्टा केली हां.) त्याच्या गावाला जाऊन आता पंचाहत्तरीला पोहोचल्यावरही पड्यारमाम पावडर तश्शीच फासतो का, हे बघायचे आहे आणि मुख्य म्हणजे त्याचा 'सुखी माणसाचा सदरा' बघायचा आहे पुन्हा एकदा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नर्मदे हर!!

Earth’s Children

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर