प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर

फतेहपूर सीकरी
मुलं लहान असताना त्यांना घेऊन जमेल तसे फिरत होतो. २००५ मधे दिवाळीच्या आधी सुटी घेऊन दिल्ली वारी करू म्हटले. दिल्लीला जायचे म्हटल्यावर ८० वर्षांचे सासरे बरोबर येतो म्हणाले. त्यांची दोघांचीही तिकिटे काढली. हॉटेल्स दिल्लीत जाऊन बघू म्हटले. दोन म्हातारे आणि दोन मुले बरोबर असल्याने फार काही बघून होणार नाही हे माहीत होतेच. त्याप्रमाणे दिल्ली, आग्रा, मथुरा, फतेहपूर सीकरी एवढाच प्लॅन ५ दिवसांसाठी ठरवला.
जुनी दिल्ली, लाल किल्ला, म्युझियम वगैरे पाहिले. मथुरा वृंदावन, आग्रा किल्ला, ताजमहाल हे बघून झाले. हॉटेलवाल्याने गाडी ठरवून दिली होती तो ड्रायव्हर मुस्लिम होता. अतिशय अदबशीर ऊर्दू-हिंदी बोलणारा आणि व्यवस्थित माणूस. पान सिगारेट काही व्यसन दिसले नाही. ग्रँड ट्रंक रोडवर दरोडे वगैरे घातले जातात असे काहीबाही सांगत होता. फतेहपूर सीकरीला जाताना किल्ल्याजवळ पोचताच ५/६ टपोरी पोरांनी गाडीच्या मागून पुढून धावत गाडीला अक्षरशः घेरले. दोघेजण गाडीच्या बॉनेटवर चढले. शेवट ड्रायव्हरने गाडी थांबवली. पोरे एकूण 'अवतार' दिसत होती. ऊर्मट भाषेत आम्ही गाईड आहोत, किल्ला दाखवू म्हणाले. ड्रायव्हर काही बोलेना. दोन म्हातारे आणि दोन मुले बरोबर असताना विरोध तरी कसा करणार?
नशिबावर भार टाकून त्यांच्याबरोबर गेलो. त्यानी सलिम चिश्तीच्या दर्ग्यात नेले. तिथे चादर चढवा म्हणून त्या चादर विकणार्‍याला दीडशे रुपये देणगी झाली, फुले सब्जा वगैरे झाले. आणि मग त्या पोरांना खंडणी दीडशे रुपये दिल्यावर परत त्यांनी गाडीकडे आणून सोडले. गाडी सुरू झाल्यावर ड्रायव्हर म्हणाला "साब, असली किला आगे दूसरे दरवाजे से जाकर मिलेगा" पुन्हा आता असलाच प्रकार आहे का म्हणून जीव मुठीत धरून बसलो. पण नाही. तिकडे गेल्यावर खरा किल्ला, जोधाबाई महाल, दरबार वगैरे बघायला मिळाला. पण साक्षात दिल्लीच्या जवळ गाईडच्या नावाखाली अशी लुटालूट कशी काय चालू देतात हा प्रश्न पडला. ड्रायव्हरही त्या प्रकारात सामील असावा का शंका आलीच, पण हा प्रकार होऊन गेल्यावर आता काय उपयोग होणार होता? तीनशे रुपये अक्कलखाती खर्च समजून गप्प बसलो. मात्र इतर ट्रिप छान झाली त्यामुळे एक गालबोट एवढेच म्हणून दुसर्‍या दिवशी शॉपिंगला आणि चांदनी चौकात जायचे ठरवले.
-------------------
दिल्ली
चांदनी चौकात एक दहा मिनिटे भयानक टेन्शनची गेली. झालं काय की तिथल्या प्रसिद्ध गुरुद्वारासमोर आम्ही जरा रेंगाळलो तेवढ्यात सासरे आणि सासूबाई गायब!! जिवाचे पाणी झाले. त्याना हिंदी काही समजत नाही. सगळ्या बाजूंना माणसांचा अफाट सागर. धनत्रयोदशीचा दिवस, संध्याकाळ. सगळी दिल्ली शॉपिंगसाठी बाहेर पडलेली. शोधायचे तरी कुठे? मुलाचे प्रसंगावधान तेवढ्यात कामाला आले. तो म्हणाला आजोबा आपल्या पुढे या फूटपाथवर चालत पुढे होते. त्यांच्यासोबत आजी पण होती. नवरा अक्षरशः धावत त्या दिशेने गेला. एका सिग्नलसमोर फूटपाथच्या टोकाला दोघेही उभे सापडले! (माझ्या सासर्‍यांना असे कोणी सोबत आहे का नाही न बघता चालत सुटायची सवय आहे) तिथल्या ट्रॅफिकमधे रस्ता क्रॉस करायची हिंमत त्यांना झाली नाही हे नशीब.
शॉपिंग वगैरे विचार कॅन्सल करून आम्ही परत पहाडगंज एरियातल्या हॉटेलवर आलो. हॉटेलच्या बाहेर वातावरण जरा विचित्र वाटले. लोक काळजीत दिसत होते आणि घाईघाईत इकडून तिकडे जात होते. बहुतेक हॉटेल्स आणि दुकाने बंद होती. जरा टेकतोय तेवढ्यात भावाचा फोन आला, "तुम्ही कुठे आहात? सगळे सुरक्षित आहात ना?" काय झालं म्हणून विचारले तर टीव्ही लाव म्हणाला. पहाडगंज भागात बॉम्बस्फोट झालाय. अजून कुठे कुठे बाँबस्फोट झालेत आणि चांदनी चौक भागात एक बॉम्ब पकडला गेलाय. अरे देवा!
आम्ही राहिलो होतो तिथून २ रस्ते ओलांडून पलिकडच्या गल्लीत बाँबस्फोट झालेला. चांदनी चौक मधून आम्ही निघालो त्यानंतर अर्ध्या तासात तिथेही एक बाँब डिफ्युज केला होता! सासरे दुसर्‍या खोलीत विश्रांती घेत होते. त्यांना ब्लडप्रेशरचा त्रास आणि अनोळखी गावात उगीच टेन्शन नको म्हणून काही सांगितलेच नाही. रात्री हॉटेलचे रेस्टॉरंट बंद होते. बरेचसे चालून एक बंगाली खानावळ उघडी सापडली. तिथे पटापट मिळाले ते जेवून परत येऊन झोप काढली. सासरे जरा त्या जेवणाबद्दल कुरकूर करत होते, पण ते फक्त ऐकून घेतले. दुसर्‍या दिवशी ऑगस्ट क्रांतीने परत यायची तिकिटे काढली होती.
संध्याकाळपर्यंतचा वेळ कसातरी काढला. बाहेर कुठे जाणे शक्य नव्हतेच. गाडीत पेपर बघताना सासर्‍यांना समजले की दिल्लीत बाँबस्फोट झाले. मुंबईला नणदेच्या घरी पोचल्यावर ते गप्पा सांगत होते, दिल्लीत असे बाँबस्फोट झाले तसे झाले, तेव्हा मुलगा म्हणाला, "काय आजोबा, दिल्लीत असताना तुम्हाला स्फोट झाले हे कुठे माहीत होते?" :D हा आमचा बॉम्बस्फोटांचा सर्वात जवळून घेतलेला अनुभव. प्रत्यक्षात ज्यांना असे कुठे दुर्दैवाने स्फोटाच्या किंवा दहशतवादाच्या तडाख्यात सापडून त्रास होत असेल त्याची किंचित का होईना कल्पना मात्र तेव्हा आली.
--------------------
बंगलोर - म्हैसूर
२००६ साली म्हैसूर, बंगलोर ऊटीला जायचे ठरले. बंगलोर पर्यंत रेल्वेची तिकिटे आयआरसीटीसीवरून विनासायास काढली. मात्र हॉटेल आणि तिथल्या लोकल साईट सीइंगची व्यवस्था तिथे गेल्यावर करू म्हणून निवांत राहिलो. गेल्यावर बंगलोरमधे हॉटेल चांगले मिळाले. म्हैसूर बघायचे आहे केटीडीसी च्या बसची तिकिटे कुठे मिळतील म्हणून हॉटेलवाल्याला विचारले. तर इथेच शेजारी ऑफिस आहे म्हणाला म्हणून आम्ही बुकिंग केले. ऑफिस लहानसे होते. आणि प्रवासाची तिकिटे हातात पडली त्यावर दादा ट्रॅव्हेल्स असे नाव! बाहेर येऊन पाहिले तर केटीडीसीचा बोर्ड!! हा काय प्रकार म्हणून विचारले तर "इदर ऐसाच रहता" हे उत्तर तिथल्या माणसाने दिले.
हे सगळे काही बरोबर वाटेना. संध्याकाळी पुन्हा तिकिटे कॅन्सल करावी म्हणून गेलो तर तिथे दुसराच कोणीतरी गुंडासारखा दिसणारा माणूस बसलेला. त्याची हिंदी अजून दिव्य. पण अर्थ समजला. तिकिटे कॅन्सल होणार नाहीत. तुम्हाला नको तर येऊ नका. पैसे परत मिळणार नाहीत हे समजले. आता असो. काय फसवणूक करतील? एखादे दुसरे ठिकाण दाखवणार नाहीत. असे ना का! जाऊ म्हणून दुसर्‍या दिवशी सकाळी सांगितल्या ठिकाणी भरभर आटपून हजर राहिलो. आठाचे नऊ झाले, नऊचे दहा झाले तरी बसचा पत्ता नाही! शेवट साडेदहाला एकदाचा एक बसनामक प्रचंड आवाज करणारा खटारा आला. इतका उशीर म्हटल्यावर माझे डोके आधीच गरम झाले होते.
बस अजून उशीर उशीर करत काही ठिकाणे दाखवून चालत होती. त्या बसवाल्यांची जेवणाची ठिकाणे ठरलेली असतात. तिथे पोचायला दुपारच्या दीडऐवजी पावणेचार झाले. प्रवासात असल्याने काही च्याव म्याव बरोबर होतं. पण माझ्या मुलाला पहिल्यापासून वेळेवर व्यवस्थित जेवायची सवय. त्याला खूप भूक लागलेली. त्याचे कळवळणे बघून मला रडू फुटले. आधीच केटीडीसीच्या नावाचा वापर करून फसवणूक झाली म्हणून डोक्यात संताप खदखदत होता. त्यात सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मुलाचा त्या दिवशी वाढदिवस म्हणून आम्ही ती ट्रिप आखली होती!
माझा सगळा संताप टूर गाईडवर निघाला. त्याला म्हटले, वेळेवर गाडी जेवायला का थांबवली नाही? तो म्हणे की आमची ठरलेली हॉटेले असतात. त्या दिवशी मी त्यालाच नव्हे, त्याच्या मुलांना शाप दिला. म्हटले, तुला मुले आहेत? माझ्या मुलाला वाढदिवसाच्या दिवशी तुझ्यामुळे उपाशी रहावे लागले, तुझी मुले पण उपाशी राहतील. त्याच्या चेहर्‍यावर एकच अर्धा क्षण चलबिचल दिसली. पुन्हा काहीच झाले नाही असा तो निगरगट्टपणे पुढे चालता झाला.
संध्याकाळी परत यायला उशीर झाला. सगळ्या दिवसाची वाट लागली होती. भुकेमुळे कोणाला काय पाहिले त्यातही इंटरेस्ट राहिला नव्हता. फसवणुकीमुळे अपमान, निराशा आणि असल्या सगळ्या निराश भावना घेऊन ती म्हैसूर ट्रिप पार पडली. दुसर्‍या दिवशी ऊटीला जायचे होते. सुदैवाने दादा ट्रॅव्हेल्सकडे बुकिंग केले नव्हते. आम्हीच दुसर्‍या एका बसने गेलो आणि कोणत्याही अपघाताशिवाय बंगलोरला परत आलो. मैसूरच्या दादा ट्रॅव्हेल्सच्या अनुभवावर जरा उतारा मिळाला. चांगली गोष्ट म्हणजे ऊटीहून परत येताना बसमधे मुंगारु मळे चित्रपटाची अतिशय गोड गाणी पहिल्यांदाच ऐकायला मिळाली!
नंतर इकडे तिकडे बोलताना कळले की बंगलोरमधे कसल्याही चिंधी ट्रॅव्हेल्सनी केटीडीसीचे बोर्ड लावून लुटालूट चालवली आहे. आणि केटीडीसीही त्याच्याकडे काणाडोळा करते. आता या गोष्टीला १० वर्षे झाली. आताची परिस्थिती काय माहीत नाही.
-------
उत्तर असो की दक्षिण आपण भारतीय प्रवाशांची फसवणूक आणि प्रेक्षणीय स्थळांच्या जवळ गुंडगिरी यात सगळीकडे सारखेच आहोत! आता हॉटेल बुकिंग आणि लोकल साईट सीइंग सगळे ऑनलाईन आणि सोपे झाल्यामुळे एवढी फसवणूक होत नसेल. पण जे असे ऑनलाईन बुकिंग करू शकत नाहीत, त्यांची परिस्थिती मात्र कठीण वाटते. प्रवासात अनेक चांगले अनुभवही आले. मुलगा अगदी लहान असताना भाषा सुद्धा न कळणार्‍या केरळी हॉटेलवाल्यांकडून वेळोवेळी गरम पाणी, दूध, दूधभाताची व्यवस्था होणे असो की कोणी आजारी पडल्यावर अनोळखी गावात जुन्या डॉक्टरने नीट समजून उपचार करणे असो. आंबटगोड अनुभव सगळीकडे येणारच. मात्र हे फसवणुकीचे दोन अनुभव सांगावेत असे वाटले, कारण एरवी आपण खाजगी कंपन्यांचे काम सरकारी कंपन्यांपेक्षा चांगले असे समजतो, पण प्रवासाच्या क्षेत्रात मात्र सरकारी कंपन्याच उत्तम. कारण गाड्या वेळेत सुटतात, वेळेत पोचतात. आपल्याला किती पैशात काय मिळणार आहे याची सुरुवातीलाच कल्पना असते. व्यवहारात पारदर्शकता महत्त्वाची. इथे गोव्यात येणार्‍यांना मी नेहमी सरकारी गोवा टुरीझमच्या हॉटेल्सची शिफारस करते ती याचसाठी. तिसरा अनुभव म्हणजे दहशतवादाशी लांबून ओळख झाली ती एवढी घाबरवणारी होती, की ज्यांना सहन करावे लागत असेल त्यांच्या हालांची पुसट तरी कल्पना आपल्याला असावी.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

किल्ला चित्रपटाच्या निमित्ताने..

होरपळ

पड्यारमाम