एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर

फतेहपूर सीकरी
मुलं लहान असताना त्यांना घेऊन जमेल तसे फिरत होतो. २००५ मधे दिवाळीच्या आधी सुटी घेऊन दिल्ली वारी करू म्हटले. दिल्लीला जायचे म्हटल्यावर ८० वर्षांचे सासरे बरोबर येतो म्हणाले. त्यांची दोघांचीही तिकिटे काढली. हॉटेल्स दिल्लीत जाऊन बघू म्हटले. दोन म्हातारे आणि दोन मुले बरोबर असल्याने फार काही बघून होणार नाही हे माहीत होतेच. त्याप्रमाणे दिल्ली, आग्रा, मथुरा, फतेहपूर सीकरी एवढाच प्लॅन ५ दिवसांसाठी ठरवला.
जुनी दिल्ली, लाल किल्ला, म्युझियम वगैरे पाहिले. मथुरा वृंदावन, आग्रा किल्ला, ताजमहाल हे बघून झाले. हॉटेलवाल्याने गाडी ठरवून दिली होती तो ड्रायव्हर मुस्लिम होता. अतिशय अदबशीर ऊर्दू-हिंदी बोलणारा आणि व्यवस्थित माणूस. पान सिगारेट काही व्यसन दिसले नाही. ग्रँड ट्रंक रोडवर दरोडे वगैरे घातले जातात असे काहीबाही सांगत होता. फतेहपूर सीकरीला जाताना किल्ल्याजवळ पोचताच ५/६ टपोरी पोरांनी गाडीच्या मागून पुढून धावत गाडीला अक्षरशः घेरले. दोघेजण गाडीच्या बॉनेटवर चढले. शेवट ड्रायव्हरने गाडी थांबवली. पोरे एकूण 'अवतार' दिसत होती. ऊर्मट भाषेत आम्ही गाईड आहोत, किल्ला दाखवू म्हणाले. ड्रायव्हर काही बोलेना. दोन म्हातारे आणि दोन मुले बरोबर असताना विरोध तरी कसा करणार?
नशिबावर भार टाकून त्यांच्याबरोबर गेलो. त्यानी सलिम चिश्तीच्या दर्ग्यात नेले. तिथे चादर चढवा म्हणून त्या चादर विकणार्‍याला दीडशे रुपये देणगी झाली, फुले सब्जा वगैरे झाले. आणि मग त्या पोरांना खंडणी दीडशे रुपये दिल्यावर परत त्यांनी गाडीकडे आणून सोडले. गाडी सुरू झाल्यावर ड्रायव्हर म्हणाला "साब, असली किला आगे दूसरे दरवाजे से जाकर मिलेगा" पुन्हा आता असलाच प्रकार आहे का म्हणून जीव मुठीत धरून बसलो. पण नाही. तिकडे गेल्यावर खरा किल्ला, जोधाबाई महाल, दरबार वगैरे बघायला मिळाला. पण साक्षात दिल्लीच्या जवळ गाईडच्या नावाखाली अशी लुटालूट कशी काय चालू देतात हा प्रश्न पडला. ड्रायव्हरही त्या प्रकारात सामील असावा का शंका आलीच, पण हा प्रकार होऊन गेल्यावर आता काय उपयोग होणार होता? तीनशे रुपये अक्कलखाती खर्च समजून गप्प बसलो. मात्र इतर ट्रिप छान झाली त्यामुळे एक गालबोट एवढेच म्हणून दुसर्‍या दिवशी शॉपिंगला आणि चांदनी चौकात जायचे ठरवले.
-------------------
दिल्ली
चांदनी चौकात एक दहा मिनिटे भयानक टेन्शनची गेली. झालं काय की तिथल्या प्रसिद्ध गुरुद्वारासमोर आम्ही जरा रेंगाळलो तेवढ्यात सासरे आणि सासूबाई गायब!! जिवाचे पाणी झाले. त्याना हिंदी काही समजत नाही. सगळ्या बाजूंना माणसांचा अफाट सागर. धनत्रयोदशीचा दिवस, संध्याकाळ. सगळी दिल्ली शॉपिंगसाठी बाहेर पडलेली. शोधायचे तरी कुठे? मुलाचे प्रसंगावधान तेवढ्यात कामाला आले. तो म्हणाला आजोबा आपल्या पुढे या फूटपाथवर चालत पुढे होते. त्यांच्यासोबत आजी पण होती. नवरा अक्षरशः धावत त्या दिशेने गेला. एका सिग्नलसमोर फूटपाथच्या टोकाला दोघेही उभे सापडले! (माझ्या सासर्‍यांना असे कोणी सोबत आहे का नाही न बघता चालत सुटायची सवय आहे) तिथल्या ट्रॅफिकमधे रस्ता क्रॉस करायची हिंमत त्यांना झाली नाही हे नशीब.
शॉपिंग वगैरे विचार कॅन्सल करून आम्ही परत पहाडगंज एरियातल्या हॉटेलवर आलो. हॉटेलच्या बाहेर वातावरण जरा विचित्र वाटले. लोक काळजीत दिसत होते आणि घाईघाईत इकडून तिकडे जात होते. बहुतेक हॉटेल्स आणि दुकाने बंद होती. जरा टेकतोय तेवढ्यात भावाचा फोन आला, "तुम्ही कुठे आहात? सगळे सुरक्षित आहात ना?" काय झालं म्हणून विचारले तर टीव्ही लाव म्हणाला. पहाडगंज भागात बॉम्बस्फोट झालाय. अजून कुठे कुठे बाँबस्फोट झालेत आणि चांदनी चौक भागात एक बॉम्ब पकडला गेलाय. अरे देवा!
आम्ही राहिलो होतो तिथून २ रस्ते ओलांडून पलिकडच्या गल्लीत बाँबस्फोट झालेला. चांदनी चौक मधून आम्ही निघालो त्यानंतर अर्ध्या तासात तिथेही एक बाँब डिफ्युज केला होता! सासरे दुसर्‍या खोलीत विश्रांती घेत होते. त्यांना ब्लडप्रेशरचा त्रास आणि अनोळखी गावात उगीच टेन्शन नको म्हणून काही सांगितलेच नाही. रात्री हॉटेलचे रेस्टॉरंट बंद होते. बरेचसे चालून एक बंगाली खानावळ उघडी सापडली. तिथे पटापट मिळाले ते जेवून परत येऊन झोप काढली. सासरे जरा त्या जेवणाबद्दल कुरकूर करत होते, पण ते फक्त ऐकून घेतले. दुसर्‍या दिवशी ऑगस्ट क्रांतीने परत यायची तिकिटे काढली होती.
संध्याकाळपर्यंतचा वेळ कसातरी काढला. बाहेर कुठे जाणे शक्य नव्हतेच. गाडीत पेपर बघताना सासर्‍यांना समजले की दिल्लीत बाँबस्फोट झाले. मुंबईला नणदेच्या घरी पोचल्यावर ते गप्पा सांगत होते, दिल्लीत असे बाँबस्फोट झाले तसे झाले, तेव्हा मुलगा म्हणाला, "काय आजोबा, दिल्लीत असताना तुम्हाला स्फोट झाले हे कुठे माहीत होते?" :D हा आमचा बॉम्बस्फोटांचा सर्वात जवळून घेतलेला अनुभव. प्रत्यक्षात ज्यांना असे कुठे दुर्दैवाने स्फोटाच्या किंवा दहशतवादाच्या तडाख्यात सापडून त्रास होत असेल त्याची किंचित का होईना कल्पना मात्र तेव्हा आली.
--------------------
बंगलोर - म्हैसूर
२००६ साली म्हैसूर, बंगलोर ऊटीला जायचे ठरले. बंगलोर पर्यंत रेल्वेची तिकिटे आयआरसीटीसीवरून विनासायास काढली. मात्र हॉटेल आणि तिथल्या लोकल साईट सीइंगची व्यवस्था तिथे गेल्यावर करू म्हणून निवांत राहिलो. गेल्यावर बंगलोरमधे हॉटेल चांगले मिळाले. म्हैसूर बघायचे आहे केटीडीसी च्या बसची तिकिटे कुठे मिळतील म्हणून हॉटेलवाल्याला विचारले. तर इथेच शेजारी ऑफिस आहे म्हणाला म्हणून आम्ही बुकिंग केले. ऑफिस लहानसे होते. आणि प्रवासाची तिकिटे हातात पडली त्यावर दादा ट्रॅव्हेल्स असे नाव! बाहेर येऊन पाहिले तर केटीडीसीचा बोर्ड!! हा काय प्रकार म्हणून विचारले तर "इदर ऐसाच रहता" हे उत्तर तिथल्या माणसाने दिले.
हे सगळे काही बरोबर वाटेना. संध्याकाळी पुन्हा तिकिटे कॅन्सल करावी म्हणून गेलो तर तिथे दुसराच कोणीतरी गुंडासारखा दिसणारा माणूस बसलेला. त्याची हिंदी अजून दिव्य. पण अर्थ समजला. तिकिटे कॅन्सल होणार नाहीत. तुम्हाला नको तर येऊ नका. पैसे परत मिळणार नाहीत हे समजले. आता असो. काय फसवणूक करतील? एखादे दुसरे ठिकाण दाखवणार नाहीत. असे ना का! जाऊ म्हणून दुसर्‍या दिवशी सकाळी सांगितल्या ठिकाणी भरभर आटपून हजर राहिलो. आठाचे नऊ झाले, नऊचे दहा झाले तरी बसचा पत्ता नाही! शेवट साडेदहाला एकदाचा एक बसनामक प्रचंड आवाज करणारा खटारा आला. इतका उशीर म्हटल्यावर माझे डोके आधीच गरम झाले होते.
बस अजून उशीर उशीर करत काही ठिकाणे दाखवून चालत होती. त्या बसवाल्यांची जेवणाची ठिकाणे ठरलेली असतात. तिथे पोचायला दुपारच्या दीडऐवजी पावणेचार झाले. प्रवासात असल्याने काही च्याव म्याव बरोबर होतं. पण माझ्या मुलाला पहिल्यापासून वेळेवर व्यवस्थित जेवायची सवय. त्याला खूप भूक लागलेली. त्याचे कळवळणे बघून मला रडू फुटले. आधीच केटीडीसीच्या नावाचा वापर करून फसवणूक झाली म्हणून डोक्यात संताप खदखदत होता. त्यात सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मुलाचा त्या दिवशी वाढदिवस म्हणून आम्ही ती ट्रिप आखली होती!
माझा सगळा संताप टूर गाईडवर निघाला. त्याला म्हटले, वेळेवर गाडी जेवायला का थांबवली नाही? तो म्हणे की आमची ठरलेली हॉटेले असतात. त्या दिवशी मी त्यालाच नव्हे, त्याच्या मुलांना शाप दिला. म्हटले, तुला मुले आहेत? माझ्या मुलाला वाढदिवसाच्या दिवशी तुझ्यामुळे उपाशी रहावे लागले, तुझी मुले पण उपाशी राहतील. त्याच्या चेहर्‍यावर एकच अर्धा क्षण चलबिचल दिसली. पुन्हा काहीच झाले नाही असा तो निगरगट्टपणे पुढे चालता झाला.
संध्याकाळी परत यायला उशीर झाला. सगळ्या दिवसाची वाट लागली होती. भुकेमुळे कोणाला काय पाहिले त्यातही इंटरेस्ट राहिला नव्हता. फसवणुकीमुळे अपमान, निराशा आणि असल्या सगळ्या निराश भावना घेऊन ती म्हैसूर ट्रिप पार पडली. दुसर्‍या दिवशी ऊटीला जायचे होते. सुदैवाने दादा ट्रॅव्हेल्सकडे बुकिंग केले नव्हते. आम्हीच दुसर्‍या एका बसने गेलो आणि कोणत्याही अपघाताशिवाय बंगलोरला परत आलो. मैसूरच्या दादा ट्रॅव्हेल्सच्या अनुभवावर जरा उतारा मिळाला. चांगली गोष्ट म्हणजे ऊटीहून परत येताना बसमधे मुंगारु मळे चित्रपटाची अतिशय गोड गाणी पहिल्यांदाच ऐकायला मिळाली!
नंतर इकडे तिकडे बोलताना कळले की बंगलोरमधे कसल्याही चिंधी ट्रॅव्हेल्सनी केटीडीसीचे बोर्ड लावून लुटालूट चालवली आहे. आणि केटीडीसीही त्याच्याकडे काणाडोळा करते. आता या गोष्टीला १० वर्षे झाली. आताची परिस्थिती काय माहीत नाही.
-------
उत्तर असो की दक्षिण आपण भारतीय प्रवाशांची फसवणूक आणि प्रेक्षणीय स्थळांच्या जवळ गुंडगिरी यात सगळीकडे सारखेच आहोत! आता हॉटेल बुकिंग आणि लोकल साईट सीइंग सगळे ऑनलाईन आणि सोपे झाल्यामुळे एवढी फसवणूक होत नसेल. पण जे असे ऑनलाईन बुकिंग करू शकत नाहीत, त्यांची परिस्थिती मात्र कठीण वाटते. प्रवासात अनेक चांगले अनुभवही आले. मुलगा अगदी लहान असताना भाषा सुद्धा न कळणार्‍या केरळी हॉटेलवाल्यांकडून वेळोवेळी गरम पाणी, दूध, दूधभाताची व्यवस्था होणे असो की कोणी आजारी पडल्यावर अनोळखी गावात जुन्या डॉक्टरने नीट समजून उपचार करणे असो. आंबटगोड अनुभव सगळीकडे येणारच. मात्र हे फसवणुकीचे दोन अनुभव सांगावेत असे वाटले, कारण एरवी आपण खाजगी कंपन्यांचे काम सरकारी कंपन्यांपेक्षा चांगले असे समजतो, पण प्रवासाच्या क्षेत्रात मात्र सरकारी कंपन्याच उत्तम. कारण गाड्या वेळेत सुटतात, वेळेत पोचतात. आपल्याला किती पैशात काय मिळणार आहे याची सुरुवातीलाच कल्पना असते. व्यवहारात पारदर्शकता महत्त्वाची. इथे गोव्यात येणार्‍यांना मी नेहमी सरकारी गोवा टुरीझमच्या हॉटेल्सची शिफारस करते ती याचसाठी. तिसरा अनुभव म्हणजे दहशतवादाशी लांबून ओळख झाली ती एवढी घाबरवणारी होती, की ज्यांना सहन करावे लागत असेल त्यांच्या हालांची पुसट तरी कल्पना आपल्याला असावी.

किल्ला चित्रपटाच्या निमित्ताने..

1

रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात. चित्रपट प्रदर्शित होऊन आता बरेच दिवस झालेत त्यामुळे कथेचा काही भाग इथे त्यानिमित्ताने मनात आलेले विचार लिहिताना आला तर तो स्पॉयलर ठरू नये.
चित्रपटात फोनचा वापर, मुलांचे सुटीतले उद्योग आणि एका प्रसंगात ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवणे हा प्रकार पाहता चित्रपट कथा १९९४-९५ च्या दरम्यान घडत असावी असे वाटते. चिनूच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्याच्या आईची बदली पुण्याहून गुहागरसारख्या एका लहान गावात झाली आहे. तिला ऑफिसात तिच्या स्वतःच्या अडचणी आहेत. चिनूला नवीन जागेत कोणी मित्र नाहीत. मामा आणि मामेभाऊ यांच्या ओळखीच्या सुरक्षित जगातून तो एकदम नव्या जागेत वेगळ्या वातावरणात येऊन पडला आहे. आपल्या मुळापासून उखडले जाणे आणि एकाकीपणा याचा त्याला आयुष्यात प्रथमच सामना करावा लागल्याने तो भांबावतो आणि आणि आपली नाराजी 'हे आवडत नाही, ते आवडत नाही' असे करून आईला दाखवून देतो. दोघांनाही या परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड जाते आहे.
शाळेतल्या काही टग्या मुलांच्या ग्रुपशी चिनूची मैत्री जमू पाहते. तो स्वभावाने तसा थंड आहे, त्या मुलांनी कुत्र्याना त्रास देणे वगैरे प्रकार त्याला आवडत नाहीत. पण दुसरे कोणी मित्रही नाहीत. त्या मुलांशी काहिसे जमते तोपर्यंत त्या मुलांसोबत एका निर्जन किल्ल्यावर गेलेला असताना वादळ पावसात ते मित्र त्याला एकटा सोडून जातात आणि या प्रकाराने तो पुरता हादरून जातो. एकदा वेळ घालवण्यासाठी एका मासेमारी लाँचवरून तो खोल समुद्रात जातो. तिथे आणि किनार्‍यावर शेकोटीपाशी त्या मासेमारासोबत चिनूचा तुटपुंजा संवाद त्याला घरी आई आहे, सगळेच हरवले नाही याची जाणीव करून देतो आणि चिनू घरी येऊन आईला घट्ट गळामिठी मारतो तो हलवून टाकणारा क्षण आहे. तेव्हाच बंड्या हा त्याचा उनाड मित्र त्याला दिवसभर शोधत होता हे समजून येते आणि चिनू विरघळतो. परीक्षा संपताना त्यांची मैत्री पक्की होते आणि मग पुढचे काही दिवस ते खूप मजेत घालवतात.
नेमके तेव्हाच चिनूच्या आईची पुन्हा गुहागरहून सातार्‍याला बदली होते. सिनेमाच्या सुरुवातीला आईला "ही बदली रद्द नाही का होणार?" असे विचारणारा चिनू पुन्हा तोच प्रश्न विचारतो. मात्र यावेळी तो तेवढा उदास नाही. सातार्‍याला जाऊन बासरी शिकेन असे तो आईला सांगतो आणि सामान आवरायला उत्साहाने मदतही करतो. आपल्याला सतत असे विस्थापित होऊन दुसरीकडे जावे लागेल हे कदाचित त्याला आता उमजले आहे. आधीच समजूतदार असलेला चिनू अधिकच शांत झाला आहे.
चित्रपटाच्या शेवटच्या भागात चिनूला मित्र खर्‍या अर्थाने मिळतात मात्र त्याना सोडून त्याला लगेच पुढे जावे लागते. प्रत्यक्षात सुरुवातीला ज्या किल्ल्यावर वादळ पावसात त्याचे मित्र त्याला एकटा सोडतात त्या किल्ल्यावर चिनू पुन्हा जाऊ शकत नाही पण चित्रपट संपताना त्याच्या मनातल्या किल्ल्यावर मात्र वादळाचा मागमूस नाही. फुलं, पक्षी आणि लख्ख ऊन असलेल्या किल्ल्यात त्याचे मित्र मजेत बसलेले आहेत. आयुष्य पुढे निघून गेलं तरी त्याच्या मनातले त्याचे मित्र तिथेच तसेच असतील.
एक प्रसंग दीपगृह पाहण्याचा. त्याचे वर्णन चिनू मित्रांकडे करतो ते मुळातून ऐकण्यासारखे. दीपगृहाच्या पायर्‍या चढताना खूप त्रास होतो मात्र वर पोचल्यावर छान वाटते, एखादी बोटही दिसते; हेच सूत्र किल्ल्याच्या प्रसंगातही वापरले आहे. किल्ल्यातल्या भुयारात असताना चिनू प्रकाशाच्या दिशेने जायला निघतो पण विजेच्या कडकडाटाला घाबरून पुन्हा मागे पळतो आणि मग मित्रांपासून दुरावतो. शेवट मात्र त्याच भुयारातून वर आल्यावर त्याला त्याचे मित्र आपल्याच नादात बसलेले दिसतात. तीच जागा आणि तेच मित्र. फरक फक्त पायर्‍या चढून येण्याचा आहे. मात्र आता ते मित्र त्याला पाठमोरे असतात. कदाचित आपल्याशिवाय त्यांचे आयुष्य पुन्हा पहिल्यासारखे सुरू आहे याची चिनूला जाणीव होते.
शेवट चिनू सातार्‍याला जायला निघतो तो त्याने माया लावलेला भटका कुत्रा आणि सायकल बंड्यापाशी सोडून. एरवी कुत्र्यांचा कर्दनकाळ असलेला बंड्या आता मात्र त्या कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसतो. हा चिनूमुळे त्याच्यात घडून आलेला बदल आहे. कदाचित कुत्रा आणि सायकल हे दोन दुवे मित्रासोबत कायम ठेवून चिनू सातार्‍याला जातो आहे, कदाचित तो त्यांच्यानिमित्ताने पुन्हा कधीतरी गुहागरला येईलही. चिनूच्या आधीच्या आठवणींमधे आता किल्ला आणि गावातले मित्र यांची भर पडली आहे. आयुष्यातल्या अनेक थांब्यांवर आपण आपल्या आठवणी अशाच कोणाजवळ ठेवून पुढे जातो, आपल्याला जावे लागते आणि त्यांच्या आठवणी फक्त आपल्यासोबत येतात.
सबंध चित्रपटात एक उदासवाणे वातावरण भरून राहिले आहे. पाऊस आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातला ओळखीचा निसर्ग ही या चित्रपटातली पात्रेच आहेत. चिनूची भूमिका करणारा अर्चित देवधर, बंड्या झालेला पार्थ भालेराव आणि अमृता सुभाष आपापल्या भूमिका अक्षरशः जगले आहेत. पण चित्रपटातल्या इतर कलाकारांनीही अतिशय नैसर्गिक अभिनय केला आहे. हे यश दिग्दर्शक अविनाश अरूण याचे. त्याचा पहिलाच चित्रपट आहे हे ऐकल्यावर खूपच कौतुक वाटले. प्रत्येक दृश्यात त्याच्यातला सिनेमॅटोग्राफर दिसतो. दुर्दैव की या चित्रपटाला डिस्ट्रिब्युटर्स मिळत नव्हते. बर्लिन चित्रपट महोत्सवात यश मिळाल्यानंतर चित्रपट वितरित होऊ शकला.
चित्रपटाच्या स्थळ-काळाचा विचार करता चित्रपटातली बोलीभाषा आणि काही पात्रांच्या कपड्यांचा नीट विचार करून वापर करणे अपेक्षित होते. पण नवीन दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट असल्याने तेवढ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येते. त्याचवेळी चित्रपटातले अनेक प्रसंग पाहताना त्याला दाद दिल्याशिवाय रहावत नाही. वेळ घालवण्यासाठी चिनूने ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवून पुन्हा कॅसेटमधे गुंडाळण्याचा प्रसंग पाहून एकाच वेळी हसू येत होते आणि भावुकही व्हायला होत होते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यातल्या आठवणींच्या किल्ल्यावर परत नेणारा हा चित्रपट पाहताना कितीदा डोळे भरून आले सांगता येणार नाही.
अशाच अर्ध्या कच्च्या वयातल्या काही समांतर आठवणी, अनुभव गाठीला असल्याने सहजच चिनूच्या व्यक्तिरेखेशी स्वतःला जोडू शकले. केवळ लहान वय असल्याने तेव्हा खूपशा मायेच्या नात्यांकडे पाठ फिरवून गाव सोडून रत्नागिरीला जाऊन राहिले होते. आता ते इतके सहज शक्य होईल असे वाटत नाही. सिनेमा बघून चार दिवस झाले तरी जिथे आयुष्याचा एक तुकडा सोडून आले त्या रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पुन्हा पुन्हा मनानेच पोचते आहे. या माझ्या आठवणींच्या किल्ल्यात प्रत्यक्षात जावेसेही खूप वाटते. पण काळाच्या निष्ठूर हाताने या किल्ल्यात काय बदल झाले असतील याची भीतीही वाटते. स्वप्नातून जागे होण्यापेक्षा आठवणींचा किल्ला तसाच आहे तिथे राहू दे.

शनिवार, २० जून, २०१५

Earth’s Children

नमस्कार मंडळी! आज आपण Jean Marie Auel यांनी लिहिलेल्या Earth’s Children या कादंबरी मालिकेची ओळख करून घेऊया. १९८० साली या मालिकेतील पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले, The Clan of the Cave Bear. यानंतर २०११ पर्यंत या मालिकेत एकूण ६ भाग क्रमाक्रमाने प्रकाशित झाले.
The Clan of the Cave Bear,
The Valley of Horses,
The Mammoth Hunters,
The Plains of Passage,
The Shelters of Stone,
The Land of Painted Caves
एकूण सुमारे ४५०० छापील पाने मजकूर ६ खंडात विभागून लिहिण्याची प्रचंड कामगिरी श्रीमती ऑएल यांनी केली. २०१० पर्यंतच या पुस्तकांच्या एकूण साडेचार कोटी प्रती विकल्या गेल्या होत्या. बरीच वाट पाहून प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक आल्यानंतरचे आकडे मला माहित नाहीत. पुस्तकाची ओळख करून घेण्यापूर्वी लेखिकेची ओळख करून घेऊ. जीन मारी ऑएल यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३६ ला झाला. त्यांचे मूळ फिनलंडमधले, पण यु.एस्.ए. मधे स्थायिक. त्या एम्.बी.ए. झालेल्या आहेत. आणि ५६ वर्षांचे प्रदीर्घ सुखी वैवाहिक जीवन जगताना त्यांनी ५ मुलांना वाढवले आहे. Earth’s Children मालिकेतील कादंबर्याूत वर्णन केलेले कुटुंब केंद्रित वातावरण लिहिताना त्यांची स्वतःची सुखी कौटुंबिक पार्श्वभूमीही सहायभूत झाली असेल असे वाटते.
१९७७ साली २ नोकर्‍यांच्या मधल्या काळात एक लघुकथा लिहावी असे जीन यांना वाटले. कथेचा विषय असणार होती ३०००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर वावरून गेलेली आणि स्वतःपेक्षा खूप वेगळ्या लोकांमधे वाढलेली एक बुद्धिमान स्त्री, अयला! लिहायला सुरुवात केली तर खरी, पण त्यांच्या लक्षात आलं की त्या काळचे लोक कसे होते, त्यांचे आयुष्य, त्यांची आपसातली नाती आणि हे सगळे त्या समूहापेक्षा वेगळ्या असणार्‍या एका स्त्रीने कसे हाताळले असेल याबद्दल त्यांना काहीच माहित नव्हते! मग त्या काळाचा अभ्यास करण्यासाठी जीन यांनी लायब्ररीतून असंख्य पुस्तके आणली. कोणतेही काम अतिशय नीटनेटके आणि शक्य तेवढे परिपूर्ण करण्याचा स्वभाव असल्याने जीन यांनी वाचन सुरू केले, भूगर्भशास्त्र, मानववंशशास्त्र, मानवी संस्कृतीचा उपलब्ध इतिहास याचा अभ्यास केला. कोणतीही साधन सामुग्री जवळ नसताना रानात कसे तगून रहाता येईल याचा कोर्सही केला! त्यात बर्फाची गुहा तयार करणे, कातडे कमावणे, लाकडे एकमेकांवर घासून अग्नि उत्पन्न करणे, गारेचे दगड छिलून हातकुर्‍हाडीसारखी शस्त्रे तयार करणे इ. चा समावेश होता. आणि मग जन्माला आली Earth’s Children मालिकेतील पहिली कादंबरी The Clan of the Cave Bear!
The Clan of the Cave Bear (१९८०),
The Valley of Horses (१९८२)
The Mammoth Hunters (१९८५) या पुस्तकाची पहिली आवृत्ती रेकॉर्ड ब्रेक १० लाखांवर प्रतींची होती.
The Plains of Passage (१९९०)
The Shelters of Stone, (२००२) प्रकाशित होताना १६ देशांत एक नंबरचे सर्वात जास्त विकले गेलेले (Bestseller) पुस्तक ठरले.
The Land of Painted Caves (२०११)
या मालिकेतील पहिली ४ पुस्तके साधारण १० वर्षात लिहून झाली. मात्र नंतरच्या २ पुस्तकांसाठी जास्त वाट बघावी लागली. याला एक कारण तर जीन यांचे वाढत जाणारे वय होते, तर दुसरे कारण मालिकेचा शेवट कसा करावा याबद्दल काहीशी दुविधा होती.
काही मुलाखतींमधे या मालिकेत एकूण ७ पुस्तके असतील असे जीन यांनी सांगितले होते, पण प्रत्यक्षात सहाव्या पुस्तकाची जाहिरात करताना हे या मालिकेतील शेवटचे पुस्तक आहे अशीच करण्यात आली. या पुस्तकांत उल्लेख केलेल्या काही महत्त्वाच्या पात्रांचे पुढे काय झाले असेल (उदा. अयलाचा मुलगा डर्क) याची वाचकांना अजूनही खूप उत्सुकता आहे. त्यामुळे जीन कदाचित त्याबद्दल लिहितीलही!
..
Earth's Children ही उत्तर अश्मयुगातल्या मानवाची कथा. २५००० ते ३०००० वर्षापूर्वीची, धरतीमातेच्या लेकरांची कथा. तेव्हा माणूस जंगलात शिकार करून अन कंदमुळं फळं गोळा करून निसर्गाचा एक भाग म्हणून रहात होता. त्याच्याकडे शस्त्र होते ते फक्त त्याच्या बुद्धिमत्तेचे. आणि त्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून मिळवलेल्या काही प्राथमिक दगडी शस्त्रांचे. कपडे होते मारलेल्या किंवा नैसर्गिकरीत्या मेलेल्या जनावरांच्या कातड्याचे. मात्र निसर्गात सहज सापडणार्‍या वनस्पतींचा उपयोग करून आपले आजार काही प्रमाणात बरे करता येत होते. घरे म्हणजे नैसर्गिक गुहा. मानवी संस्कृतीची पहाट होती ही. साहजिकच त्यांची दैवते म्हणजे धरतीमाता, निसर्गातल्या इतर शक्ती. आणि या शक्तींच्या जवळपास रहाणारे, त्यांचा अभ्यास करणारे शामान (जादूगार) या माणसांच्या टोळ्यांमधे खूप महत्त्वाचे आणि आदर मिळवणारे असत. औषधोपचार करू शकणारे सुद्धा खूप महत्त्वाचे सदस्य मानले जात.
तेव्हा क्रोमॅग्नन आणि निअँडर्थल्स दोन्ही प्रकारचे मानव आजच्या युरोपमधे एकमेकांना घाबरत, दूर रहायचा प्रयत्न करत पण एकाच वेळी अस्तित्त्वात होते. या मालिकेत अशी कल्पना केली आहे की क्रोमॅग्नन मानव निअँडर्थल्सना फ्लॅटहेड्स म्हणत, तर ते क्रोमॅग्नन मानवांना 'दुसरे' म्हणत. निअँडर्थलस कमी उंचीचे, बळकट बांध्याचे, पिंगट डोळ्यांचे आणि बुजरे असे वर्णन केले आहेत तर क्रोमॅग्नन मानव गोरे, उंच, बहुधा निळसर डोळ्यांचे वर्णन केले आहेत. दोघांत मुख्य फरक म्हणजे निअँडर्थल्स बोलू शकत नव्हते. मात्र त्यांची स्वतःची अशी खुणांची भाषा विकसित केली होती. तसेच त्यांच्या डोळ्यात अश्रूही येत नव्हते. फ्लॆटहेड्स फक्त आठवणींच्या मदतीने जगतात. भविष्याचा विचार करू शकत नाहीत आणि बदल स्वीकारू शकत नाहीत. त्यांचा विनाश अनिवार्य आहे.
कथानायिका अयला बेरन समुद्राच्या जवळपास कुठेतरी तिच्या आईवडिलांबरोबर रहात होती. कथेची सुरुवात होते ती एका मोठ्या भूकंपाने. त्यात अयलाचे आईवडिल बळी पडतात किंवा तिला दुरावतात. ती भुकेलेली, घाबरलेली ४-५ वर्षांची मुलगी नदीच्या काठाने कित्येक दिवस चालत रहाते. एक डोंगरी सिंह तिच्यावर हल्ला करतो आणि जखमी अवस्थेतली अयला मृत्यूच्या जवळ पोचलेली असताना केवळ नशिबाने फ्लॅटहेड्सच्या एका टोळीच्या दृष्टीला पडते. ते टोळीला क्लॆन म्हणतात. ही 'दुसर्‍यांची मुलगी' म्हणून टोळीवाले तिला सोडून पुढे जाणार असतात, पण त्या क्लॆनची वैदू 'इझा' हिच्या मनात करुणा जागी होते. तिचा भाऊ 'क्रेब' जो टोळीचा 'मोग-उर' अर्थात जादूगार/अध्यात्मिक गुरू आहे, त्याच्या मदतीने इझा 'दुसर्‍यांच्या' मुलीवर उपचार करायची परवानगी मिळवते आणि तिला उचलून आपल्या घरी आणते. तिच्यावर उपचार करून तिला बरीही करते.
हळूहळू अयला त्या क्लॆनमधे रुळते आणि इझाला आपली आई मानते. इतर टोळीवाले या उंच पांढुरक्या दिसणार्‍या मुलीला कुरूप समजतात आणि तिच्या डोळ्यातून येणार्‍या अश्रूंमुळे तिचे डोळे खराब आहेत असेही समजतात. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली अयला स्वभावतःच बंडखोर असते. स्त्रियांनी शिकार करायला बंदी असतानाही ती इतरांचे पाहून गोफणीने शिकार करण्यात प्रवीण होते. या गुन्ह्याबद्दल तिला शिक्षाही दिली जाते. तरी तिच्या रक्तातला बंडखोरपणा काही जात नाही. ती आतापर्यंत पूर्णपणे टोळीच्या रुढींमधे मुरली आहे. तिला बोलता येते हे ती विसरली आहे. भाषा विसरली आहे. दुसर्‍यांच्या खाणाखुणा आणि शारीरभाषेवरून ती सगळे समजून घेते. आई इझाकडून तिने औषधोपचार शिकून घेतले आहेत. फ्लॅटहेड्संना भाषा अवगत नसल्याने ते सर्व बाबतीत आठवणींवर अवलंबून असतात. त्यांचे जे काही पारंपरिक ज्ञान आहे ते सामुदायिक आठवणींत आहे असे ते समजतात. अयलाकडे या क्लॆनच्या आठवणी नसल्याने तिला तिची बुद्धि आणि निरीक्षणशक्तीही वापरावी लागते आणि त्यामुळे तिच्या बुद्धीला अधिकच धार चढते.
टोळीप्रमुखाचा मुलगा ब्रुड तिला मिळणारे प्रेम आणि महत्त्व पाहून तिचा द्वेष करतो आणि तिच्यावर बलात्कार करतो. मात्र फ्लॅटहेड्समधे कोणत्याही पुरुषाने वयात आलेल्या कोणत्याही स्त्रीला खूण करावी आणि तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन करावे अशी पद्धत लेखिका जीन यांनी कल्पिली आहे. त्याप्रमाणे अयलाला तो बलात्कार असला तरी तसे वाटत नाही. या बलात्काराचे फळ म्हणून तिला एक मुलगा होतो. त्याचे नाव ती डर्क ठेवते. या टोळीवाल्यांमधे स्त्रिया या फक्त फळेमुळे गोळा करणार्‍या आणि पुरुषांच्या शारीरिक गरजा पुर्‍या करणार्‍या मानल्या गेल्या आहेत. मात्र अयला हे सगळे शिकली असली तरी आपला बंडखोरपणा पूर्ण विसरू शकत नाही.
डर्क लहान बाळ असताना तिच्याशी काहीबाही बोलू शकतो, त्याला रडू येते आणि हसूही येते. मात्र दिसायला तो काहीसा बापासारखा आहे. अर्थात या काळातील मानवांना बाळाचा बाप कोण हे समजत नसते. प्राण्यांचे आत्मे बाळांचा जन्म घडवतात आणि पुढे त्यांना आयुष्यभर मार्गदर्शन करतात अशी काहीशी त्यांची समजूत आहे. गुहेत रहाणारे अस्वल या टोळीचे दैवत आहे आणि अयलावर हल्ला करणारा सिंह हा तिचा 'टोटेम'. अशक्त मुलाला जंगलात सोडून द्यायचे आणि काही दिवसांनी ते जिवंत सापडले तर त्याचा स्वीकार करायचा अशा काही काही आता रानटी वाटणार्‍या पण जंगलचा कायदा असलेल्या प्रथा या कादंबर्‍यांमधून ठिकठिकाणी दिसतात.
एकीकडे अयला तिचे गोफणीने शिकार करायचे कौशल्य वाढवीत असतेच. हळूहळू ती कोल्हे, लांडगे, तरस, लिंक्स असे जरा मोठे प्राणीही मारू लागते. मात्र केवळ दुसर्‍या प्राण्यांना मारणार्‍या मांसभक्षक प्राण्यांना मारायचे असे ती ठरवते. ब्रुड क्लॆनचा नायक झाल्यावर सूड म्हणून तिला मृत्यूची शिक्षा देतो. मात्र फ्लॅटहेड्स तिला मारून टाकत नाहीत, तर कोणतेही साधन बरोबर न घेता, मुलाला टोळीमधे सोडून तिने एकटीने दूर निघून जायचे असते. नुकताच इझा आणि क्रेबचा मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्यापूर्वी इझा तिला सांगते की इथून बाहेर पड आणि तुझ्या लोकांचा शोध घे. पहिल्या कादंबरीच्या शेवट हताश, दु:खी अयला टोळी आणि डर्कला सोडून निघून जाताना दाखवली आहे.
कादंबरीच्या दुसर्‍या खंडात आपल्या मुलापासून दूर जावे का एकटीने रहावे या द्वंद्वात सापडलेली अयला शेवट स्वतः जगायचा निश्चय करते, आणि उत्तरेच्या दिशेने तिच्या खर्‍या लोकांचा "दुसर्‍यांचा" शोध घेण्यासाठी चालू लागते. काही काळ चालत राहिल्यानंतर ती आजच्या युक्रेनमधील एका नदीच्या सुंदर खोर्‍यात रहाण्यायोग्य पाणी, वनस्पती, गुहा पाहून रहायचे ठरवते. जगण्यासाठी कंदमुळे फळे गोळा करण्याबरोबर शिकार करणे आवश्यक असते आणि हिवाळ्यासाठी एखादी मोठी शिकार करून मांस साठवून ठेवणेही. त्यासाठी खड्डा तयार करून ती एक घोडी मारते. पण तिचे शिंगरू तिथेच घोटाळताना पाहून तिच्यातली आई जागी होते आणि ती त्या शिंगराला गुहेत घेऊन येते. तिचे नाव व्हिनी ठेवते. अशातच तिला एक सिंहाचा जखमी अनाथ छावा सापडतो, आणि ती त्याला वाचवून आपल्याबरोबर ठेवते. त्यालाही बेबी हे नाव देते. मग सिंह आणि घोडी हे मूळचे शत्रू तिच्याबरोबर एका 'घरात' सुखाने राहू लागतात. या दोघांमुळे तिचा पुढे जाण्याचा निश्चय काही काळ मागे पडतो. मोठा झाल्यावर हा सिंह अयलाला सोडून आपला कळप तयार करतो आणि बाहेर राहू लागतो मात्र ती कुठे भेटली की आपले प्रेम दाखवतोच!
व्हिनी घोडी जरा मोठी झाल्यावर अयला तिच्या पाठीवर बसून घोडेस्वारी करू लागते आणि व्हिनीला फळ्यांची घसरगाडी ओढायलाही शिकवते. अशा प्रकारे अयलाने प्राण्यांना माणसाळायची सुरुवात केली आहे. काही काळाने एक शस्त्र तयार करण्यासाठी दगड छिलत असताना तिला वेगळेच दगड सापडतात आणि अपघाताने ते एकमेकांवर आपटून ठिणगी पडते. आतापर्यंत सुकी लाकडे एकमेकांवर घासून अग्नि तयार करणे आणि मग तो सतत काहीतरी टाकून सतत पेटत ठेवणे एवढेच मानवाला माहीत होते. आता अयलाच्या रूपात मानवाने पाहिजे तेव्हा अग्नि तयार करायचे तंत्र शोधून काढले आहे.
या कथेला समांतर आजच्या दक्षिण फ्रान्समधे जोंडालारची कथा चालू असते. तो क्रोमॅग्नन लोकांच्या एका टोळीमधला. हे लोक मोठाल्या नैसर्गिक गुहांमधे लहान घरकुलं तयार करून रहात असतात. त्यामुळे आपापल्या टोळ्यांना गुहांची नावे देतात. जोंडालार हा झेलांडोनी गुहेच्या प्रमुखाच्या साथीदारणीचा मुलगा. हे थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल. म्हणजे यांनाही स्त्री-पुरुष मीलनातून मुले जन्मतात हे माहीत नसतं. कायमचा साथीदार्/सखी ही कल्पना असते आणि लग्नासारखा काही विधीही असतो. मात्र जवळच्या नात्यातल्या व्यक्ती सोडून इतरांमधे मुक्त शरीरसंबंध असल्याने एखाद्या स्त्रीची सगळी मुले ही तिच्या 'चुलीची' किंवा तिच्या साथीदाराच्या नावाने ओळखली जातात. मुले वयात येताच त्यांना शरीरसंबंधांबद्दल शिकवायची जबाबदारी जमातीच्या 'दोनीं'ची असते. तर मुली वयात येताना त्याना शरीरसंबंधांबद्दल शिकवण्याची जबाबदारी काही जाणत्या पुरुषांवर असते. हे शिकवणार्‍या व्यक्तीच्या प्रेमात पडायला मात्र बंदी आहे. दोनी म्हणजे साक्षात धरतीमाता. मातृदेवतेला सगळीकडे मान आहे. एखाद्या जमातीची दोनी ही औषधोपचार, जादूटोणा, आणि धर्मगुरूसारखे महत्त्वाचे काम आपल्या शिष्यांच्या मदतीने करते. भांडणांमधे निवाडाही देते.
हे लोक फ्लॅटहेड्सपेक्षा जरा सुधारलेले आहेत. क्रोमॅग्नन हे परिसराशी जुळवून पुढे जाणारे आहेत. सुसंस्कृत आणि स्त्रियांना बरोबरीचे स्थान देणारे आहेत. त्यांच्यातील जे लोक निअँडर्थल स्त्रियांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर बलात्कार करतात त्या मंडळींना योग्य ती शिक्षा दिली जाते. ते क्वचित प्रवासाला निघतात. एखादा अशा प्रवासावरून चुकून माकून परतही येतो.
जोंडालारला झोलेनाचे मनस्वी आकर्षण वाटते. त्याने त्याला शरीरसंबंध शिकवणार्‍या 'झोलेना' या दोनी च्या प्रेमात पडल्याचे पाप केले आहे. हे प्रेम समाजमान्य नाही हे माहीत असल्याने तो दु:खी होऊन श्रेयाच्या शोधात धाकट्या भावासोबत प्रवासाला निघतो आहे. कारण आहे ते नदीमातेचा उगम शोधायचे. दोघा भावात खूप प्रेम आहे आणि ते एकमेकांची मनस्थिती अचूक ओळखतात. कारण थोनालान हा पक्का प्रवासी आहे आणि त्याला परत आणणारा दुवा नसेल तर तो भरकटत जाईल हे जोंडालारला पक्के माहित आहे. दोघे भाऊ आई वडील, भाऊ आणि बहीण यांना मागे सोडून चालत डॅन्युबच्या उगमाकडे निघाले आहेत. वाटेत त्यांना असेच अनेक क्रोमॅग्नन लोक भेटतात, क्वचित फ्लॅटहेड्स निसटते भेटतात, एका जागी थोनालान एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिथे रहायचा निर्णय घेतो. त्याच्याबरोबर जोंडालारही रहातो.

एक दिवस शिकारीला गेले असताना एक सिंह त्यांच्यावर हल्ला करतो. त्यात थोनालानचा मृत्यू होतो आणि जोंडालार जबर जखमी होतो. त्याच परिसरात अयला रहात असते. आणि जोंडालारवर हल्ला करणारा सिंह नेमका अयलाचा 'बेबी' निघतो. व्हिनीच्या मदतीने अयला जोंडालारला आपल्या गुहेत घेऊन जाते आणि त्याची शुश्रुषा करते. तो बरा होतो. आणि दोघांमधे आकर्षण वाढीला लागते. क्लॅनमधे वाढल्यामुळे अयला संकोचाने जोंडालारला काही सांगू शकत नाही, भाषाही येत नसतेच. तर जोंडालार त्याच्या दु:खात चूर असतो आणि अयलाने संमती दिल्याशिवाय तिच्या जवळ जाणे त्याच्या नियमात बसत नसते.
मात्र उपजत बुद्धिमत्ता आणि निरीक्षण याच्या जोरावर अयला जोंडालारची भाषा हळूहळू बोलू लागते. दोघांनाही एकमेकांची हृदयाची भाषाही समजते. आणि मग ते जोंडालारच्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतात. अयला सतत दुसर्‍यांना मदत करायला तयार आहे. तिचे औषधोपचाराचे ज्ञान सर्व लोकांसाठी मुक्तहस्ते वापरते आणि सर्वांशीच आर्जवाने, करुणेने वागते.

इथून पुढे अयला आणि जोंडालार यांचा प्रत्यक्ष प्रवास आणि प्रेमाचा, स्वतःच्या शोधाचा प्रवास सुरू होतो. वेळोवेळी त्यांना अनेक लोक भेटतात. त्यातील काही तर मिश्र वंशाचे आहेत. एका काळसर वर्णाच्या रानेक चा उल्लेख आहे, तर एका साधारण चिनी वर्णनाच्या जेरिकाचा उल्लेख आहे. निअँडर्थल्स आणि क्रोमॅग्ननच्या मिश्र संततीचीही काही उदाहरणे आहेत. अयलाला भेटणार्‍या अशा सार्‍याच मिश्र वंशाच्या लोकांशी ती अत्यंत सहानुभूतीने वागते. इतर म्हणजे क्रोमॆग्नन लोक फ्लॆटहेड्सना प्राणी समजतात. मात्र  फ्लॅटहेड्स हे प्राणी नाहीत तर सुसंस्कृत माणसे आहेत ही ती दर वेळी न भिता सांगते. निअँडर्थल्स हे निव्वळ आठवणींवर भर देऊन जगणारे असल्याने त्यांना परिसरानुरूप वागणे बदलून टिकून रहाणे कठीण आहे हे अयलाला जाणवते. तिला तशी गूढ स्वप्ने पडतात. एकदा तिला विश्वरूपदर्शन झाल्यासारखी धरतीमाता विक्राल स्वरूपात स्वप्नात दिसते. तर एकदा तिचे दोन मुलगे एकमेकांसमोर उभे राहिलेले दिसतात. मात्र क्लॅन नष्ट झाला तरी मिश्र वंशाचा तिचा पहिला मुलगा डर्क टिकून राहील असे तिला जाणवते.

अयलाच्या सहवासात जोंडालार घोड्यावर बसायला शिकतो, धनुष्यासारखे आयुध शोधून काढतो. अयलाने आता अनाथ झालेले एक लांडग्याचे पिलूही पाळले आहे. मोठा झाल्यावर हा लांडगा अयलाला जिवावरच्या संकटातूनही वाचवतो. इतर क्रोमॅग्नन 'गुहा' घोड्यावर बसणार्‍या आणि प्राण्यांवर हुकुमत गाजवणार्‍या अयलाकडे आश्चर्याने आणि आदराने बघतात. व्हिनीचा वंश वाढत आहे आणि मानवाकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची संख्याही. इतर लोकही आता घोड्याची मदत घ्यायला घाबरत नाहीत. तसेच चकमकीच्या मदतीने आता त्यांना केव्हाही अग्नि तयार करणे शक्य झाले आहे.

कथा आणखी ४ भागातून पुढे सरकत रहाते. अयला आणि जोंडालार यांचे प्रवास सुरू रहातात. मामुतोई जमातीचा प्रमुख मामुट अयलाला आपली मुलगी म्हणून स्वीकारतो आणि अयला आणि जोंडालार यांना एकमेकांशिवाय भविष्य नाही असे स्पष्ट सांगतो. प्रवास करून ते जोंडालारच्या गुहेत परत येतात. तिथे सुरुवातीला अयलाला स्वीकारणे जोंडालारच्या लोकांना जड जाते. पण झोलेना आणि जोंडालारचे इतर नातेवाईक मात्र अयलाला सहजपणे स्वीकारतात. जोंडालारला आयुष्यात प्रथमच खरे प्रेम मिळाले आहे हे झोलेनाला सर्वात प्रथम लक्षात येते.

कालांतराने अयला आणि जोंडालार यांना जोनालाया नावाची मुलगी होते. त्यांच्या जमातीत शरीरसंबंध हे धरतीमातेचे वरदान समजून उत्सव साजरे केले जातात. अशा उत्सवात रक्ताचे नातेवाईक सोडून कोणीही कोणाबरोबरही शरीर संबंध ठेवू शकतो पण या दोघांनाही इतर कोणाचेही आकर्षण असे वाटत नाही. दुसर्‍या कोणाशी अयलाचा किंवा जोंडालारचा कारणपरत्वे संबंध आला तरी दोघांनाही अत्यंत राग येतो आणि प्रचंड फसवल्याची, दुखावल्याची भावना येते. प्रत्येक परीक्षेच्या प्रसंगातून अयला आणि जोंडालारचे प्रेम अधिक बळकट होत जाते. हे पाहून झोलेना 'दोनी' तिच्या जमातीच्या लोकांनी इथून पुढे ज्याचा साथीदार म्हणून स्वीकार केला असेल त्याच्याव्यतिरिक्त कोणाशी संबंध ठेवायचा नाही असा निर्णय घेते.

सहाव्या भागात आतापर्यंत स्त्री-पुरुष एकत्र आल्यावर मुले तयार होतात याची साधारण कल्पना झोलेनाला आली आहे आणि आईचं मूल हे तेवढंच बापाचंही आहे हे लोकांना पटवून देण्यात ती यशस्वी झाली आहे. मात्र ती अयलाच्या अलौकिक बुद्धीचा आणि औषधोपचार करण्याच्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करून घ्यायचे ठरवते आणि अयलाला आपली शिष्या बनवते. अयलाचा खूप लहानपणी सुरू झालेला आध्यात्मिक प्रवासही पुन्हा सुरू होतो. या प्रवासात लवणस्तंभ असलेल्या आणि रंगीत चित्रांनी सजवलेल्या गुहा मोठी भूमिका निभावतात. आता अयलाने घर संसार सोडून 'दोनी' बनायचे का? की तिच्या आयुष्यातील एकमेव खर्‍या प्रेमासोबत रहायचे? या द्वंद्वात सापडलेली अयला शेवट दोन्हीचा समतोल साधण्यात यशस्वी होते आणि मालिकेचा सुखी शेवट होतो.
***************************
अतिशय वाचनीय आणि रंजक पद्धतीने जीन यांनी अयला आणि जोंडालार यांची कहाणी सांगितली आहे. मानवी संस्कृतीच्या बाल्यावस्थेतील एका समाजाचे सर्व ताण्याबाण्यांसहित वर्णन करणे, किंबहुना २ मानवी वंश संपूर्णपणे कल्पनेने उभे करणे हे महाकठीण काम जीन मारी ऑएल यांनी अतिशय समर्थपणे पार पाडले आहे. वाचताना हे सगळे खरेच घडले असेल असे वाटते!
प्रत्यक्षात ही मालिका सुमारे ३० वर्षांच्या कालावधीत लिहिली गेली त्यामुळे त्यात आधारभूत धरलेली काही गृहीतके नंतर चुकीची ठरली साहजिकच या मालिकेवर आक्षेपही भरपूर घेतले गेले. तर सुरुवातीला कल्पनाशक्ती समजल्या गेलेल्या गोष्टींना प्रत्यक्षातले आधार असल्याचे काही काळाने पुरावे मिळाले. मात्र अशा स्वरूपाच्या कादंबर्‍या आणखी फारशा असल्याचे कधी वाचनात आले नाहीये. एकूणच एवढी प्रचंड लोकप्रियता मालिकेचे यश अधोरेखित करते.

मालिकेमधे स्त्री-पुरुष संबंधांची मुक्त वर्णने काही ठिकाणी आहेत. मात्र ती त्या काळानुरूप आणि कथनाच्या ओघात आल्याने बीभत्स वाटत नाहीत. (मराठीत असती तर कदाचित वाटली असती! माहित नाही!!) तसेच शिकारीची वर्णने, वनस्पती, औषधे, काढे, गरम दगड टाकून पदार्थ शिजवण्याची वर्णने, रीतीरिवाजांची वर्णने यात काही वेळा पुनरुक्ती वाटते. मात्र याला आणखी एक कारण असे वाटले की लोक ही मालिका ३० वर्षात विभागून वाचत होते, तर मी मालिकेतील सगळी पुस्तके सलग एकापाठोपाठ वाचली.

त्या काळची वेगवेगळी घरे, मॅम्मथ प्राण्यांच्या शिकारी, वितळणारी ग्लेशियर्स, प्रतिकूल परिस्थितीतून आणि पुढच्या वळणावर काय असेल हे माहीत नसताना केलेले प्रवास हे सारे वाचणे हा माझ्यासाठी तरी अतिशय आनंददायी अनुभव होता. या मालिकेत वर्णन केलेले प्राणी पाळणे आणि चकमकीच्या दगडाने अग्नी पेटवण्याचा शोध हे इतक्या थोडक्या कालखंडात आणि असेच घडले असे नव्हे, पण लेखिकेने अयलाला अप्रतिहत बुद्धी आणि सर्वांभूती करूणा हे दोन गुणविशेष दिले आहेत आणि प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढायची शक्तीसुद्धा. तिच्यासारख्या महामानवाला हे दोन्ही शोधणे शक्य होईल हे ते लेखिकेचे स्वातंत्र्य म्हणून आपण मान्य केले पाहिजे. या मालिकेच्या निमित्ताने 'अयला' ही अतिशय बुद्धिमान आणि बंडखोर नायिका, मानवी संस्कृतीच्या बाल्यावस्थेतील जणू साक्षात मातृदेवतेचे रूप, जीन मारी ऑएल यांनी आपल्याला दिली त्याबद्दल त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच!

इला हे पृथ्वीचे एक नाव आहे. मालिकेतली नायिका तेच अयलाचे मूळ नाव असावे. परंतु तिला सांभाळणार्‍या निअँडर्थल्संना त्याचा उच्चार करता येत नसल्याने त्यांनी त्याचा अपभ्रंश 'अयला' असा केला असावा असे वाटते. जीन यांनी असे कुठे लिहिलेले सापडले नाही, पण हा एक अंदाज!

सुरुवातीला निअँडर्थल्सचा विनाश क्रोमॅग्नन मानवाने घडवला असा समज होता, मात्र नंतर निअॅवडर्थल्सचा संपूर्ण नाश झाला नाही तर बराच काळ क्रोमॅग्नन व निअॅनडर्थल्स एकमेकांसोबत या पृथ्वीच्या पाठीवर रहात होते असे पुरावे मिळाले तसेच काही प्रमाणात मिश्र वंश टिकून राहिल्याचे पुरावेही समोर आले. अयलाच्या कथेचा सुखान्त लोकांना आवडला, तसाच निअँडर्थल्सच्या क्लॅनमधे तिला ठेवावा लागला त्या तिच्या मिश्र वंशाच्या मुलाचे म्हणजे डर्कचे काय झाले याची जवळपास सगळ्या वाचकांना उत्सुकता लागून राहिली आहे. निदान त्यासाठी तरी आता ७८ वर्षांच्या जीन मारी यांनी पुन्हा लेखणी हाती घ्यावी हीच त्या आदिम मातृदेवतेकडे प्रार्थना!

कातरवेळी

कातरवेळी किनार्‍यावर
फिकट वाळू अन
स्तब्ध माड उभे
स्तब्ध गढूळ सागर
अन आभाळही भरलेले
पाखरे घरट्यात परतलेली
आणि थांबलेला वारा
अवघे अस्तित्व
जणू वाट पहाणारे
अधीर, अपेक्षेत कसल्या
अन अचानक
अवघे चैतन्य
सळसळून येते झावळ्यांतून
कुंद आभाळातून
मेघांना दूर सारीत येते
एक लवलवती वीज
वार्‍याला सापडतो त्याचा वेग
आणि थेंब येतात नाचत
वार्‍याचे बोट धरून
तापलेली वाळू थंडावते
मायेने स्वागत करते
त्या पहिल्या वहिल्या थेंबांचे

गुरुवार, २७ मार्च, २०१४

प्रवास

बरेच दिवसांनी नवर्‍याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते. आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं. तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे, जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो. स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं. मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली. रूळ क्रॉस करणार्‍या बर्‍याच मंडळीचं निरीक्षण करून झालं. एक पाणचट चहा पिऊन झाला. शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली. जनरलच्या डब्यात आधीपासूनच उभे असलेले लोक पाहिले आणि हे आपलं काम नव्हे याची खूणगाठ बांधत स्लीपरच्या डब्याकडे धाव घेतली.

4/5 डबे मागे चालत गेल्यावर एका डब्यात एक अख्खं बाक रिकामं दिसलं. टीसी येईपर्यंत बसून घेऊ म्हटलं, आणि काही मिनिटांतच टीसीसाहेब अवतीर्ण झाले. आमच्याकडे जनरलचं तिकीट आहे आणि फरकाचे पैसे भरून बर्थचं तिकीट दिलंत तर उपकार होतील असं सांगताच त्यांनी इतर काही बिनापावतीचे इ. सूचक वगैरे न बोलता पावती फाडून हातात ठेवली आणि बर्थ क्रमांक 1,2 वर बसा म्हणाले. आता अधिकृतपणे आमच्या झालेल्या सीटखाली हातातली बॆग टाकली. चपला काढून पाय वर घेऊन मांडी ठोकली आणि अंग सैलावलं.

तिकिटाचा यक्षप्रश्न सुटल्यानंतर कंपार्टमेंटमधल्या इतर मंडळींकडे आपसूकच लक्ष गेलं. समोरच्या सीटवर एक टिपिकल मंगलोरी 'पेढा' आणि त्याची नवथर बायको बसले होते. खूपच तरूण दिसत होते. दोघांची चेहरेपट्टी आणि ठेवण बरीच एकसारखी. बहुधा जवळच्या नात्यातले असावेत आणि आता नवपरिणीत. ते त्यांच्या विश्वात अगदी गुंग होते. बायको लहान मुलासारखी लहान सहान हट्ट करत होती आणि पेढ्याला त्यात फारच मजा येत असावी असं दिसत होतं. त्यांचं कन्नड बोलणं थोडफार कळत असलं तरी मी कळत नसल्याचा आव आणला.

त्यांच्या बाजूला सगळ्यात वरच्या बर्थवर एक माणूस डोक्यावर पांघरूण घेऊन गाढ झोपला होता. सात साडेसात वाजता इतका गाढ कसा काय झोपला हा म्हणून विचारात पडले. पलिकडच्या सीटवर एक पोरगेला दिसणारा उंच तरूण बसला होता. थोड्याच वेळात त्या सीटवर एक कुटुंब येऊन बसलं आणि हा पोरगा आमच्या सीटवरच्या राहिलेल्या तिसर्‍या जागी सरकला. माझ्या नवर्‍याने त्याच्याशी जरा हसून बोलायला सुरुवात केली तसा तो घडाघडा बोलायला लागला. कारवारला नेव्हीत आहे, 20 वर्षांचा आहे, पश्चिम बंगालमधे कलकत्त्याच्या पुढे कुठेतरी गाव आहे आणि अचानक सुटी मिळाल्याने निघालो आहे. . माहिती त्याने पहिल्या 3 मिनिटांत सांगून टाकली. त्याच्याकडे पाहताच हा एवढासा दिसणारा मुलगा नेव्हीत आहे या गोष्टीचं खरंतर हसूच येत होतं. पण त्याने लगेच एसीची नेव्हीसाठी काढलेली तिकिटेच काढून दाखवली. कारवार-मुंबई, मुंबई-कलकत्ता आणि तिथून आणखी पुढे कुठेतरी जायची तिकिटं. मात्र कंफर्म्ड तिकीट नसल्याने त्याला एसीतून बाहेर काढले होते म्हणे. माझा नवरा त्याच्याशी आणखीही गप्पा मारत होता. मी खिडकीतून बाहेर नजर टाकली. झाडे घरे हळूहळू काळोखात गडप होत होती.

एकदाचं खास रेल्वेच्या चवीचं जेवण जेवून झालं. म्हणेपर्यंत गाडी कणकवलीला येऊन थांबली. ते कुटुंब तिथे उतरून गेलं आणि आणखी दोघेजण येऊन झोपून गेले. आमच्या कंपार्टमेंटमधे एकजण येऊन हातातल्या तिकिटाकडे पाहू लागला. सगळ्यात वरच्या बर्थवर झोपलेल्या महाशयांना भरपूर हलवल्यानंतर ते उठले आणि आपल्या खिशातलं तिकीट काढून दाखवायला लागले. हा नवा आलेला माणूस म्हणे, "अहो माझं कंफर्म्ड तिकिट आहे. तुमचं तिकीट कंफर्म्ड कुठे आहे?" तो आधीचा म्हणतोय, "मला एसेमेस आलाय पण!" शेवटी त्याने आपला एसेमेस मला दाखवला. बघितलं तर Sl हे त्याने S1 असं वाचलं होतं आणि आणि त्यापुढचं S6 म्हणजे 6 नंबरचा बर्थ समजला होता. मग त्याची रीतसर S6 मधे 48 नंबरच्या सीटवर रवानगी झाली आणि नवा आलेला त्याच्या जागी झोपून गेला.
जरा वेळाने टीसी साहेबांनी येऊन या नव्या माणसांची त्यांना झोपेतून उठवून रीतसर चौकशी केली. नेव्हीतल्या पोराला "तेरे पास कंफर्म्ड टिकट नही है ना, अभी अगले स्टेशन पर दूसरे लोग आएंगे तब तुम्हे उतार दूंगा" असा दम भरला आणि एक डोळा मिचकावत हसले. पुढच्या स्टेशनावर स्वत: टीसी साहेबांचीच ड्युटी संपणार होती. "क्या करें साब, हम लोगों को सोने को जगह मिली तो सोएंगे, मिलिटरी के लोगों को ऐसे जागते रहने की आदत रहती है" असं म्हणत नेव्हीवाल्याने संभाषणाचे धागे विणणे पुढे सुरू केले.

समोरचा मंगलोरी आणि त्याची नवपरिणीता यांचे विभ्रम सुरूच होते. तिने खालच्या बर्थवर अनोळखी पुरुषांसमोर झोपावे हे त्याला पसंत नव्हतं, तर तिला खिडकी उघडी टाकून झोपायचं होतं. त्याने तिची रवानगी मधल्या बर्थवर केली तर 10 मिनिटांतच ती तक्रार करत खाली उतरली आणि हट्ट करून खालच्या बर्थवर झोपून गेली. तिने बाजूला निष्काळजीपणे टाकलेली पर्स बघून आश्चर्यच वाटलं. थोड्या वेळाने तिच्या नवर्‍याला म्हटलं, खिडकीचं शटर बंद करा, नाहीतर कोणीतरी खिडकीतून हात घालून पर्स पळवून नेईल. त्यालाही ते पटलं आणि त्याने तत्परतेने शटर बंद केलं.

कंपार्टमेंटमधल्या बहुतेकांनी आडवं होऊन नाहीतर बसल्या जागी निद्रादेवीची आराधना सुरू केली होती. मग मी त्या सगळ्यांकडेच दुर्लक्ष करून परत खिडकीबाहेर नजर वळवली. समोर आलेल्या आकाशाच्या तुकड्यात मृग नक्षत्र सहजच ओळखू आलं. त्याच्या पोटातला बाण आणि व्याधही दिसला. आणखी एक ओळखीचा एम सारखा आकार दिसला. शर्मिष्ठा बहुतेक. क्षितिजाजवळ बहुधा शुक्र दिसत होता.  एकदम आठवण झाली. आई हे सगळे ग्रह, तारे, नक्षत्रं, राशी ओळखायला शिकवायची.

मन सहजच काही शे मैल आणि साडेतीन दशकांचा प्रवास करून रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पोचलं. एका साध्यासुध्या बैठ्या घराच्या अंगणात. चोपून तयार केलेलं लख्ख अंगण. त्याच्या कडेने लावलेले चिरे, आणि त्या चिर्‍यांच्या पलिकडे ओळीत लावलेली अनेक फुलझाडं आणि शोभेची झाडं. तगर, कण्हेरी, बिट्टी, कुंद, मोगरा, नेवाळी, लिली, गावठी गुलाब, वेलगुलाब, अगस्ती नाना प्रकार. त्या लहान झाडांच्या पुढे पाण्याची दगडी पन्हळ, पाण्याने भरलेली दोण, आणि माड, आंब्याची कलमं, चिकू, रामफळ, कोकम अशी मोठी झाडं. या माडांच्या मुळात सतत पाणी शिंपल्यामुळे ओलसर मऊ माती असायची आणि बाजूला दुर्वा. पलिकडे एक लहानसं शेत आणि त्याही पलिकडे बांबूचं बेट. घराच्या मागच्या बाजूलाही प्राजक्ताची श्रीमंती उधळत असायची.

तिन्हीसांजा वडील अंगणात फेर्‍या मारत रामरक्षा म्हणायचे. कधी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून रामरक्षा, अथर्वशीर्ष म्हणायचे. आई पण काम करता करता असं काही म्हणायची. त्यांच्यामागून फिरताना आम्हालाही ती पाठ होऊन गेली होती. आजही झोप आली नाही की रामरक्षा म्हणते. अंगणाच्या छोट्या भागात पत्र्याचा मांडव घातला होता. पण आमचा वावर बराचसा मोकळ्या आकाशाखालीच असायचा. रात्री नीरव शांततेत माड झावळ्या हलवत उभे असायचे. सगळी फुलझाडं पाणी पिऊन प्रसन्न झालेली असायची. जेवणं झाली की कधी मर्फीचा रेडिओ पण आम्हाला सोबत करायला त्या अंगणात येऊन गाणी गायचा. रात्रीच्या वेळी लता, तलत, अरुण दाते सगळ्यांचेच आवाज जादुई भासायचे. आईला वेळ मिळाला की ती गीतेचे अध्याय म्हणून घ्यायची आणि आकाशातले ग्रह तारेही ओळखायला शिकवायची. आता तर कित्येक दिवसांत आकाशाकडे लक्षच जात नाही. पण कधी गेलंच तर आपसूक तार्‍यांची नावं डोक्यात यायला लागतात.

त्या स्वप्नातल्या गावात पोचून मी परत एकदा लहान झाले. आता ते गाव आणि ती माणसं राहिली नाहीत ग! सगळंच फार बदललंय हल्लीच मैत्रीण म्हणाली होती. तिचं सासरही त्याच गावात असल्याने तिचा गावाशी संबंध राहिला आहे, आणि तोही भलेबुरे सगळेच अनुभव घेत. असू दे ग! आता आपण तरी त्याच कुठे राहिलोय! मी म्हटलं होतं. आणि तरीही ‘मैत्री’ या शब्दाचा अर्थही माहित नसलेल्या कोवळ्या वयातल्या मैत्रीला जागून इतक्या वर्षांनी तिने मला आंतरजालावरून शोधून काढलंच होतं!

इकडे गाडी आपली अशीच अनेक विश्वं पोटात घेऊन धावतच होती, बोगदे, डोंगर, नद्या, झाडे, घरे मागे पडत होती. कुठे बोगद्यात दिवे लागलेले असायचे तर कुठे कामगार मंडळी टॉर्च घेऊन उभी असायची. ते सगळं दिसत होतं आणि नव्हतंही. जवळच्या सगळ्या गोष्टी गाडीच्या मागे पडत होत्या, मात्र सुदूर अंतरावरचा तो तार्‍यांनी भरलेला आकाशाचा तुकडा गाडीबरोबर पुढेच येत होता! आणि इतर कोणाला न सांगता मी खास माझ्या अशा एका अद्भुत प्रवासात रंगून गेले होते. आणखी एक ओळखीचा अस्पष्टसा आकार दिसला. कृत्तिका. अरे, पण या एवढ्या अस्पष्ट का दिसतायत! आता डोळ्यांना लांबचा नंबरही आला की काय! तेवढ्यात लक्षात आलं, क्षितिजाजवळ डोंगरावर दिवे दिसताहेत, त्यांच्यामुळे तिथे काळोखाचा गर्दपणा कमी झालेला होता आणि मग जरा हुश्श्य वाटलं.

लवकरच गाडीने लक्षात येईल असं एक वळण घेतलं आणि बाहेर दूरवर काळोखावर रांगोळी काढल्यासारखे प्रकाशाचे अनेक झगमगते ठिपके दिसायला लागले. माझ्या ओळखीच्या शहराचं पहिलं दर्शन! नेहमीच अतिशय सुखद वाटणारं. त्याने मला त्या स्वप्नातल्या गावाहून परत वर्तमानात आणलं. हळूहळू शहरातले रस्ते आणि त्यावरचे दिवे दिसायला लागले. गाडीने हलकेच ब्रेक लावल्याचा आणि रूळ बदलल्याचा आवाज जाणवला. सुक्या मासळीचा विशिष्ट वास यायला लागला. अनेकांना हा वास अजिबात आवडत नाही. पण माझ्यासाठी मात्र हा वास माझ्या ओळखीच्या शहराची खूण आहे. बरचसं बदललं तरी बरचसं अजूनही बदललं नाही हे सांगणारा.

हळूहळू स्टेशनचा प्लॆटफॉर्म आणि त्यावरची लोकांची धांदल दिसायला लागली. नवर्‍याने बॆग उचलली. मी किरकोळ सामान उचललं, पायात चपला सरकवल्या आणि उठून उभी राहिले. आमचा आजचा प्रवास इथेच संपत होता, पण गाडी मात्र अशीच धावत पुढे जाणार होती. मंगलोरी जोडपं, बंगाली नेव्हीवाला आणि कणकवलीचा प्रवासी याना सोबत करायला माझ्या जागी दुसरंच कोणी येऊन बसणार होतं. उद्या पुढच्या प्रवासाला लागण्यापूर्वी चार घटका हौसेने घेतलेल्या घरकुलात निवांत घालवायच्या आहेत हा विचार थंड वार्‍याच्या झुळकीसारखा मनात आला. आणि त्या विचाराचं अभेद्य कवच  मिरवीत मी गाडीत चढू पाहणार्‍या स्टेशनवरच्या गर्दीत पाय ठेवला.
मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३

ऐका गणेशदेवा तुमची कहाणी

ऐका गणेशदेवा तुमची कहाणी.
निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे.
विनायकाची देवळे, रावळे.
मनचा गणेश मनी वसावा.
हा वसा कधी घ्यावा?
श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा.
संपूर्णाला काय करावे?
पशा पायलीचे पीठ कांडावे. अठरा लाडू करावेत.
सहा देवाला, सहा ब्राम्हणाला, सहाचं सहकुटूंब भोजन करावे.
अल्प दान, महा पुण्य
असा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतीले लाभिजे.
ही पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
**********
श्रावणात प्रत्येक वारी त्या त्या वाराची कहाणी आजी वाचायची. त्या कहाणीच्या आधी ही गणेशाची कहाणी नेहमी वाचायची. आजीला तर ही कहाणी पाठच होती. कोणत्याही कामाची सुरुवात म्हणजे श्रीगणेशा करायचा तर गणपतीचे नाव घेणे परंपरेत आवश्यक समजले जाते ना, म्हणूनच ही लहानशी गणेशाची कहाणी. अगदी साधी सोपी. मोजक्या शब्दात गणपतीच्या राऊळाचे वर्णन आहे. निर्मळ मळे उदकाचे तळे. बेलाचा वृक्ष आहे. म्हणजे शिवाचे देऊळ कुठेतरी जवळपास असणार. तळ्यात सुवर्णकमळे आहेत. आणि तळ्याशेजारी विनायकाचे देऊळ आहे. गणपतीचे विनायक हे नाव पुराणांमधे आणि बौद्ध तंत्रात वापरले गेले आहे.
कहाणी सांगते की "मनचा गणेश मनी वसावा." त्या विनायकाला मनात वसवा. त्यासाठी एक व्रत सांगितले आहे. सहा महिन्यातल्या एकूण ७ चतुर्थ्यांना विनायकाचे पूजन करावे आणि व्रत पूर्ण करताना लाडूंचा प्रसाद करावा. मग ते लाडू देवा-ब्राह्मणाला देऊन बाकीचे आपण खावेत. हे बरं आहे. म्हणजे ब्राह्मणांची मस्त सोय आहे! "मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतिले लाभिजे" ही भाषा पाहिली तर रामदासांची किंवा जरा आधीची अशी वाटते.
बाकी कहाण्या "साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संप्रूण" असतात. पण ही कहाणी मात्र "पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण" असं सांगितलं आहे. कारण बाकी कहाण्या मुळात मोठ्या असून संक्षिप्त केल्या आहेत. पण गणेशदेवाची कहाणी मात्र मुळातच संक्षिप्त आहे हे त्याचं कारण!
**********
कहाणीसारखा दुसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे आरत्या. पैकी "सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची" बद्दल आपण प्यारे१ ने विस्ताराने लिहिलेलं वाचलं. परंपरेनुसार ती आरती संत रामदासांनी रचलेली. रामदासांच्या नावावर मारूतीची आणि इतर काही आरत्या आहेत. या आरत्यांबरोबर माझ्या आजीची आवडती आणखी एक आरती होती. विशेष म्हणजे ती हिंदीत आहे. माझ्या आजीला हिंदी येत नव्हतं पण ही आरती तिला पाठ होती. तिचे ऐकून आम्ही पण म्हणायला लागलो.
*******
शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ।।
हात लिये गुडलड्डू सांई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूं पदको ।।१।।
जय जय जी गणराज विद्यासुखदाता । धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ।।ध्रु०।।
अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी । विघ्नविनाशक मंगल मूरत अधिकारी ।।
कोटीसूरजप्रकाश ऐसी छबि तेरी । गंडस्थलमदमस्तक झूले शशिबहारी ।।जय०।।२।।
भावभगतिसे कोई शरणागत आवे । संतत संपत सबही भरपूर पावे ।।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे । गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ।।जय०।।३।।
*******
आता शोध सुरू झाला हे गोसावीनंदन कोण? शोधताना डॉ. केतकरांच्या ज्ञानकोषात त्रोटकशी माहिती मिळाली. ती पुढीलप्रमाणे.
गोसावीनंदन.- याचें नांव वासुदेव असून बापाचें नांव गोस्वामी (गोसावी) होतें. हा तंजावरकडील राहणारा असून याचे गुरु गोपाळश्रमगजानन नांवाचे होते. अर्वाचीनकोशकार याच्या गुरूंचें नांव निरंजनस्वामी असें देतात. याचा काल इ. स. १६५०-१७०० चा होय. याचा मुख्य ग्रंथ ज्ञानमोदक नावाचा असून शिवाय सीतास्वयंवर व अभंग, पदें वगैरे स्फुटकाव्य बरेंच आहे. यांचीं स्तोत्रें व अष्टकें लहान मुलांनां शिकतां येतील अशीं सोपीं व साधीं आहेत; हा गाणपत्य होता. [महाराष्ट्रसारस्वत].
********
म्हणजे ही आरतीसुद्धा शिवाजीमहाराजांइतकी जुनी निघाली! मग पार्थिव गणेशाची पूजा किती जुन्या काळापासून सुरू असावी? सुरुवात कधी झाली नक्की ते सांगता येणार नाही. घाटावर ही प्रथा पेशव्यांच्या काळापासून सुरू झाली असे म्हणतात. पण कोकणांत तर फार पूर्वीपासून पार्थिव गणेशाची पूजा सुरू होतीच. पेशव्यांच्या आधीपासून हे नक्कीच. याला एक अप्रत्यक्ष पुरावा आहे.
गोव्यात पोर्तुगीजांच्या छळाला भिऊन पणजीतले कामत, हेदे आणि इतर काही घराण्यांत पार्थिव गणपतीऐवजी कागदाच्या गणपतीची पूजा सुरू झाली. त्यांच्या दप्तरांमधे, कुलवृत्तांतामधे याबद्दल लिहून ठेवलेले आहे. हा काळ १५६० ते १६०० हा असावा. कारण १५६० मधे गोवा इन्क्विझिशनची सुरुवात झाली. त्या काळात पोर्तुगीजांना प्रत्यक्ष विरोध न करता काही हिंदू लोक तगून राहिले. त्यांच्या घरातून मुख्यतः 'कागदाचा गणपती' पहायला मिळतो.
याला दुजोरा देणारी हकीकत माझ्या सासर्‍यांकडून ऐकली आहे. ते गोव्यातले कामत. पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळून आणि कुलदैवताचा नाश झाल्यानंतर गोव्यातले घर, गाव सोडून पळाले ते थेट रत्नागिरी जिल्ह्यात येऊन पोचले. त्याच काळात काही घराणी कर्नाटकात मंगलोरकडे स्थलांतर करून गेली. तर काही रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर आणि आसपासच्या प्रदेशात येऊन पोचली.
तर हे कामत घराण्यातले काहीजण पोटाच्या पाठीमागे भटकत देवधे गावात येऊन पोचले. तिथल्या कुणा गद्रे नावाच्या माणसाला तो गाव सोडून जायचे होते. त्याने आपले राहते घर या कामतांच्या पूर्वजाना दिले, ते त्यांच्याकडून एक वचन घेऊन. की आपल्या घरात दिवाबत्ती झाली पाहिजे आणि गणपती आणला गेला पाहिजे. ती प्रथा अजूनपर्यंत टिकून आहे. याचाच अर्थ हा, की पोर्तुगीज येण्यापूर्वी कोकणात सर्वत्र पार्थिव गणपतीची पूजा सुरू होती.
*************
गणपती ही मूळ अनार्यांची देवता. साधारण चौथ्या पाचव्या शतकात म्हणजे गुप्तकाळात त्याला वैदिक धर्मात स्वीकारायची प्रक्रिया सुरू झाली आणि चालुक्य, शिलाहार, यादव यांच्या काळात, म्हणजे साधारण ९ व्या शतकापासून हळूहळू त्याला प्रमुख दैवतांत स्थान मिळत गेले असे समजले जाते. याच सुमारास गाणपत्य हा एक पंथ तयार झाला. नंतर ११ व्या १२ व्या शतकांत बांधलेली गणपतीची देवळे आढळून येतात. तोपर्यंत बहुधा गणपती दरवाज्याच्या पट्टीवरच अथवा सप्तमातृकांसह दिसून यायचा! या दरम्यान किंवा जरा नंतर पार्थिव गणेशाची पूजा करायची पद्धत सुरू झाली असावी.
*********
गणपतीला सर्व विद्या आणि कलांचा अधिपती मानल्यामुळे सगळ्या लोकसाहित्यात गणपतीच्या प्रार्थना सापडतात. मग ते तमाशातले गण गौळण असो की त्याहीपूर्वीच्या दशावतारी खेळ्यातले सुरुवातीलाच येणारे गणपती चे सोंग असो. संत-तंत-पंत सगळ्या कविश्रेष्ठांना गणपतीचे रूप भावले. आणि त्यांनी आप आपल्या साहित्यात त्याला स्थान दिले.
खेळ्यातला गणपती येतो तो "पहिले नमन, देवा करीतो वंदन" च्या तालावर नाचत, आणि तमाशातला गण येतो तो "आधी गणाला रणी आणिला नाहीतर रंग पुन्हा सुना सुना" म्हणत. ओव्या, भूपाळ्या, भारूड, अशा सगळ्या प्रकारच्या लोकसाहित्यात गणपतीचे स्तवन हा आवडता प्रकार दिसून येतो.
तसाच अनेक संतांच्या अभंगांमधे गणपतीचा उल्लेख येतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या शब्दात पाहिले तर
ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या|
जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा|
देवा तूचि गणेशु, सकलमतिप्रकाशु|
म्हणे निवृत्तीदासू, अवधारीजो जी||
तर पंत कवींच्या रचनांपैकी
नेत्री दोन हिरे, प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे|
माथा शेंदुर पाझरे वरी बरे, दुर्वांकुरांचे तुरे|
माझे चित्त विरे, मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे|
गोसावीसुत वासुदेव कवि रे, त्या मोरयाला स्मरे||
ही रचना अत्यंत प्रसिद्ध आहे.
**********
अशी अनेक उदाहरणे शोधू जाता सापडतील. गणपतीची पूजा, त्यात घुसलेली कर्मकांडं ते सगळं समजा आवडत नसेल तरी गणपतीच्या निमित्ताने सगळे नातेवाईक गावच्या घरी एकत्र भेटतात. त्या निमित्ताने घर साफ होतं. गप्पाटप्पा होतात. शेजारी भेटतात. पोरंबाळ जोरजोराने आरत्या म्हणतात, फटाके बिटाके लावून मजा करतात, हे काय थोडं झालं! इतर धर्मियांच्या ईद, थँक्स गिव्हिंग असल्या सणांची सुद्धा आपल्याला मजा वाटते, तर गणपतीच्या निमित्ताने आपली पोरं मजा करतात तर करू द्या की थोडी!
सार्वजनिक गणपती लो. टिळकांनी ज्या उद्देशाने सुरू केले तो उद्देश कधीच साध्य झाला. पण नंतर बदलत्या रूपात सार्वजनिक गणपती सुरूच राहिले. त्यातलं बरंवाईट अनेक जागी चर्चिलं गेलं आहे. पुनरुक्ती करत नाही. आजच्या बदलत्या काळात गणपती आणायचा का, कसा, किती दिवस, निसर्गाला कमीत कमी त्रास देऊन परंपरा जपणं कसं साध्य करता येईल यावर प्रत्येकाने आप आपला विचार करावा. गणेशाच्या आद्य कहाणीत म्हटल्याप्रमाणे "मनचा गणेश मनी वसावा" हेही बरोबर.
आज अनंतचतुर्दशी. पार्थिव गणेशाला निरोप द्यायची वेळ आहे. त्याबरोबर या वर्षीच्या श्रीगणेश लेखमालेचा समारोप करायची वेळ आली आहे. श्री गणेशाचं पुढच्या वर्षी आगमन होईल तेव्हा परत भेटूच! तोपर्यंत आमच्या कोकणातल्या पद्धतीप्रमाणे गार्‍हाणं घालते.
जय देवा गणपती गजानना,
सालाबादप्रमाणे,
मिसळपाव संस्थळाच्या घरात,
लेकीसुना-मुलाबाळांसह
नारळ आणि मोदक अर्पून
भक्तीभावाने तुझी सेवा केली आहे.
ती गोड मानून घे
चुकलं माकलं पदरात घे
आणि
या वर्षापासून पुढच्या वर्षापर्यंत
राखणदार हो!
******
होय देवा म्हाराजा!!

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१३

विंचुर्णीचे धडे - गौरी देशपांडे

विंचुर्णीचे धडे
गौरी देशपांडेचं "एकेक पान गळावया" या बहुचर्चित पुस्तकांएवढं कदाचित प्रसिद्ध नसेल पण या पुस्तकावरही गौरीचा मोहक ठसा जाणवतोच. १९९६ चं हे पुस्तक. पुस्तक रूढ अर्थाने कोणत्र्या प्रकारात बसते माहित नाही. ही विंचुर्णीची चित्रे आहेत गौरीने रेखाटलेली. त्या चित्रांची प्रेक्षक म्हणून गौरी थोडीशी दिसते. त्याबरोबर पार्श्वभूमीला तिची मुले, नवरा हेही अधे मधे दिसतात. तशी ही आत्मकथा नव्हे पण एका महत्त्वाच्या टप्प्यावर अनुभवलेलं आयुष्य इथे गौरीने रेखाटलं आहे. या पुस्तकाची प्रस्तावना, अर्पणपत्रिका तेवढीच वाचनीय आहे. आपल्याला विंचुर्णीसारख्या खेड्यात जाऊन रहायची बुद्धी का झाली याचं सुरेख वर्णन यात आहे. याला कारण झालं गौरीच्या स्वप्नातलं कम्युन! प्रत्यक्षात त्या कम्युनमधे बरं वाईट सगळंच असणार आहे विंचुर्णीसारखं. स्वप्न बघायला हवीतच पण प्रत्यक्षात आणखीही खूप काही त्याबरोबर मिळतं. पाहिजे असलेलं आणि नको असलेलंही!
पुणे मुंबईच्या गजबजाटातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त विंचुर्णीला घर बांधायला कारण झाले ते गौरीचे मेव्हणे आणि बहीण. ते आधी तिथे जाऊन राहिले होते ते पाझर तलाव आणि त्यांच्या मेंढ्यांच्या प्रकल्पासाठी. गौरीने तिथे घर बांधले आणि तिथून हलूच नये असे सुरू केले. मग घराबरोबर विंचू, साप, मांजरे कुत्री सगळी गोळा झालीच. पाहुणे रावळे मुली नातवंडे सगळे ये जा करत होते. असेच मेंढ्यांचे काम पण गौरीने गळ्यात घालून घेतले.
या घरासोबत या सगळ्या प्राणी-मित्रांची चित्रे अतिशय सुरेख उतरली आहेत मग तिथल्या गोरख, नानी, मीराबाई अशा लोकांची स्वभावचित्रे अगदी प्रत्ययकारी आली आहेत यात नवल ते काय! या सगळ्यात पार्श्वभूमीला हमखास नसणारी वीज, मग तिथे आपोआप झालेली काळोखाची सवय, पाझरतलाव, तलावात होडी चालवणारी गौरी हे सगळं मुळातून वाचलं पाहिजे.
नंतर तर पुण्याला प्रोफेसरकी स्वीकारून तिकडे रहायला जावे लागले तरी विंचुर्णीचे घर होतेच. संधी मिळताच तिथे धाव घ्यायची हे गौरीचे आयुष्य होऊन बसले. विंचुर्णीच्या लोकांना सुधारायचा प्रयत्न केल्यानंतर ते अशक्य आहे हे समजून गौरीने सोडून दिले. विंचुर्णीचे धडे हे पुस्तकाचं शेवटचं प्रकरण तर अगदी अभ्यसनीय. त्यात अशा गावांकडे आदर्शवाद म्हणून धावलेल्यांची निराशा, अशा गावकरी लोकांसाठी काम करणार्‍या संस्थांच यश अपयश हे सगळं गौरीने लिहिलं आहे. तसंच विंचुर्णीकडून आपल्याला काय शिकायला मिळालं तेही लिहिलं आहे.
ते म्हणजे (१)आपल्या हातून कोणाचे फार भले होणार नाही. (२)संघटना या निराशाजनक असतात. (३) माणसांना प्रेम लावले की ती आपली होतात असे नव्हे. दृष्टीआड झाली की ती मनातून हळूच निखळून जातात. हा धडा अवघड असला तरी याचा अर्थ असा नाही की माणसे जोडूच नयेत! ज्यांच्या आधारे आयुष्य काढले ती तत्त्वे फोल आणि अडगळीची म्हटल्यावर माणसाने काय करावे हा आणि असेच प्रश्न. कोणाकडून मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत आणि तरी ठोकर लागलीच तर ते सगळेच मागे ठेवून पुढे चालू लागायचे हा सगळ्यात मोलाचा धडा!
पुस्तकात सामाजिक संस्थांबद्दल लिहिलेलं सगळंच पटेल असंही नाही.पण आपले सगळे ग्रह, पूर्वग्रह बाजूला ठेवले तर निव्वळ लिखाण म्हणूनही आवडू शकेल. सगळ्या पुस्तकभर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि विंचुर्णीचे धडे या शेवटच्या लेखात कथनाच्या ओघात सामाजिक आणि वैयक्तिक संबंधांचा उहापोह आणि खास गौरीच्या अशा टिप्पण्या आहेत.
पुस्तकाच्या शेवटाला उपसंहारात म्हटल्याप्रमाणे गौरी अधे मधे ताजी होण्यासाठी विंचुर्णीला जाते, हवे तसे जगते, लिहिते, कष्ट करते. या सगळ्यामुळे तब्बेत छान रहाते! पण त्या विंचुर्णीला काही द्यायच्या आदर्शवादाला मात्र तिने बाजूला ठेवले आहे. शेवट गौरी म्हणते की "विंचुर्णीने मला जे काही दिले ते अनमोल आहे. खरी खंत अशी आहे की, काही कारणाने का होईना - मी विंचुर्णीला फारसे काहीच दिले नाही!"
(टीपः गौरींचे २००३ मध्ये निधन झाले.)