ऐका गणेशदेवा तुमची कहाणी

ऐका गणेशदेवा तुमची कहाणी.
निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे.
विनायकाची देवळे, रावळे.
मनचा गणेश मनी वसावा.
हा वसा कधी घ्यावा?
श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा.
संपूर्णाला काय करावे?
पशा पायलीचे पीठ कांडावे. अठरा लाडू करावेत.
सहा देवाला, सहा ब्राम्हणाला, सहाचं सहकुटूंब भोजन करावे.
अल्प दान, महा पुण्य
असा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतीले लाभिजे.
ही पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
**********
श्रावणात प्रत्येक वारी त्या त्या वाराची कहाणी आजी वाचायची. त्या कहाणीच्या आधी ही गणेशाची कहाणी नेहमी वाचायची. आजीला तर ही कहाणी पाठच होती. कोणत्याही कामाची सुरुवात म्हणजे श्रीगणेशा करायचा तर गणपतीचे नाव घेणे परंपरेत आवश्यक समजले जाते ना, म्हणूनच ही लहानशी गणेशाची कहाणी. अगदी साधी सोपी. मोजक्या शब्दात गणपतीच्या राऊळाचे वर्णन आहे. निर्मळ मळे उदकाचे तळे. बेलाचा वृक्ष आहे. म्हणजे शिवाचे देऊळ कुठेतरी जवळपास असणार. तळ्यात सुवर्णकमळे आहेत. आणि तळ्याशेजारी विनायकाचे देऊळ आहे. गणपतीचे विनायक हे नाव पुराणांमधे आणि बौद्ध तंत्रात वापरले गेले आहे.
कहाणी सांगते की "मनचा गणेश मनी वसावा." त्या विनायकाला मनात वसवा. त्यासाठी एक व्रत सांगितले आहे. सहा महिन्यातल्या एकूण ७ चतुर्थ्यांना विनायकाचे पूजन करावे आणि व्रत पूर्ण करताना लाडूंचा प्रसाद करावा. मग ते लाडू देवा-ब्राह्मणाला देऊन बाकीचे आपण खावेत. हे बरं आहे. म्हणजे ब्राह्मणांची मस्त सोय आहे! "मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतिले लाभिजे" ही भाषा पाहिली तर रामदासांची किंवा जरा आधीची अशी वाटते.
बाकी कहाण्या "साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संप्रूण" असतात. पण ही कहाणी मात्र "पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण" असं सांगितलं आहे. कारण बाकी कहाण्या मुळात मोठ्या असून संक्षिप्त केल्या आहेत. पण गणेशदेवाची कहाणी मात्र मुळातच संक्षिप्त आहे हे त्याचं कारण!
**********
कहाणीसारखा दुसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे आरत्या. पैकी "सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची" बद्दल आपण प्यारे१ ने विस्ताराने लिहिलेलं वाचलं. परंपरेनुसार ती आरती संत रामदासांनी रचलेली. रामदासांच्या नावावर मारूतीची आणि इतर काही आरत्या आहेत. या आरत्यांबरोबर माझ्या आजीची आवडती आणखी एक आरती होती. विशेष म्हणजे ती हिंदीत आहे. माझ्या आजीला हिंदी येत नव्हतं पण ही आरती तिला पाठ होती. तिचे ऐकून आम्ही पण म्हणायला लागलो.
*******
शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ।।
हात लिये गुडलड्डू सांई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूं पदको ।।१।।
जय जय जी गणराज विद्यासुखदाता । धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ।।ध्रु०।।
अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी । विघ्नविनाशक मंगल मूरत अधिकारी ।।
कोटीसूरजप्रकाश ऐसी छबि तेरी । गंडस्थलमदमस्तक झूले शशिबहारी ।।जय०।।२।।
भावभगतिसे कोई शरणागत आवे । संतत संपत सबही भरपूर पावे ।।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे । गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ।।जय०।।३।।
*******
आता शोध सुरू झाला हे गोसावीनंदन कोण? शोधताना डॉ. केतकरांच्या ज्ञानकोषात त्रोटकशी माहिती मिळाली. ती पुढीलप्रमाणे.
गोसावीनंदन.- याचें नांव वासुदेव असून बापाचें नांव गोस्वामी (गोसावी) होतें. हा तंजावरकडील राहणारा असून याचे गुरु गोपाळश्रमगजानन नांवाचे होते. अर्वाचीनकोशकार याच्या गुरूंचें नांव निरंजनस्वामी असें देतात. याचा काल इ. स. १६५०-१७०० चा होय. याचा मुख्य ग्रंथ ज्ञानमोदक नावाचा असून शिवाय सीतास्वयंवर व अभंग, पदें वगैरे स्फुटकाव्य बरेंच आहे. यांचीं स्तोत्रें व अष्टकें लहान मुलांनां शिकतां येतील अशीं सोपीं व साधीं आहेत; हा गाणपत्य होता. [महाराष्ट्रसारस्वत].
********
म्हणजे ही आरतीसुद्धा शिवाजीमहाराजांइतकी जुनी निघाली! मग पार्थिव गणेशाची पूजा किती जुन्या काळापासून सुरू असावी? सुरुवात कधी झाली नक्की ते सांगता येणार नाही. घाटावर ही प्रथा पेशव्यांच्या काळापासून सुरू झाली असे म्हणतात. पण कोकणांत तर फार पूर्वीपासून पार्थिव गणेशाची पूजा सुरू होतीच. पेशव्यांच्या आधीपासून हे नक्कीच. याला एक अप्रत्यक्ष पुरावा आहे.
गोव्यात पोर्तुगीजांच्या छळाला भिऊन पणजीतले कामत, हेदे आणि इतर काही घराण्यांत पार्थिव गणपतीऐवजी कागदाच्या गणपतीची पूजा सुरू झाली. त्यांच्या दप्तरांमधे, कुलवृत्तांतामधे याबद्दल लिहून ठेवलेले आहे. हा काळ १५६० ते १६०० हा असावा. कारण १५६० मधे गोवा इन्क्विझिशनची सुरुवात झाली. त्या काळात पोर्तुगीजांना प्रत्यक्ष विरोध न करता काही हिंदू लोक तगून राहिले. त्यांच्या घरातून मुख्यतः 'कागदाचा गणपती' पहायला मिळतो.
याला दुजोरा देणारी हकीकत माझ्या सासर्‍यांकडून ऐकली आहे. ते गोव्यातले कामत. पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळून आणि कुलदैवताचा नाश झाल्यानंतर गोव्यातले घर, गाव सोडून पळाले ते थेट रत्नागिरी जिल्ह्यात येऊन पोचले. त्याच काळात काही घराणी कर्नाटकात मंगलोरकडे स्थलांतर करून गेली. तर काही रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर आणि आसपासच्या प्रदेशात येऊन पोचली.
तर हे कामत घराण्यातले काहीजण पोटाच्या पाठीमागे भटकत देवधे गावात येऊन पोचले. तिथल्या कुणा गद्रे नावाच्या माणसाला तो गाव सोडून जायचे होते. त्याने आपले राहते घर या कामतांच्या पूर्वजाना दिले, ते त्यांच्याकडून एक वचन घेऊन. की आपल्या घरात दिवाबत्ती झाली पाहिजे आणि गणपती आणला गेला पाहिजे. ती प्रथा अजूनपर्यंत टिकून आहे. याचाच अर्थ हा, की पोर्तुगीज येण्यापूर्वी कोकणात सर्वत्र पार्थिव गणपतीची पूजा सुरू होती.
*************
गणपती ही मूळ अनार्यांची देवता. साधारण चौथ्या पाचव्या शतकात म्हणजे गुप्तकाळात त्याला वैदिक धर्मात स्वीकारायची प्रक्रिया सुरू झाली आणि चालुक्य, शिलाहार, यादव यांच्या काळात, म्हणजे साधारण ९ व्या शतकापासून हळूहळू त्याला प्रमुख दैवतांत स्थान मिळत गेले असे समजले जाते. याच सुमारास गाणपत्य हा एक पंथ तयार झाला. नंतर ११ व्या १२ व्या शतकांत बांधलेली गणपतीची देवळे आढळून येतात. तोपर्यंत बहुधा गणपती दरवाज्याच्या पट्टीवरच अथवा सप्तमातृकांसह दिसून यायचा! या दरम्यान किंवा जरा नंतर पार्थिव गणेशाची पूजा करायची पद्धत सुरू झाली असावी.
*********
गणपतीला सर्व विद्या आणि कलांचा अधिपती मानल्यामुळे सगळ्या लोकसाहित्यात गणपतीच्या प्रार्थना सापडतात. मग ते तमाशातले गण गौळण असो की त्याहीपूर्वीच्या दशावतारी खेळ्यातले सुरुवातीलाच येणारे गणपती चे सोंग असो. संत-तंत-पंत सगळ्या कविश्रेष्ठांना गणपतीचे रूप भावले. आणि त्यांनी आप आपल्या साहित्यात त्याला स्थान दिले.
खेळ्यातला गणपती येतो तो "पहिले नमन, देवा करीतो वंदन" च्या तालावर नाचत, आणि तमाशातला गण येतो तो "आधी गणाला रणी आणिला नाहीतर रंग पुन्हा सुना सुना" म्हणत. ओव्या, भूपाळ्या, भारूड, अशा सगळ्या प्रकारच्या लोकसाहित्यात गणपतीचे स्तवन हा आवडता प्रकार दिसून येतो.
तसाच अनेक संतांच्या अभंगांमधे गणपतीचा उल्लेख येतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या शब्दात पाहिले तर
ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या|
जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा|
देवा तूचि गणेशु, सकलमतिप्रकाशु|
म्हणे निवृत्तीदासू, अवधारीजो जी||
तर पंत कवींच्या रचनांपैकी
नेत्री दोन हिरे, प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे|
माथा शेंदुर पाझरे वरी बरे, दुर्वांकुरांचे तुरे|
माझे चित्त विरे, मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे|
गोसावीसुत वासुदेव कवि रे, त्या मोरयाला स्मरे||
ही रचना अत्यंत प्रसिद्ध आहे.
**********
अशी अनेक उदाहरणे शोधू जाता सापडतील. गणपतीची पूजा, त्यात घुसलेली कर्मकांडं ते सगळं समजा आवडत नसेल तरी गणपतीच्या निमित्ताने सगळे नातेवाईक गावच्या घरी एकत्र भेटतात. त्या निमित्ताने घर साफ होतं. गप्पाटप्पा होतात. शेजारी भेटतात. पोरंबाळ जोरजोराने आरत्या म्हणतात, फटाके बिटाके लावून मजा करतात, हे काय थोडं झालं! इतर धर्मियांच्या ईद, थँक्स गिव्हिंग असल्या सणांची सुद्धा आपल्याला मजा वाटते, तर गणपतीच्या निमित्ताने आपली पोरं मजा करतात तर करू द्या की थोडी!
सार्वजनिक गणपती लो. टिळकांनी ज्या उद्देशाने सुरू केले तो उद्देश कधीच साध्य झाला. पण नंतर बदलत्या रूपात सार्वजनिक गणपती सुरूच राहिले. त्यातलं बरंवाईट अनेक जागी चर्चिलं गेलं आहे. पुनरुक्ती करत नाही. आजच्या बदलत्या काळात गणपती आणायचा का, कसा, किती दिवस, निसर्गाला कमीत कमी त्रास देऊन परंपरा जपणं कसं साध्य करता येईल यावर प्रत्येकाने आप आपला विचार करावा. गणेशाच्या आद्य कहाणीत म्हटल्याप्रमाणे "मनचा गणेश मनी वसावा" हेही बरोबर.
आज अनंतचतुर्दशी. पार्थिव गणेशाला निरोप द्यायची वेळ आहे. त्याबरोबर या वर्षीच्या श्रीगणेश लेखमालेचा समारोप करायची वेळ आली आहे. श्री गणेशाचं पुढच्या वर्षी आगमन होईल तेव्हा परत भेटूच! तोपर्यंत आमच्या कोकणातल्या पद्धतीप्रमाणे गार्‍हाणं घालते.
जय देवा गणपती गजानना,
सालाबादप्रमाणे,
मिसळपाव संस्थळाच्या घरात,
लेकीसुना-मुलाबाळांसह
नारळ आणि मोदक अर्पून
भक्तीभावाने तुझी सेवा केली आहे.
ती गोड मानून घे
चुकलं माकलं पदरात घे
आणि
या वर्षापासून पुढच्या वर्षापर्यंत
राखणदार हो!
******
होय देवा म्हाराजा!!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नर्मदे हर!!

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर

Earth’s Children