किल्ला चित्रपटाच्या निमित्ताने..

1

रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात. चित्रपट प्रदर्शित होऊन आता बरेच दिवस झालेत त्यामुळे कथेचा काही भाग इथे त्यानिमित्ताने मनात आलेले विचार लिहिताना आला तर तो स्पॉयलर ठरू नये.
चित्रपटात फोनचा वापर, मुलांचे सुटीतले उद्योग आणि एका प्रसंगात ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवणे हा प्रकार पाहता चित्रपट कथा १९९४-९५ च्या दरम्यान घडत असावी असे वाटते. चिनूच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्याच्या आईची बदली पुण्याहून गुहागरसारख्या एका लहान गावात झाली आहे. तिला ऑफिसात तिच्या स्वतःच्या अडचणी आहेत. चिनूला नवीन जागेत कोणी मित्र नाहीत. मामा आणि मामेभाऊ यांच्या ओळखीच्या सुरक्षित जगातून तो एकदम नव्या जागेत वेगळ्या वातावरणात येऊन पडला आहे. आपल्या मुळापासून उखडले जाणे आणि एकाकीपणा याचा त्याला आयुष्यात प्रथमच सामना करावा लागल्याने तो भांबावतो आणि आणि आपली नाराजी 'हे आवडत नाही, ते आवडत नाही' असे करून आईला दाखवून देतो. दोघांनाही या परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड जाते आहे.
शाळेतल्या काही टग्या मुलांच्या ग्रुपशी चिनूची मैत्री जमू पाहते. तो स्वभावाने तसा थंड आहे, त्या मुलांनी कुत्र्याना त्रास देणे वगैरे प्रकार त्याला आवडत नाहीत. पण दुसरे कोणी मित्रही नाहीत. त्या मुलांशी काहिसे जमते तोपर्यंत त्या मुलांसोबत एका निर्जन किल्ल्यावर गेलेला असताना वादळ पावसात ते मित्र त्याला एकटा सोडून जातात आणि या प्रकाराने तो पुरता हादरून जातो. एकदा वेळ घालवण्यासाठी एका मासेमारी लाँचवरून तो खोल समुद्रात जातो. तिथे आणि किनार्‍यावर शेकोटीपाशी त्या मासेमारासोबत चिनूचा तुटपुंजा संवाद त्याला घरी आई आहे, सगळेच हरवले नाही याची जाणीव करून देतो आणि चिनू घरी येऊन आईला घट्ट गळामिठी मारतो तो हलवून टाकणारा क्षण आहे. तेव्हाच बंड्या हा त्याचा उनाड मित्र त्याला दिवसभर शोधत होता हे समजून येते आणि चिनू विरघळतो. परीक्षा संपताना त्यांची मैत्री पक्की होते आणि मग पुढचे काही दिवस ते खूप मजेत घालवतात.
नेमके तेव्हाच चिनूच्या आईची पुन्हा गुहागरहून सातार्‍याला बदली होते. सिनेमाच्या सुरुवातीला आईला "ही बदली रद्द नाही का होणार?" असे विचारणारा चिनू पुन्हा तोच प्रश्न विचारतो. मात्र यावेळी तो तेवढा उदास नाही. सातार्‍याला जाऊन बासरी शिकेन असे तो आईला सांगतो आणि सामान आवरायला उत्साहाने मदतही करतो. आपल्याला सतत असे विस्थापित होऊन दुसरीकडे जावे लागेल हे कदाचित त्याला आता उमजले आहे. आधीच समजूतदार असलेला चिनू अधिकच शांत झाला आहे.
चित्रपटाच्या शेवटच्या भागात चिनूला मित्र खर्‍या अर्थाने मिळतात मात्र त्याना सोडून त्याला लगेच पुढे जावे लागते. प्रत्यक्षात सुरुवातीला ज्या किल्ल्यावर वादळ पावसात त्याचे मित्र त्याला एकटा सोडतात त्या किल्ल्यावर चिनू पुन्हा जाऊ शकत नाही पण चित्रपट संपताना त्याच्या मनातल्या किल्ल्यावर मात्र वादळाचा मागमूस नाही. फुलं, पक्षी आणि लख्ख ऊन असलेल्या किल्ल्यात त्याचे मित्र मजेत बसलेले आहेत. आयुष्य पुढे निघून गेलं तरी त्याच्या मनातले त्याचे मित्र तिथेच तसेच असतील.
एक प्रसंग दीपगृह पाहण्याचा. त्याचे वर्णन चिनू मित्रांकडे करतो ते मुळातून ऐकण्यासारखे. दीपगृहाच्या पायर्‍या चढताना खूप त्रास होतो मात्र वर पोचल्यावर छान वाटते, एखादी बोटही दिसते; हेच सूत्र किल्ल्याच्या प्रसंगातही वापरले आहे. किल्ल्यातल्या भुयारात असताना चिनू प्रकाशाच्या दिशेने जायला निघतो पण विजेच्या कडकडाटाला घाबरून पुन्हा मागे पळतो आणि मग मित्रांपासून दुरावतो. शेवट मात्र त्याच भुयारातून वर आल्यावर त्याला त्याचे मित्र आपल्याच नादात बसलेले दिसतात. तीच जागा आणि तेच मित्र. फरक फक्त पायर्‍या चढून येण्याचा आहे. मात्र आता ते मित्र त्याला पाठमोरे असतात. कदाचित आपल्याशिवाय त्यांचे आयुष्य पुन्हा पहिल्यासारखे सुरू आहे याची चिनूला जाणीव होते.
शेवट चिनू सातार्‍याला जायला निघतो तो त्याने माया लावलेला भटका कुत्रा आणि सायकल बंड्यापाशी सोडून. एरवी कुत्र्यांचा कर्दनकाळ असलेला बंड्या आता मात्र त्या कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसतो. हा चिनूमुळे त्याच्यात घडून आलेला बदल आहे. कदाचित कुत्रा आणि सायकल हे दोन दुवे मित्रासोबत कायम ठेवून चिनू सातार्‍याला जातो आहे, कदाचित तो त्यांच्यानिमित्ताने पुन्हा कधीतरी गुहागरला येईलही. चिनूच्या आधीच्या आठवणींमधे आता किल्ला आणि गावातले मित्र यांची भर पडली आहे. आयुष्यातल्या अनेक थांब्यांवर आपण आपल्या आठवणी अशाच कोणाजवळ ठेवून पुढे जातो, आपल्याला जावे लागते आणि त्यांच्या आठवणी फक्त आपल्यासोबत येतात.
सबंध चित्रपटात एक उदासवाणे वातावरण भरून राहिले आहे. पाऊस आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातला ओळखीचा निसर्ग ही या चित्रपटातली पात्रेच आहेत. चिनूची भूमिका करणारा अर्चित देवधर, बंड्या झालेला पार्थ भालेराव आणि अमृता सुभाष आपापल्या भूमिका अक्षरशः जगले आहेत. पण चित्रपटातल्या इतर कलाकारांनीही अतिशय नैसर्गिक अभिनय केला आहे. हे यश दिग्दर्शक अविनाश अरूण याचे. त्याचा पहिलाच चित्रपट आहे हे ऐकल्यावर खूपच कौतुक वाटले. प्रत्येक दृश्यात त्याच्यातला सिनेमॅटोग्राफर दिसतो. दुर्दैव की या चित्रपटाला डिस्ट्रिब्युटर्स मिळत नव्हते. बर्लिन चित्रपट महोत्सवात यश मिळाल्यानंतर चित्रपट वितरित होऊ शकला.
चित्रपटाच्या स्थळ-काळाचा विचार करता चित्रपटातली बोलीभाषा आणि काही पात्रांच्या कपड्यांचा नीट विचार करून वापर करणे अपेक्षित होते. पण नवीन दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट असल्याने तेवढ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येते. त्याचवेळी चित्रपटातले अनेक प्रसंग पाहताना त्याला दाद दिल्याशिवाय रहावत नाही. वेळ घालवण्यासाठी चिनूने ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवून पुन्हा कॅसेटमधे गुंडाळण्याचा प्रसंग पाहून एकाच वेळी हसू येत होते आणि भावुकही व्हायला होत होते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यातल्या आठवणींच्या किल्ल्यावर परत नेणारा हा चित्रपट पाहताना कितीदा डोळे भरून आले सांगता येणार नाही.
अशाच अर्ध्या कच्च्या वयातल्या काही समांतर आठवणी, अनुभव गाठीला असल्याने सहजच चिनूच्या व्यक्तिरेखेशी स्वतःला जोडू शकले. केवळ लहान वय असल्याने तेव्हा खूपशा मायेच्या नात्यांकडे पाठ फिरवून गाव सोडून रत्नागिरीला जाऊन राहिले होते. आता ते इतके सहज शक्य होईल असे वाटत नाही. सिनेमा बघून चार दिवस झाले तरी जिथे आयुष्याचा एक तुकडा सोडून आले त्या रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पुन्हा पुन्हा मनानेच पोचते आहे. या माझ्या आठवणींच्या किल्ल्यात प्रत्यक्षात जावेसेही खूप वाटते. पण काळाच्या निष्ठूर हाताने या किल्ल्यात काय बदल झाले असतील याची भीतीही वाटते. स्वप्नातून जागे होण्यापेक्षा आठवणींचा किल्ला तसाच आहे तिथे राहू दे.

टिप्पण्या

 1. आपलं परीक्षण आवडलं! 'किल्ल्या'तलं कोकण पाहण्यासाठी मुद्दाम आवर्जून पुन:पुन्हा पहावासा वाटतो. आता आपल्या शेवटच्या टिप्पणी बद्दल - लांज्या जवळ असलेलं आंजणारी माझं आजोळ. वाटेवरचं मुक्कामाचं ठिकाण रत्नागिरी (मामाकडे). ती सागराची गाज, तो पांढरा-काळा समुद्र. दुरूनच दिसणारा आणि दूरच राहिलेला थिबा पॉइन्ट! सारे मनात तरळले!! यासाठी आपले परीक्षण आवडले. धन्यवाद. -मिलींद

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद मिलिंद! उत्तर द्यायला काही कारणाने उशीर झाला. मीही रत्नागिरी येथील मूळ असल्याने सिनेमा फारच जवळचा वाटला!

   हटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

   हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रणबीर राज कपूर

होरपळ