मनी

आमची मनी, म्हणजे मनीमावशी. अर्थात वाघाची मावशी. मासे खाणे आणि झोपा काढणे हा तिचा अत्यंत आवडता उद्योग. तिचा जन्मच आमच्या घरात झाला. त्यामुळे घरातील सर्वांची अतिशय लाडकी. आहे तशी गुणी. कधी कोणाला नख लावत नाही. की चावत नाही.
तिला पहिल्यांदा पिल्लं झाली तेव्हा तिने मला रात्रभर सोबत बसवून ठेवलं होतं, एवढा माणसांवर विश्वास ठेवते. खूपच मायाळू, म्हणजे मधेच मांडीवर येऊन बसेल आणि रोज सकाळी पोळी भरवून घेईल. खूप लाड करून घेते.
तिची पिल्लं लहान असतानाची ही हकीकत. एकदा रात्री एक मोठा बोका चोरपावलांनी घरात घुसला. आम्ही सगळेजण झोपेत होतो. मनीने सरळ त्याच्यावर हल्ला चढवला. आवाज ऐकून आम्ही सगळे जागे झालो. पहातो तर काय, तो बोका खिडकीतून पलायन करण्याच्या प्रयत्नात होता. मनीने त्याचा पाठलाग सुरू केला. खिडकीतून बाहेर, मग रस्त्यावर, मग पाठच्या डोंगरावर. बोका पुढे आणि मनी मागे अशी शर्यत आम्ही पाहिली. बरेच वेळाने मनी परत आली. मी म्हटलं आला गल्लीचा दादा परत. पण तेव्हापासून तो बोका परत आला नाही. आता रात्री मनी पिल्लांपासून थोडी दूर बसून रहाते. कारण एखादा बोका आला तर?
पिल्लं थोडी मोठी झाली. मनी हळू हळू पिलांना घेऊन बाहेर जायला लागली. एकदा त्यांचा शिकारीचा खेळ रंगात आला होता. मी बाल्कनीतून ते मनोरंजक दृश्य बघत होते.
एवढ्यात रस्त्यावरून 4/5 कुत्रे भुंकत आले. आम्ही रहातो त्या बिल्डिंगला कुंपण नाही. थेट रस्ताच आहे. त्यामुळे कुत्रे पिलांच्या दिशेने आले. पिल्लं घराकडे पळायला लागली. आणि त्यांची आई? ती सरळ अंग फुलवून कुत्र्यांवर धावून गेली. काय झालं हे लक्षात येताच मी बाल्कनीतून खाली धावले. मनीला कुमक आलेली पाहताच कुत्रे मागे फिरले. तोपर्यंत पिल्लं घरात पोचली होती. मनी गुरगुरत जागीच बसून राहिली. मी आमच्या झाशीच्या राणीला उचलून घरात आणलं. थोड्याच वेळात जणू काही झालंच नाही अशा प्रकारे त्यांचा खेळ परत चालू झाला.
आता या विलक्षण प्रसंगाची आठवण झाली तरी थरकाप होतो. त्या कुत्र्यांपैकी एखाद्याने मनीची मानगुट धरली असती तर ती तत्काळ यमसदनाला पोचली असती. पण त्या क्षणी तिने कसलाही विचार न करता कुत्र्यांवर हल्ला चढवला. आता तिला या प्रसंगाची आठवण सुद्धा नसेल. शेवटी प्राणी ना! पण या दीड वर्ष वयाच्या आईत सुद्धा तीच वैश्विक भावना जागृत आहे.
कुणीतरी म्हटलं आहे ना,
“प्रत्येक ठिकाणी शारीर रुपात उपस्थित रहाणं परमेश्वराला शक्य नाही, म्हणून त्याने आईची योजना केली.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नर्मदे हर!!

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर

रणबीर राज कपूर