एका घराची गोष्ट




एका घराची गोष्ट.
ही गोष्ट आहे या चित्रातल्या घराची. अगदी "खेड्यामधले घर कौलारू" म्हणण्यासारखं घर. कौलारू असलं तरी खेड्यातलं नाही. चांगलं रत्नागिरीत आहे. हे घर आहे माझ्या आजोबांचं. खरं तर त्यांच्या वडिलांचं. म्हणजे माझ्या पणजोबांचं.
रत्नागिरीत वरची आळी तयार होण्यापूर्वी रहाट आगर नावाचा गाव होता तेव्हा तिथे बापटांची अनेक घरं होती. त्यातलं एक मोठं चौसोपी घर होतं माझ्या पणजोबांचं. माझे पणजोबा त्या काळात म्हणजे १९०० च्या आसपास रत्नागिरीतले प्रख्यात वकील होते. तेव्हापासून या घराला नाव पडलं "बापट वकिलांचं घर." पणजोबा म्हणजे रत्नागिरीतली मोठी असामी. बर्‍यापैकी पैसे बाळगून होते. केवळ हौस म्हणून उतारवयात त्यानी दुसरं लग्न केलं. शेरांत मोजण्याइतकं सोनं घरात होतं पण पणजोबा वारले आणि नंतर त्यांच्या दिवाणजीनी सगळं सोनं नाणं, मालमता हडप केली असं म्हणतात. त्यांचा मोठा मुलगा म्हणजे माझे आजोबा. घर सावत्र आईला देऊन ते घरातून बाहेर पडले.


आजोबा घरातून बाहेर पडल्यानंतर आजोबांचे सावत्र धाकटे भाऊ पोटापाण्याच्या पाठीमागे दूर इंदौर-पुण्याला निघून गेले. चौसोपी घराचा अर्धा भाग आजीच्या बहिणीला विकला गेला. त्या भागात त्यानी चाळ तयार केली. मूळ घर पडायला लागलं. तेव्हा आजोबांच्या भावांनी आजोबांना तिथे, म्हणजे मूळ घरात येऊन रहायला सांगितलं. आजोबांनी राहिलेल्या ३ खोल्यांची डागडुजी करून घराची पडझड थांबवली. घराच्या आजूबाजूला थोडी मोकळी जागा होती. तिथे एक चिंच, एक आंबा, एक माड अशी झाडं होती. आजीने तिथे एक फणसएक माड अशी आणखी काही झाडं लावली. घर परत नीट नांदू लागलं. या आजीला आम्ही 'जुनी आजी' म्हणायचो, तर आईच्या आईला 'नवी आजी'.   


माझे आजोबा सुद्धा वकील. पण त्यानी जन्मात कधी वकिली केली नसावी. केली असलीच तर चालली नसेल. कारण राष्ट्रीय शिक्षणाची शाळा काढा, सावरकरांच्या समाजकार्यात सामील व्हा, ब्रिज खेळा हे उद्योग त्याना पूर्णवेळ गुंतवून ठेवत. पण घराला "बापट वकिलांचं घर" हे नाव चिकटलं ते चिकटलंच. मी लहान असताना "बापट वकिलांची नात का तू?" असं कितीतरी लोक विचारीत असत. आता ती सगळी पिढीच काळाच्या पडद्याआड झाली. पण अजूनही जुने रत्नागिरीकर बापट वकीलांच्या मुलांनातंवंडांना ओळखतात. तर आजोबांचा संसार हळूहळू वाढत गेला. माझे वडील म्हणजे 'दादा' रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका गावात हायस्कूलवर हेडमास्तर म्हणून नोकरीला लागले. आईला पण त्याच शाळेत नोकरी लागली. २ काका नोकरीसाठी वर्धा इथे निघून गेले. आणखी एक काका आजीआजोबांजवळ रत्नागिरीच्या घरात राहिले. आत्याचं लग्न होऊन ती सासरी पुण्याला गेली.


बसणीला आम्ही ज्या घरात राहिलो, त्या घराबद्दल आणखी केव्हातरी सांगेन. ते पण कायमचं जिव्हारी लागून राहिलेलं घर आहे. पण आता या गोष्टीतल्या माझ्या आजोबांच्या घराबद्दल सांगते. तर दर वर्षी दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आजीआजोबांकडे रत्नागिरीला जायचो. घराच्या अंगणात तर्‍हेतर्‍हेचे खेळ रंगायचेपण सगळ्यात मजा यायची ती आजीच्या फडताळात आणि काकांच्या जुन्या लाकडी कपाटात काय खजिना लपवलाय हे शोधायला. तिथेच मी सगळ्यात पहिल्यांदा सावरकरांचं वाङमय आणि पुरंदर्‍यांच्या 'राजा शिवछत्रपती'चे खंड वाचले. वर्धेचे काका क्वचितच कधीतरी यायचे. पण तेव्हा शेजारच्या जरा लांबच्या नात्यातल्या काकांकडे पण आणखी चुलतभावंडं यायची. मग आमचा पत्त्यांचा डाव घराच्या ओट्यावर रंगायचा. एक रुपया तिकिटात कुठचा लागलेला असेल तो सिनेमा बघायचा. रोज संध्याकाळी समुद्रावर जायचं. नुसती धमाल चालायची. 


मध्यंतरी जागा कमी पडते म्हणून दादांनी मूळ घराला जोडून आणखी २ खोल्या बांधल्या. आणखी एक आंब्याचं कलम लावलं. काकांनी पोफळीचिकू, पपनस, डाळिंब, सोनचाफा, प्राजक्त अशी आणखी काही झाडं लावली. घर सुखात नांदत होतं. 'आपलं घर आहे, दुसरं घर कशाला बांधा?' असं म्हणत माझ्या दादांनी लोक सांगत असतानाही दुसरं घर नाहीच घेतलं. काळाप्रमाणे आजोबा देवाघरी गेले. आमचं सुटीत रत्नागिरीच्या घरात जाणं चालूच राहिलं. पण मी दहावीत असताना अचानक दादा हार्ट अटॅकने गेले. त्यावर्षीच्या सुटीत मन गुंतवण्यासाठी मी भरतकाम शिकले. मग रंग आणि रेषांशी गट्टी जमली ती कायमची. नंतरच्या काही वर्षांत इंदिरा गांधी, सुनील गावस्कर, कपिलदेव अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींची पेन्सिल स्केचेस मी काढली. 


दादांच्यानंतर आणखी ३ वर्षांत माझा मोठा भाऊ सुद्धा गेला. मग माझ्या आईने राहिलेल्या २ मुलांना घेऊन रत्नागिरीच्या घरात आसरा घेतला. मूळ घर आणि आमच्या २ खोल्या यातला दरवाजा कायम उघडाच असायचा. चुली २ असल्या तरी घर एकच होतं. दादांनी लावलेला आंबा आता चांगला धरायला लागला होता. २ चुलतबहिणी आणि आमची शिक्षणं चालू राहिली. यथावकाश आमची शिक्षणं संपून नोकर्‍या सुरू झाल्या. मग लग्न होऊन सगळे आपाआपल्या वाटांनी चालू लागले. पण त्यापूर्वी मला ३ नोकर्‍यांची कॉल लेटर्स एकाच दिवशी आली ती याच घरात. लग्नाआधी नवर्‍याबरोबर कोवळी मैत्री होती तेव्हा त्याला पावभाजी खायला बोलावला ते याच घरात. आणि लग्न ठरल्यावर कोजागिरीला गप्पा मारत बसलो ते याच घराच्या अंगणात.  लग्नासाठी मी बाहेर पडले ते याच घरातून आणि नंतर लगेच कॅन्सरशी जीव दमवणारी झुंज देऊन आई परत आली ती याच घरात. आणखी एका वर्षात जगातलं सगळ्यात सुंदर बाळ घेऊन हॉस्पिटलमधून मी आले ती याच घरी. घराने ५ व्या पिढीला पाहिलं आणि त्याचा जीव हरखला. आणखीही भले बुरे, कधी घ्ररातल्या माणसांची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग घराने अनुभवले. कधी ते सग़ळ्याचा मूक साक्षीदार असायचं, तर कधी त्या प्रसंगातलं एक पात्र.  


हळूहळू आम्ही सगळीच चुलतभावंडं आपापल्या संसारात गुरफटत गेलो. मुलांच्या शाळा सुरू झाल्या. तरी अधूनमधून रत्नागिरीला जाणं चालू राहिलं. काही वर्षानी आर्थिक स्थैर्य आल्यावर मीही रत्नागिरीत फ्लॅट घेतला. आई भावाबरोबर त्याच्या नोकरीच्या गावी निघून गेली. पण नातसुनेबरोबर कुरबूर झाली की "आपण दोघी रत्नागिरीला जाऊन राहूया" असा आग्रह नवी आजी आईजवळ धरायची ती याच घराच्या जिवावर.  मग दोन्ही चुलतबहिणी लग्न होऊन नवर्‍यांच्या गावांना गेल्या. त्यांचे संसार वाढलेआणि घरात काकाकाकू दोघंच राहिले. दरवेळेला रत्नागिरीला गेलं की घरी एक फेरी व्हायचीच. तेव्हा मुलं पण कपाटातला आणि माळ्यावरचा खजिना शोधायची. त्यात त्यांना जुनी पत्रं, पुस्तकं, माझी खेळणी काय काय सापडायचं. त्यांनाही तेवढीच मजा यायची. 


मुलं मोठी होत होती. तसं रत्नागिरीला जाणं कमी होत होतं. काका काकूचं त्यांच्या संसाराचं सुखदु:खाचं रहाटगाडगं सुरू होतंच. एकीकडे रत्नागिरीही बदलत होती. राजकीय गुंडगिरी सुरू झाली होती. जुनी घरं पाडून तिथे अपार्टमेंट्स बांधायचा धडाका चालू झाला होता. अशी अनेक घर काळाच्या उदरात गडप झाली. स्वा. सावरकर ज्या घरात रहात होते, ते घर पाडून तिथेही कॉम्प्लेक्स उभा रहाताना पाहिला तेव्हा जीव कासावीस झाला. रहाटआगर गाव्यातल्या बापटांच्या घरांपैकी आता फक्त बापट वकिलांचं घर शिल्लक राहिलं होतं.


हल्लीच अचानक शेजारच्या रानड्यांनी त्यांचा राहता मोठा वाडा एका बिल्डरला विकला. या बिल्डरची दृष्टी शेजारच्या जागेतील बापट वकिलांच्या घराकडे न वळती तरच नवल! त्याने दूरवर असलेल्या काका आणि चुलतकाकांना चांगले पैसे देण्याची खात्री दिली. बरेच काका घर विकायला तयार झाले. त्यांना काही हासभास नसताना त्यांच्या हिश्श्याचे पैसे मिळणार आहेत. आता तिथे रहातायत त्या काकांना स्वस्तात एक फ्लॅट मिळणार आहे. त्या दोघांचं इतक्या वर्षांचं घर सोडून आता म्हातारपणात फ्लॅट तयार होईपर्यंत भाड्याच्या घरात रहावं लागणार आहे. फ्लॅट ताब्यात मिळेल तेव्हा नव्या फ्लॅट संस्कृतीशी जमवून घ्यावं लागणार आहे. ही गोष्ट वगळता, भावाच्या डोक्याचा ताप नाहिसा होणार आहे हे महत्त्वाचं. २ काकांना पैश्यांची जरूर आहे, त्यांचीही सोय होणार आहे. बिल्डरला बाजारभावाने कमीत कमी दीड कोटींचा फायदा होणार आहे. बहुजनांच्या सोयीचा असाच हा मामला आहे. म्हणजे तो चांगला असणारच. पण घर पाडलं जाणार हे कळल्यापासून ‍मला ही रुखरुख का लागली आहे? माझ्या वडिलांचं-दादांचं स्वप्न संपणार आणि माझ्या डोक्यावरची सावली जाणार असं का बरं वाटतंय?


मुलांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्या दोघांचा एकच प्रश्न होता. "पण घर कशाला पाडायचं?". या जगाचा व्यवहार कळायला त्यांना अजून बरीच वर्षं उलटावी लागतील. परवाच रत्नागिरीला जाऊन भावाला 'पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी' देऊन आले. मुलीने घराचे, दादांनी लावलेल्या आंब्याचे फोटो काढले. काकूजवळ तेव्हा जास्त काही बोलले नाही. मला परत इथे यायची हिंमत होणार नाही हे कोणत्या तोंडाने तिला सांगणार होते? मुलीने आणि तिच्याबरोबर मीही सहजच, टाकून देण्यासाठी काढलेल्या कॅसेटस, अंक याच्या ढिगात आमचा खजिना शोधायचा उद्योग चालू केला. आणि उत्खनन सुरू करताक्षणी काय हाती लागलं? मी १९८२-८५ च्या काळात काढलेली इंदिरा गांधी, सुनील गावस्कर आणि इतरांची पेन्सिल स्केचेस, आणि दादा ज्या गोष्टींमुळे बापट सर म्हणून प्रसिद्ध झाले त्या गोष्टी, त्यांच्या एम्.ए. आणि बी.एड. च्या डिग्र्या! गेली कित्येक वर्षं घरी गेल्याबरोबर प्रत्येक वेळेला न चुकता मी या चित्रांचा शोध घेत असे, पण २५ वर्षं ही चित्रं मला कधीच सापडली नव्हती. यावेळेला मात्र चित्रं उचलली आणि घराच्या भिंतीवरून एकदा हात फिरवून बाहेर पडले. माझी आई शोभली असती अशा एका जुन्या मैत्रीण्-शेजारणीबरोबर थोड्या गप्पा केल्या. तिला मात्र सांगितलं, मी परत कधी इथे येणार नाही म्हणून. आणि मनात एक वादळ घेऊन परत फिरले ती अजिबात मागे वळून न पहाता, डोळ्यात आलेलं पाणी लपवीत.


रत्नागिरीहून परत आले ती एक अस्वस्थता सोबत घेऊनच. माझ्याकडे पूर्वीपासूनचे खूप आल्बम्स आहेत. त्यात दादांचा फोटो जरी नसला तरी नव्या आजीचा आहे. घरच्या गोंडस मांजरीचा फोटो आहे. सुरुवातीच्या काही आल्बम्समधे डोळ्यात स्वप्न भरलेल्या, एका नवीन लग्न झालेल्या मुलीचे आणि तिच्या प्रेमात हरवलेल्या तिच्या नवर्‍याचे फोटो आहेत. आणखी काही आल्बम्समधे वाढणार्‍या २ मुलांचे असंख्य फोटो आहेत. एका अतिशय दु:ख देऊन परत न येण्यासाठी निघून गेलेल्या गुणी बोक्याचे फोटो आहेत. या फोटोंमधे आता रत्नागिरीच्या घराचे आणि दादांनी लावलेल्या आंब्याच्या झाडाचे फोटो यांची भर पडली आहे. 


आणखी ४ दिवसांत अ‍ॅग्रीमेंटचे सोपस्कार पुरे होतील. बिल्डरने १८ फ्लॅट्स चा प्लॅन सुद्धा तयार केला आहे. लगेच घर पाडलं जाईल. पणजोबांनी, आजीने, दादांनी लावलेली झाडं तोडली जातील. लवकरच तिथे १८ फ्लॅट्सवाली बिल्डिंग उभी राहील. तिथल्या ५५० स्क्वेअर फुटांच्या घरांची दारं सदोदित बंद असतील. आई किंवा काकू घरी नसली तरी शेजारी कोणाकडेही जाऊन "मला जेवायला वाढा" म्हणायची पद्धत तिथे असणं शक्यच नाही. रत्नागिरीतला 'बापट वकील यांचे घर' हा पत्ता पोस्टाच्या माहितीतून नाहिसा होईल. जगाच्या दृष्टीने येऊन जाऊन एवढाच काय तो बदल.


रत्नागिरीहून परत आल्यापासून सतत घराचा, काका काकूंचा आणि मी काढलेली स्केचेस २५ वर्षांनी आता अचानक सापडावीत याचा विचार करते आहे. इतकी वर्षं घर होतंच, पण अबोलपणे एखाद्या व्यक्तीसारखं ते माझ्या मनात येऊन राहिलं आहे हे आताच कळलं.  माझ्या आजोबांचं, आजीचं, दादांचं घर आता रत्नागिरीत नसेल या विचाराने मुळातून उखडलेल्या झाडाला कसं वाटत असेल याचा अनुभव घेत होते. आणि आज सकाळी अचानक साक्षात्कार झाला, मी काढलेली स्केचेस २५ वर्षांनी सापडावीत याचा अर्थ हा, की ही या घराने मला दिलेली कोसळण्यापूर्वीची शेवटची भेट आहे. न जाणो, इतकी वर्षं घराने माझी चित्रं उराशी धरून सांभाळून ठेवली होती, पण आता मूकपणे जणू त्याने मला सांगितलंय की ही तुझी ठेव आता परत घे, माझे दिवस संपले! आणखी म्हणावं तर ही चित्रं आणि त्याच्याबरोबर दादांची डिग्री सर्टिफिकेट्स एकदम सापडावीत यातून मला दादांनीच संदेश दिलाय की दगड मातीचं घर पडलं तरी काय झालंत्यांचा हात माझ्या डोक्यावर कायम आहे आणि राहील!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नर्मदे हर!!

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर

Earth’s Children