वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती


बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.
माझे आईवडील गावातल्या हायस्कूलवर नोकरी करायचे. एक नात्याने लांबचे पण मनाने जवळचे काका काकू पण त्याच शाळेत नोकरी करायचे. त्यांची मुलं मी आणि माझा धाकटा भाऊ, आमच्याच आगेमागेच्या वयाची. तेव्हा दर शनवार रविवार आम्ही तरी काकांकडे नाहीतर दोघं चुलत भावंडं आमच्याकडे मुक्काम टाकून उनाडत असायची. डोंगरावर जाऊन दिवस दिवस उन्हातान्हात फिरून कैर्‍या काजू खात बसा वगैरे सुटीचे उद्योग, तर एरवी आम्ही चौघंजणं शेजारच्या पोरांना गोळा करून क्रिकेट, लगोर्‍या वगैरे खेळायचो.
गावात एकूण वातावरण बर्‍यापैकी जुन्या पद्धतीचं. गावातले अनेक पुरुष मुंबईत किंवा बोटीवर नोकर्‍या करायचे आणि त्यांच्या बायका हिंमतीने घरं चालवायच्या, शेती करायच्या आणि मुलांवर आणि गुराढोरांवर पण लक्ष ठेवायच्या. गावात एक पटवर्धन आजी होत्या. त्या कीर्तन करायच्या म्हणून त्यांना लोक "बुवा" म्हणायचे. त्या खर्‍या मुंबईतल्या पण पटवर्धन आजोबा रिटायर होऊन गावाला आले तशा आजी पण त्यांच्याबरोबर आल्या. आणखी एक गोरे बाई होत्या. त्या खूप श्रीमंत. पण सासरी त्यांचं पटलं नाही म्हणून घटस्फोट झाला होता. आणखी एक अलका म्हणून घटस्फोट झालेली बाई होती, ती तर वडाची पूजा वगैरे पण करायची. सगळे प्रकार होते, पण आम्हाला त्यात काही विशेष वाटायचं नाही. स्त्रीमुक्ती वगैरे शब्द तर कधी कानावर पण आले नव्हते.
ही पार्श्वभूमी का सांगतेय तर वासंती भाटकरची चित्तरकथा सांगण्यासाठी. आम्ही नेहमी काकांकडे रहायला जायचो, तेव्हा एकदा एक साधारण आमच्याच वयाची मुलगी घासलेली भांडी काकूच्या स्वयंपाकघरात ठेवून पटकन आमच्याबरोबर खेळायला आली. बहिणीने सांगितलं ती "आशी" म्हणजे आशा. मग हळूहळू कळलं की आशाची आई वासंती भाटकर काकूकडे घरकाम करायला यायची. आशाला आणखी तीन भावंडं होती. मोठा पक्या, नंतर कुंदा, नंतर आशा आणि मग पिंट्या. या पोरांचा बाप वसंता भाटकर. तो एक स्पेशल नग होता. ही मंडळी रस्त्यापलीकडे काही अंतरावर रहायची. काकूकडे जाताना त्यांचं केंबळी घर दिसायचं.
वसंता भाटकर नावापुरती एका गलबतावर खलाशाची नोकरी करायचा. ती नोकरी बहुधा ६-८ महिने असावी. मग उरलेल्या वेळात वसंता घरी असायचा. घरी म्हणजे काय गुत्त्यात. वसंता अट्टल दारुड्या होता. गावठी प्यायचा. शुद्धीवर आला की परत गुत्त्याची वाट धरायचा. वासंतीचं आयुष्य इतर गरीब बायकांसारखंचं कमी अधिक प्रमाणात चाललेलं. दोन तीन घरची धुणी भांडी करून किडूक्मिडूक जोडत होती. काकूचा तिला बराच आधार होता. वासंतीची मुलं पास-नापास होतं थोडंफार शिकत होती. जरा वेगळेपण म्हणजे वसंता पिऊन आला की वासंतीला भरपूर मारायचा. नाहीतर दारूला पैसे हवेत म्हणून मारायचा. शेजारचे लोक बघत असायचे. त्याना तरी दुसरी करमणूक काय? वासंतीला जास्तच मार पडला की कुंदा नाहीतर आशा काकूकडे कामाला यायच्या. बहुतेकवेळा संध्याकाळी कोणतरी पोरं सांगत यायची वसंता पिऊन कुठेतरी पडलाय म्हणून. मग वासंती आणि तिची पोरं शिव्याशाप देत त्याला कशीबशी घरी आणायची.
हे नेहमीचं झाल्यानंतर हळूहळू कही बदल व्हायला लागले. म्हणजे वसंताची तब्ब्येत उतरत चालली. एकदा वसंता वासंतीला मारता मारता पक्याने कंटाळून त्याला ढकलून दिलं आणि तो पडला. मग यांच्या लक्षात आलं की आता वसंताला घाबरायचं कारण नाही. मग हळूहळू कधीतरी वसंताला ढकलून गप्प बसवणं नेहमीचं झालं. रस्त्यात पडला तर पोरं त्याला ढकलत घरी आणून टाकायला लागली. पोरं नाहीतर वासंती कधीतरी वसंतावर हात उचलायला लागली. शेजार्‍यांना तीही करमणूक झाली. पावसाळा संपला की वसंता गलबतावर कामाला जायचा. मग वासंतीला जरा शांतता मिळायची.
अशीच वर्षं चालली होती. दरम्यान आणीबाणी येऊन गेली. जनता पार्टीचं सरकार येऊन गेलं. गावात बर्‍याच जणांकडे रेडिओ आले. साखरतरवर पूल झाला. रत्नागिरीला थेट बस सुरू झाल्या. मग काका काकू मुलांच्या शिक्षणासाठी रत्नागिरीला जाऊन राहिले. आमच्याही आयुष्यात बरेच बदल झाले. आणि आम्ही पण रत्नागिरीला रहायला गेलो. तरी आई आणि काका काकू बसणीला रोज नोकरीसाठी जायचे त्यामुळे गावात काय चालू आहे याच्या बातम्या मिळायच्या. अशीच आणखी काही वर्षं गेली. आमची कॉलेज शिक्षणं संपली. नोकर्‍या वगैरे सुरू झाल्या. बसणीतले पटवर्धन आजोबा गेले. आणखी काही लोक गेले. अशीच एकदा बातमी मिळाली की वसंता भाटकर पण दारू पिऊन मरून गेला. जरा हळहळ वाटली.
आता वसंती काय करत असेल? काकू रत्नागिरीत रहायला आली आता तिला कोणाचा आधार असेल? मग हळूहळू वासंती भाटकर मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी मागे राहून गेली. एकदा कुणाच्या तरी मंगळागौरीसाठी बसणीला जायचा योग आला. काका काकू पूर्वी रहायचे तिथेच शेजारी माझ्या वर्गातली सख्खी मैत्रीण रहायची. बसणीला गेलेच होते तर तिच्याकडे पण गेले. जाताना वाटेत वासंतीचं घर होतं तिथे एक चांगलं कौलारू रंगीत घर दिसलं. जरा चुटपुट लागली. नवरा मेल्यावर वासंती देशोधडीला लागली की काय? त्या घरात आता कोण रहात होतं? मैत्रिणीकडे चौकशी केली. तर ती हसायला लागली.
"अग, ते वासंतीचं घर आहे."
"म्हणजे? वसंता मेल्यावर त्यांची परिस्थिती एकदम सुधारली की काय?"
"हो. तसं म्हणायला हरकत नाही. म्हणजे असं की वसंता मेला. वासंतीच्या दोन कामांवर त्यांचं काही भागेना. पक्याची शाळा दहावीत संपली. मग काय! वासंतीने हातभट्टीची गाळायचा धंदा सुरू केला! गावातले बाकी गुत्ते पार बसले."
मी थक्कच झाले. नवर्‍याच्या पाठीमागे हिंमतीने मुलांना शिकवल्याच्या वगैरे कहाण्या आपण खूप ऐकतो. पण ज्या दारूने नवर्‍याचा बळी घेतला, तिचाच धंदा करून पैसे कमवायचे आणि त्या धंद्यातल्या आधीच्या लोकांना घरी बसवायचं हे प्रकरण जबरदस्तच! अशा प्रकारे वसंती भाटकर यशस्वी उद्योजक झाली आणि तिच्यापुरती बसणीत झाली एकदाची स्त्रीमुक्ती!

टिप्पण्या

  1. बापरे...... बरंच काही वाटतंय वासंतीबद्दल....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. इंद्रधनू, धन्यवाद! हम्म. मला पण खरं तर सगळंच शब्दात पकडता येत नाहीये.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नर्मदे हर!!

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर

Earth’s Children